मुंबई : जगभरातील देश चंद्रावर पोहोचण्यासाठी स्पर्धा करत आहेत. भारत (India) आणि रशियाची (Russia) चंद्र मोहीम आता शेवटच्या टप्प्यात आहे. चांद्रयान-3 चंद्राच्या जवळ पोहोचलं असून आता लँडर आणि प्रोपल्शन मॉड्युल वेगळे करण्याची तयारी सुरु आहे. चांद्रयान-3 चंद्राच्या जवळ येत आहे. भारताची चंद्र मोहिम शेवटच्या टप्प्यात आहे. त्यामुळे भारतासह संपूर्ण जगाच्या नजरा इस्रोच्या 'मिशन मून'वर आहेत. भारताचे चांद्रयान-3 आणि रशियाचे लुना-25 ते चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरून नवा इतिहास रचण्याच्या तयारीत आहेत.
चंद्रावर असं आहे तरी काय?
भारताप्रमाणे रशियाचंही अंतराळयान लवकरत चंद्रावर उतरणार आहे. सुमारे पाच दशकांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर रशियानेही चंद्र मोहिम हाती घेतली आहे. भारत आणि रशियाची ही मोहिम यशस्वी झाल्यास अवकाश संशोधनात दोन्ही देश एक पाऊल पुढे पोहोचतील.
जगातील देशांमध्ये नेमकी स्पर्धा कशासाठी?
जगातील सर्व देश चंद्रावर उतरण्यासाठी स्पर्धेत आहेत. चंद्राबाबत जगभरातील देशांची वाढती उत्सुकता मोठी आहे, तिथे पोहोचण्यासाठी खूप स्पर्धा आहे आणि त्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ लढत आहेत. पण, चंद्रावर असं नेमकं आहे तरी, काय ज्यासाठी सर्व देशांचा चंद्रावर पोहोचण्याची उत्सुकता आहे. अशा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर याबाबत सविस्तर जाणून घ्या.
चंद्रावर नेमकं आहे तरी काय?
शास्त्रज्ञांचा दावा आहे की, चंद्रावर हेलियमचे समस्थानिक आहे जे पृथ्वीवर दुर्मिळ आहे, परंतु चंद्रावर ते दहा लाख टन असल्याचा अंदाज आहे. यासोबतच चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाणी सापडण्याची शक्यता आहे. भारत आणि रशियाच्या चंद्र मोहिमेचं लक्ष्य चंद्रावर पाण्याचे साठे आणि खनिजे शोधणे आहे.
चंद्र मोहिमेचा मानवाला काय फायदा?
चंद्राचा शोध तंत्रज्ञानाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरेल. चंद्रावरील खनिज साठे मानवाला वापरता येतील, तसेच इतर नवीन संसाधनांचा शोध लागल्यास त्याचाही मानवाला फायदा होईल. चंद्रावर पाण्याचे साठे सापडल्यास भविष्यात तेथे मानवी वसाहती तयार केल्या जाऊ शकतात. ज्यामुळे मानवाला चंद्रावर जीवन जगणं शक्य होईल.
भारत आणि रशियाची चंद्र मोहिम
आता भारतासह आणि रशिया चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याच्या प्रयत्नात आहे. चांद्रयान-3 नंतर सुमारे एक महिन्यानंतर, मिशन लुना-25 लाँच करण्यात आलं आणि ते प्रथम चंद्राच्या पृष्ठभागावर उतरलं. रशियाच्या चंद्रमोहिमेमधील लुना-25 हे अंतराळयान 21 ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याची शक्यता आहे. तर, भारताचं चांद्रयान-3 दोन दिवसांनंतर म्हणजेच, 23 ऑगस्ट रोजी चंद्रावर पोहोचणार आहे.
'हे' देश चंद्रावर पोहोचले
आतापर्यंत फक्त अमेरिका चंद्रावर उतरण्यात यशस्वी ठरला आहे. त्याशिवाय भारत, जपान आणि इस्राइलनेही चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, यामध्ये त्यांना यश मिळालं नाही. भारत आणि रशियाची चंद्र मोहिम शेवटच्या टप्प्यावर आहे. त्यानंतर अमेरिका आणि चीनही चंद्रावर पोहोचण्याच्या शर्यतीत उडी घेतील, अमेरिका आणि चीन 2030 पूर्वी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर अंतराळवीर उतरवण्याच्या तयारीत आहेत.