Vandialism in Indian High Commission : खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंहच्या (Amritpal Singh) अटकेसाठी पंजाब पोलिसांकडून धडक कारवाई सुरु आहे. अमृतपाल सिंहच्या साथीदारांना पोलिसांनी अटक केली आहे. खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंहवर झालेल्या कारवाईमुळे जगातील चार देशांमध्ये त्याचे समर्थक निदर्शनं करताना दिसत आहेत. खलिस्तानी समर्थकांनी सोमवारी (20 मार्च) सॅन फ्रान्सिस्कोमधील भारतीय दूतावासाची तोडफोड केली. या संदर्भात भारतात तीव्र निषेध व्यक्त केला आहे.
ब्रिटननंतर अमेरिकन दूतावासाची तोडफोड
ब्रिटननंतर अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथील भारतीय दूतावासात खलिस्तान समर्थकांनी गोंधळ घातला आहे. डझनभर समर्थकांनी लाठ्या, काठ्या, तलवारींनी हल्ला केला आणि भिंतीवर 'FreeAmritpal' असे पोस्टर झळकावत भारताविरोधी घोषणाबाजी केली. खलिस्तानी समर्थकांनी भारतीय दूतावासाच्या कार्यालयावर हल्ला करून तोडफोड केली. समर्थकांनी दुतावासाच्या इमारतीवर खलिस्तानी झेंडाही फडकावला. जमावाने लाठ्या-काठ्यांनी हल्ला करत दूतावासाच्या प्रवेशद्वाराचा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला.
भारतीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची यूएस प्रभारी एलिझाबेथ जोन्स यांच्याशी भेट झाली. या भेटीदरम्यान, परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिकन सरकारला भारतीय उच्च युक्तालयातील अधिकाऱ्यांची सुरक्षा सुनिश्चित करण्याची आठवण करून दिली आणि अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सांगितलं आहे.
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने काय म्हटलं?
भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं सांगितलं की, या पार्श्वभूमीवर वॉशिंग्टनमधील भारतीय दूतावासाने अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाकडे चिंता व्यक्त करत सुरक्षा सुनिश्चित करण्यास सांगितलं आहे.
अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयानं काय म्हटलं?
भारताने निषेधा नोंदवल्यानंतर, यूएस स्टेट डिपार्टमेंटच्या प्रवक्त्यानं सांगितलं की, अमेरिकेतील भारतीय दूतावासावरील हल्ल्याचा निषेध करतो. ते म्हणाले, आम्ही भारतातील नेते आणि अधिकाऱ्यांना खात्री देऊ इच्छितो की आम्ही भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांच्या सुरक्षेची पूर्णपणे काळजी घेण्यासाठी वचनबद्ध आहोत.
लंडनमधील भारतीय दुतावासावरही हल्ला
ब्रिटनमध्येही खलिस्तानी समर्थकांनी रविवारी गोंधळ घातला होता. लंडनमधील भारतीय दूतावासावर फडकावलेला तिरंगा खलिस्तानी समर्थकांनी खाली उतरवला होता आणि राष्ट्रध्वजाचा अपमान केला. इतकंच नाही तर राष्ट्रध्वज उतरवून त्याजागी खलिस्तानी झेंडा फडकावला. नंतर भारतीय दूतावासाने याला चोख प्रत्युत्तर देत आधीच्या झेंड्यांच्या आकारापेक्षाही मोठ्या आकाराचा झेंडा फडकावला.
अमृतपाल सिंह अजूनही फरार
खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंह अजूनही फरार असून त्याला पकडण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरु असल्याचं पंजाब पोलिसांनी सांगितलं आहे. मात्फर, रार अमृतपाल सिंहला (Amritpal Singh) पंजाब पोलिसांनी (Punjab Police) अटक केल्याचा दावा 'वारिस पंजाब दे' संघटनेच्या वकिलाने केला आहे. 'वारिस पंजाब दे' संघटनेचे वकील इमान सिंह खारा यांनी रविवारी (19 मार्च) दिलेल्या माहितीनुसार, अमृतपाल सिंहला पंजाब पोलिसांनी अटक केल्याचा दावा वकीलाने केला आहे.