Maldives-Lakshadweep Comparison : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या लक्षद्वीप (Lakshadweep) दौऱ्यानंतर (Tour) भारत (India) आणि मालदीव (Maldives) यांच्यातील वाद समोर आला आहे. पंतप्रधान मोदी यांचे लक्षद्वीप दौऱ्याचे फोटो व्हायरल झाल्यानंतर मालदीवच्या काही मंत्र्यांनी पंतप्रधान मोदींबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं, यानंतर भारत विरुद्ध मालदीव यांच्यात नव्या वादाला तोंड फुटलं आहे. पंतप्रधान मोदींवरील आक्षेपार्ह वक्तव्यानंतर मालदीवच्या पर्यटन व्यवसाला फटका बसणार आहे. पंतप्रधानांचे फोटो व्हायरल झाल्यानंतर नेटकरी लक्षद्वीप आणि मालदीवची तुलना करताना दिसत आहे. 


मालदीव की लक्षद्वीप, कोणता पर्याय बेस्ट?


पंतप्रधान मोदींचे लक्षद्वीपचे फोटो व्हायरल झाल्यावर नेटकऱ्यांनी गुगलवर सर्वाधिक सर्च केलेला शब्द म्हणजे लक्षद्वीप. पंतप्रधानांच्या फोटोवर नेटकऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देत म्हटलं आहे की, सुट्टीसाठी मालदीवपेक्षा लक्षद्वीप चांगला पर्याय आहे. या ट्विटला उत्तर देताना मालदीवच्या नेत्यांनी आक्षेपार्ह विधाने केली. त्यांनीम्हटलं की, लक्षद्वीपची तुलना मालदीवशी होऊ शकत नाही. मालदीव की लक्षद्वीप कोणता डेस्टिनेशनचा पर्याय उत्तम आहे आहे आणि दोघांमधील फरक काय याबद्दल सविस्तर माहिती वाचा.


मालदीवचा इतिहास आणि भूगोल काय?


मालदीव हा हिंदी महासागरात वसलेला एक अतिशय छोटा देश आहे. मालदीव हा मूळचा मल्याळम शब्द आहे, ज्याचा अर्थ दिव्यांची हार असा होतो. 1965 मध्ये मालदीवला ब्रिटनपासून स्वातंत्र्य मिळाले, त्यानंतर येथे राजेशाही प्रस्थापित झाली. त्याच्या, तीन वर्षांनंतर 1968 मध्ये मालदीव प्रजासत्ताक बनलं. मालदीव भारताच्या दक्षिण-पश्चिम भागात आहे. केरळमधील कोची ते मालदीव हे अंतर एक हजार किलोमीटर आहे. 


अर्थव्यवस्थेत पर्यटनाचा मोठा वाटा


मालदीव हा 1200 बेटांचा समूह आहे, ज्यांचे क्षेत्रफळ 300 चौरस किलोमीटरमध्ये पसरलेले आहे. मालदीवची लोकसंख्या सुमारे 5 लाख आहे. मालदीवमध्ये बहुतेक बेटे समुद्रसपाटीपासून सहा फूट उंचीवर आहेत, त्यामुळे येथे नेहमीच हवामान बदलाचा धोका असतो. . मालदीव देशाच्या अर्थव्यवस्थेत पर्यटनाचा वाटा सर्वाधिक आहे. जीडीपीचा एक चतुर्थांश भाग येथून येतो. दरवर्षी लाखो पर्यटक मालदीवला भेट देतात, यामध्ये भारतीयांचं प्रमाणही जास्त आहे.


भारतीयांसाठी मालदीव व्हिसा फ्री


भारत ते मालदीवपर्यंत फ्लाइट कनेक्टिव्हिटी चांगली आहे. भारतातील बहुतेक सर्व प्रमुख शहरांमधून मालदीवला थेट विमानाने पोहोचता येते. महत्त्वाचं म्हणजे भारतीयांसाठी मालदीवचा व्हिसा मोफत आहे. यामुळेच गेल्या वर्षी दोन लाखांहून अधिक भारतीयांनी मालदीवला भेट दिली. 


मालदीवमध्ये भेट देण्याची ठिकाणे कोणती?


मालदीवमध्ये सन आयलंड, ग्लोइंग बीच, फिहलहोही आयलंड, माले सिटी, माफुशी, आर्टिफिशियल बीच, मामिगिली ही प्रसिद्ध पर्यटन स्थळे आहेत. येथील थ्री स्टार हॉटेलचं एका दिवसाचं भाडं 5 हजार रुपयांपासून सुरू होतं.


लक्षद्वीपचा इतिहास आणि भूगोल काय?


लक्षद्वीप हा भारतातील आठ केंद्रशासित प्रदेशांपैकी एक आहे. लक्षद्वीपमध्ये 36 बेटे आहेत. त्याचे एकूण क्षेत्रफळ केवळ 32 किलोमीटर आहे.केरळमधील कोची शहरापासून त्याचे अंतर 440 किलोमीटर आहे. मालदीवपासून लक्षद्वीपचे अंतर 700 किलोमीटर आहे. लक्षद्वीव मालदीवपेक्षा 10 पट लहान आहे.  केंद्रशासित प्रदेशाची एकूण लोकसंख्या 60 हजारांहून अधिक असून येथील 96 टक्के लोक इस्लाम धर्माचे पालन करतात. 36 पैकी फक्त 10 बेटांवर लोक राहतात, इतर बेटांवर कोणीही राहत नाही.


कावरत्ती, अगट्टी, अमिनी, कदम, किलाटन, चेतलाट, बित्रा, अंडोह, कल्पना आणि मिनीकोय या बेटांवर मानवी वस्ती आहे. लक्षद्वीपमध्ये लोक मल्याळम भाषा बोलतात. लक्षद्वीपच्या उत्पन्नाचे प्रमुख स्रोत मासेमारी आणि नारळाची शेती आहेत. मात्र, अलीकडच्या काळात येथील पर्यटन उद्योगातही वाढ झाली आहे. गेल्या वर्षी येथे 25 हजार लोकांनी भेट दिली. केंद्र सरकार सध्या लक्षद्वीपप्रमाणे इतर केंद्रशासित प्रदेशातील पर्यटनाला चालना देण्याचा प्रयत्न करत आहे.


लक्षद्वीपला कसं पोहोचायचं?


लक्षद्वीपला हवाई मार्गाने जाण्यासाठी एकच हवाईपट्टी आहे, ती अगट्टीमध्ये आहे. त्याची कनेक्टिव्हिटी कोचीशी आहे. लक्षद्वीपच्या बाकीच्या बेटांवर जाण्यासाठी बोटीची मदत घ्यावी लागते. लक्षद्वीपला जाणे भारतीयांसाठी थोडे कठीण आहे. सर्व प्रथम लोकांना कोचीला जावे लागेल. त्यानंतरच लक्षद्वीपला जाता येईल.


लक्षद्वीपला जाण्यासाठी सरकारची परवानगी गरजेची


लक्षद्वीपला जाण्यासाठी लोकांना प्रशासनाकडून परवानगी घ्यावी लागते. येथे अनेक बेटे आहेत जिथे लोकांना जाण्यास मनाई आहे. यामुळे लक्षद्वीपला भेट देण्यासाठी तुम्हाला सरकारकडून परवानगी घ्यावी लागेल. 


लक्षद्वीपमध्ये भेट देण्यासारखी ठिकाणे कोणती ?


कावरत्ती बेट, लाइट हाऊस, जेट्टी साइट, मशीद, अगट्टी, कदम, बांगाराम, थिनाकारा ही ठिकाणे लोक भेट देतात. डिसेंबर ते फेब्रुवारी महिना येथे जास्त पर्यटक भेट देतात. बहुतेक वेळा येथील तापमान 22 ते 36 अंश असते.