Nepal PM KP Sharma Oli Resign: नेपाळच्या पंतप्रधानांचा अखेर राजीनामा, तातडीने दुबईसाठी निघणार; GEN-Z समोर नेपाळ सरकार झुकले
Nepal PM KP Sharma Oli Resign: देशातील बिघडत्या परिस्थिती दरम्यान, राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनीही पंतप्रधान ओली यांचा राजीनामा स्वीकारला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव ओली सध्या नेपाळी सैन्यात आहेत.

नेपाळ: नेपाळमध्ये सोशल मीडिया बंदीवर निदर्शने झाल्यानंतर, सरकारने सोमवारी (८ सप्टेंबर) आपला निर्णय मागे घेतला. तीन दिवसांपूर्वी, सरकारने फेसबुक, एक्स (पूर्वी ट्विटर) आणि व्हॉट्सअॅपसह २६ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घालण्याचे आदेश दिले होते. या निर्णयाच्या निषेधार्थ राजधानी काठमांडूसह अनेक ठिकाणी हिंसक निदर्शने झाली. निदर्शक आणि पोलिसांमधील संघर्षात आतापर्यंत किमान १९ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ३०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. या तणावपूर्ण परिस्थितीत नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी पद सोडले आहे, त्यांनी आपल्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आहे.
नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांचा राजीनामा
नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी राजीनामा दिला आहे. यापूर्वी, लष्कराने म्हटले होते की, जोपर्यंत पंतप्रधान पद सोडत नाहीत तोपर्यंत देशातील परिस्थिती स्थिर राहणार नाही. नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी आज (मंगळवारी ९ सप्टेंबर) आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. लष्करप्रमुख जनरल अशोक राज सिग्देल यांनी केपी शर्मा यांना पद सोडण्याचा सल्ला दिला होता. राजीनामा दिल्यानंतरच परिस्थिती सुधारेल असे त्यांनी म्हटले होते. नेपाळमध्ये सोशल मीडिया अॅप्सवरील बंदीविरोधात तरूणाई निदर्शने करत आहे. निदर्शकांनी राष्ट्रपतींचे घर पेटवून दिले होते. देशातील बिघडत्या परिस्थिती दरम्यान, राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनीही पंतप्रधान ओली यांचा राजीनामा स्वीकारला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव ओली सध्या नेपाळी सैन्यात आहेत.
Nepal Prime Minister KP Sharma Oli resigns: officials
— Press Trust of India (@PTI_News) September 9, 2025
(Source: Third Party)#NepalGenZProtest #KathmanduProtest pic.twitter.com/emqq1CMQVk
नेपाळचे दळणवळण, माहिती आणि प्रसारण मंत्री पृथ्वी सुब्बा गुरुंग यांनी आपत्कालीन मंत्रिमंडळ बैठकीनंतर बंदी उठवल्याची घोषणा केली. ते म्हणाले की, माहिती मंत्रालयाने संबंधित एजन्सींना 'Gen Z' गटाच्या मागण्यांनुसार सोशल मीडिया सेवा पुन्हा सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. सोमवारी निदर्शकांचा एक गट संसद भवनाच्या संकुलात घुसला तेव्हा परिस्थिती आणखी बिकट झाली. यानंतर, जमावाला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना पाण्याच्या तोफांचा, अश्रूधुराचा आणि गोळ्यांचा वापर करावा लागला. सरकारने आंदोलन करणाऱ्या तरुणांना आंदोलन संपवण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, फेसबुक, एक्स आणि व्हॉट्सअॅप सारख्या लोकप्रिय सोशल मीडिया साइट्स सोमवार रात्रीपासून पुन्हा काम करू लागल्या आहेत.
नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांचा राजीनामा
ओली यांनी आपल्या राजीनाम्यात लिहिले आहे –"माननीय राष्ट्रपती महोदय, नेपाळच्या संविधानातील अनुच्छेद 76 (2) नुसार मी 31 असार 2081 बी.एस. रोजी पंतप्रधान म्हणून नियुक्त झालो. देशातील सध्याच्या असामान्य परिस्थितीचा विचार करता, मी संविधानातील अनुच्छेद 77 (1) (अ) नुसार आजपासून पंतप्रधान पदाचा राजीनामा देत आहे, जेणेकरून संविधानानुसार समस्यांच्या राजकीय तोडग्याकडे आणि त्यावर उपाययोजनांच्या दिशेने पुढील पाऊल टाकता येईल."
तीन वेळा पंतप्रधानपद भूषविलेले ओली
के.पी. शर्मा ओली प्रथमच 2015 मध्ये नेपाळचे पंतप्रधान झाले. ऑक्टोबर 2015 ते ऑगस्ट 2016 या काळात त्यांनी पंतप्रधानपद सांभाळले, मात्र पाठिंबा कमी झाल्याने त्यांना राजीनामा द्यावा लागला.
ओली दुसऱ्यांदा 2018 मध्ये पंतप्रधान झाले. फेब्रुवारी 2018 ते मे 2021 या काळात ते पदावर होते. या वेळीही त्यांना राजीनामा द्यावा लागला. दुसऱ्या कार्यकाळात ते एकूण 3 वर्षे आणि 88 दिवस पंतप्रधान होते.ओली तिसऱ्यांदा जुलै 2024 मध्ये पंतप्रधान झाले होते. मात्र ऑगस्ट 2025 पर्यंतच ते पदावर राहिले.
नेमकं प्रकरण काय?
नेपाळ सरकारने एक नवीन बिल संसदेमध्ये आणलं आहे, ज्यात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना स्थानीय प्रतिनिधी नियुक्त करणे, नोंदणी आणि जबाबदारीचे नियम ठेवणे अपेक्षित होतं. 3 सप्टेंबर रोजी नेपाळ सरकारने फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूबसह 26 सोशल मीडिया अॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. हे प्लॅटफॉर्म नेपाळच्या दळणवळण आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाकडे नोंदणीकृत नव्हते. मंत्रालयाने त्यांना 28 ऑगस्टपासून 7 दिवसांची मुदत दिली होती. त्याची अंतिम मुदत 2 सप्टेंबर रोजी संपली. त्यानंतर नेपाळ सरकारने 26 सोशल मीडिया अॅप्सवर बंदी घातली. चीनमध्ये आधीपासूनच अमेरिका आणि युरोप प्रायोजित सोशल मीडियावर बंदी आहे. चीनने पाश्चात्य देशांची विचारसरणी रोखण्यासाठी स्वतःचे WeChat, Weibo, Douyin सारखे अॅप्स विकसित केले आहेत. नेपाळमध्येही त्याच धर्तीवर प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करण्यात येत होता. नेपाळ सरकारने 26 अॅप्सवर बंदी घातली होती. तर दुसरीकडे TikTok, Viber, Nimbuzz इत्यादी चीनी अॅप्सवर बंदी घालण्यात आली नव्हती.
नेपाळने कोणत्या सोशल मीडियावर घातली होती बंदी?
मेटा प्लॅटफॉर्म: फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअॅप.
व्हिडिओ आणि इमेज शेअरिंग: यूट्यूब, स्नॅपचॅट आणि पिंटरेस्ट.
व्यावसायिक नेटवर्किंग: लिंक्डइन.
बातम्या आणि सोशल नेटवर्किंग: एक्स (पूर्वी ट्विटर) आणि रेडिट.
इतर प्लॅटफॉर्म: डिस्कॉर्ड, सिग्नल, थ्रेड्स, वीचॅट, क्वोरा, टम्बलर,
क्लबहाऊस, मास्टोडॉन, रंबल, मीवी, व्हीके, लाइन, इमो, झालो, सोल, बोटिम आणि हॅम्रो पॅट्रो.
मेसेजिंग अॅप्स: ऑनलाइन फसवणूक आणि मनी लाँड्रिंगच्या चिंतेमुळे जुलै 2025 मध्ये टेलिग्रामवर देखील बंदी घालण्यात आली होती.






















