मुंबई : सध्या लोकांच्या आयुष्यात कॅमेरा आणि फोटोग्राफर (Photographer) यांना विशेष महत्त्व आहे. आपल्या आयुष्यातील अनेक महत्त्वाचे क्षण टिपण्याचं काम हे फोटोग्राफर करत असतात. तसेच अनेक महत्त्वाच्या घडामोडींचे देखील छायाचित्रण अनेक फोटोग्राफर करतात. याच फोटोग्राफरचं कौतुक करण्यासाठी 19 ऑगस्ट हा दिवस जागतिक फोटोग्राफर दिन म्हणून साजरा केला जातो. पण तुम्हाला माहित आहे का की भारताच्या फोटोग्राफीचे जनक कोण आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर आम्ही तुम्हाला देणार आहोत. फोटोग्राफर आणि फोटो जर्नलिस्ट रघु राय (Raghu Rai) यांना भारतीय फोटोग्राफीचे जनक म्हणून ओळखलं जातं.
रघु राय यांचे सुरुवातीचे आयुष्य
रघु राय यांचा जन्म 1942 मध्ये सध्या पाकिस्तानात असलेल्या पंजाब प्रांतात झाला. त्यांनी त्यांचे मोठे बंधू शरमपाल चौधरी ज्यांना एस पॉल म्हणून ओळखले जाते त्यांच्या हाताखाली 1962 मध्ये फोटोग्राफीचे धडे गिरवण्यास सुरुवात केली. तीन वर्षांचं प्रशिक्षण घेऊन त्यांनी 1965 'द स्टेट्समन' या वृत्तपत्रामध्ये मुख्य फोटो जर्नलिस्ट म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यांची अनेक छायाचित्रं ही जगाच्या पाठीवर नावारुपाला आली आहेत. त्यांनी भोपाळमध्ये झालेल्या वायुगळतीच्या वेळी काढलेले फोटो असो किंवा संजय गांधी यांच्या विमान अपघाताचे फोटो असो, त्यांचा प्रत्येक फोटो हा लोकांचे लक्ष वेधून घेणार ठरला.
रघु राय यांचे करिअर
'द स्टेट्समन' या वृत्तपत्रानंतर रघु राय यांनी 1976 मध्ये कलकत्तामधील 'संडे' या वृत्तपत्रामध्ये काम करण्यास सुरुवात केली. त्यांनी या वृत्तपत्रासाठी फोटो जर्नलिस्ट एडिटर म्हणून काम केलं आहे. त्यानंतर त्यांनी 1980 पासून 'इंडिया टूडे'सोबत त्यांचा प्रवास सुरु केला. त्यांनी सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक अनेक क्षणांचे छायाचित्र त्यांच्या कॅमेरामधून टिपले आहेत. द न्यूयॉर्क टाइम्स, संडे टाईम्स, न्यूजवीक, द इंडिपेंडंट यांसह अनेक मासिकांमध्ये काम केलं आहे.
जीवनगौरव पुरस्कारने सन्मानित
रघु राय यांच्या अलौकिक कामामुळे त्यांना केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून 2017 मध्ये जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तसेच त्यांना बांग्लादेश युद्धामधील त्यांनी केलेल्या त्यांच्या पत्रकारितेच्या कामासाठी भारत सरकारकडून 1972 मध्ये पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. त्यांनी दिलेल्या अनेक छायाचित्रांचा संदर्भ हा माध्यम क्षेत्रासाठी आजही तितकाच महत्त्वाचा आहे. त्यांनी त्यांच्या प्रत्येक छायाचित्रांमधून बातमी सांगण्याचा एक सार्थ प्रयत्न केला आहे. त्यामुळे त्यांच्या छायाचित्रांना आजही तितकीच पसंती मिळत आहे.