मुंबई : रशियाची (Russia) चंद्रमोहिम (Moon Mission) अपयशी ठरल्याची मोठी अपडेट समोर आली आहे. रशियाचं लुना-25 (Luna-25) अंतराळयान चंद्रावर क्रॅश झालं आहे. रशियन अंतराळ संशोधन संस्था रोसकॉसमॉस (Roskosmos) ने याबाबत अधिकृत माहिती दिली आहे. रशियाचं लुना-25 अंतराळयान 21 ऑगस्ट रोजी चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करण्याचा प्रयत्न करणार होतं. रशियाने तब्बल 47 वर्षानंतर चंद्रमोहिम हाती घेतली होती. मात्र, ही चंद्रमोहिम अयशस्वी ठरली आहे.


रशियाचं लुना-25 अंतराळयान क्रॅश


जवळपास पन्नास वर्षानंतर रशिया चंद्रावरील संशोधन करत आहे. रशियाने 10 ऑगस्ट रोजी 1976 मध्ये लुना-24 पाठवले होते. त्या मोहिमेनंतर जवळपास पाच दशकांनंतर प्रथमच लुना-25 अंतराळात पाठवण्यात आलं. त्याने चंद्राकडे जाण्याचा अधिक थेट मार्ग स्वीकारला होता. 11 दिवसांत म्हणजे 21 ऑगस्टला 'लुना-25'चंद्रावर उतरणार होतं. हे यान अधिक शक्तीशाली आणि खर्चिक रॉकेटद्वारे  चंद्राच्या दिशेने निघाले होते. यानाच्या हलक्या वजनाच्या डिझाईन आणि इंधन साठवणुकीच्या क्षमतेमुळे कमी वेळेत हे यान चंद्राच्या कक्षात पोहचलं होतं. मात्र, चंद्र मोहिम पूर्ण होण्याच्या आधीच हे अंतराळयान क्रॅश झालं आहे.  






चंद्राच्या पृष्ठभागाशी टक्कर झाल्यामुळे लुना-25 कोसळलं


रशियन अंतराळ संशोधन संस्था रोसकॉसमॉस (Roskosmos) ने अधिकृतरित्या सांगितलं आहे की, अनियंत्रित कक्षेत फिरल्यानंतर रशियाचे लुना-25 अंतराळ यान चंद्रावर कोसळलं आहे. रोस्कोसमॉसने सांगितलं की, लुना-25 ला प्री-लँडिंग ऑर्बिटमध्ये असताना शंटिंग करण्यात तांत्रिक समस्या उद्भवली होती. त्यानंतर एक दिवसाने लुना-25 कोसळल्याची माहिती समोर आली आहे. रोस्कोसमॉसने एका निवेदनात म्हटलं आहे की, "लुना-25 नियोजित कक्षेत न जाता वेगळ्या अनियंत्रित कक्षेत गेले आणि त्याची चंद्राच्या पृष्ठभागाशी टक्कर झाली. यामुळे ही मोहिम अयशस्वी ठरली."


आता भारताच्या चंद्र मोहिमेकडे जगाचं लक्ष 


भारताच्या चांद्रयान-3 ने आंध्रप्रदेशातील श्रीहरिकोटा येथून 14 जुलै रोजी रॉकेटमधून उड्डाण केले होते. तर रशियाने भारतानंतर जवळपास महिन्याभरानंतर 11 ऑगस्ट रोजी सोयूज 2.1 बी रॉकेटद्वारे अमूर ओब्लास्टच्या वोस्तानी कॉस्मोड्रोमवरुन प्रक्षेपण केलं होतं. रशिया आणि भारत दोन्ही देश दोन दिवसांच्या अंतराने चंद्रावर उतरणार होते. आता रशियाचं लुना-25 क्रॅश झाल्यानंतर जगाचं लक्ष भारताच्या चंद्र मोहिमेकडे लागलं आहे.




चांद्रयान-3 'या' दिवशी चंद्रावर उतरणार



भारताचं चांद्रयान-3 एलव्हीएम-3 (LVM-3) रॉकेटद्वारे 14 जुलै रोजी दुपारी 2.35 वाजता अवकाशात झेपावलं. चांद्रयान-3 अंतराळयान 23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याची अपेक्षा आहे. सर्व काही ठरल्याप्रमाणे पार पडलं तर, चांद्रयान 23 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6.04 वाजता चंद्रावर उतरण्याची शक्यता आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडरचे उतरणं हे चांद्रयान-3 मोहिमेचं पहिलं लक्ष्य आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Moon Mission : चंद्रावर असं आहे तरी काय? याचा मानवाला काय फायदा? जगातील देशांमध्ये नेमकी स्पर्धा कशासाठी? वाचा सविस्तर...