Hardeep Singh Nijjar : खलिस्तानी दहशतवादी (Khalistan) हरदीप सिंह निज्जरची (Hardeep Singh Nijjar) कॅनडात (Canada) हत्या करण्यात आली आहे. गुरुद्वाराबाहेर त्याची गोळ्या (Firing) झाडून हत्या करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. या गोळीबारात हरदीप निज्जरला अनेक गोळ्या लागल्या, त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. भारतीय एजन्सीच्या मोस्ट वॉण्टेड यादीत हरदीप सिंह निज्जरचा समावेश होता. भारतातील हिंसाचार आणि गुन्हेगारीच्या अनेक प्रकरणांमध्ये त्याचे नाव पुढे आलं होतं, त्यानंतर त्याला वॉण्टेड दहशतवाद्यांच्या यादीत टाकण्यात आलं होतं. दरम्यान हरदीप सिंह निज्जरचा गोळीबारात मृत्यू झाला असला तरी ही  हत्या कोणी केली हे अद्याप समजू शकलेलं नाही. कॅनडाच्या पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, कॅनडातील सरे इथे हरदीप निज्जरवर गोळी झाडण्यात आली, त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. तो कॅनडातील शिख फॉर जस्टिस या शीख संघटनेशी संबंधित होते. तो मूळचा पंजाबमधील जालंधर जिल्ह्यातील रहिवासी होता. तो मागील अनेक वर्षांपासून कॅनडात राहत होता आणि तिथून भारताविरुद्ध खलिस्तानी दहशतवादाला खतपाणी घालत होता.


गेल्या वर्षभरात हरदीप सिंह निज्जर हा भारतीय तपास यंत्रणांसाठी मोठी डोकेदुखी बनला होता कारण त्याने लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या कार्यकर्त्यांना परदेशात रसद आणि पैसा पुरवायला सुरुवात केली होती. निज्जरच्या दोन साथीदारांना काही महिन्यांपूर्वी फिलिपाईन्स आणि मलेशियामधून अटक करण्यात आली होती.


निज्जरचा मोस्ट वॉण्टेड यादीत समावेश


भारत सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या मोस्ट वॉण्टेड यादीत हरदीप सिंह निज्जरच्या नावाचाही समावेश करण्यात आला होता, ज्यामध्ये अन्य 40 दहशतवाद्यांचीही नावं होती. गेल्या वर्षी म्हणजेच 2022 मध्ये पंजाबमधील जालंधर इथे एका हिंदू पुजाऱ्याच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप निज्जरवर आहे. या हत्याकांडानंतर त्याच्यावर 10 लाख रुपयांचं बक्षीसही जाहीर करण्यात आलं होतं. खलिस्तान टायगर फोर्सने (KTF) हे हत्याकांड घडवून आणलं होतं. हरदीप सिंह निज्जर हा या संस्थेचा प्रमुख होता.


एनआयएकडूनही सुरु होता तपास


भारतातील इतर विविध गुन्हेगारी कारवायांमध्ये सहभाग असल्याचाही आरोप हरदीप सिंह निज्जरवर होता. राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयए त्याच्याविरुद्ध दहशतवादी कारवायांचाही तपास करत होती. 


एनआयएच्या एफआयआरमध्येही निज्जरचे नाव 


भारतात कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु होतं, त्याचवेळी परदेशातील भारतीय दूतावासांसमोर शिख फॉर जस्टिस या खलिस्तानी संघटनेच्या दहशतवाद्यांनी परदेशातील भारतीय दूतावासांसमोर निदर्शने केली होती. या प्रकरणी भारत सरकारविरोधात भावना भडकावल्याप्रकरणी एनआयएने गुन्हा नोंदवला होता.


खलिस्तान समर्थकांवर कारवाई


भारतीय एजन्सींकडून सातत्याने खलिस्तानी समर्थकांवर, त्यांच्या चळवळीवर नजर होती. अलिकडेच वारिस पंजाब दे संघटनेचा प्रमुख अमृतपाल आणि त्याच्या सर्व समर्थकांनाही अटक करण्यात आली होती. त्यानंतर कॅनडा आणि इतर देशांतून काम करणाऱ्या खलिस्तान समर्थकांना मोठा धक्का बसला. अलिकडेच अमृतपालचा जवळचा सहकारी आणि खलिस्तान समर्थक अवतार सिंह खांडा याचाही रुग्णालयात मृत्यू झाला होता, खांडा याचाही एनआयएच्या मोस्ट वॉण्टेड यादीत समावेश होता.


हेही वाचा


Khalistan : अमृतपाल सिंहवरील कारवाईवरून खलिस्तानी समर्थकांचा गोंधळ, चार देशांमध्ये निदर्शनं; अमेरिकन दूतावासात तोडफोड