Khalistani Protest : विदेशातील भारतीय दूतावासावरील (Indian Embassy) खलिस्तानी (Khalistan) हल्ले सुरुच आहे. अमेरिका (America) आणि कॅनडानंतर (Canada) आता लंडन (London) मध्येही खलिस्तानी समर्थक आक्रमक होताना दिसत आहे. लंडनमध्ये खलिस्तानी समर्थकांकडून रॅली काढण्यात येणार आहे. लंडनमध्ये खलिस्तानी समर्थक काही पोस्टर व्हायरल होत आहेत. या पोस्टरमध्ये भारतीय दूतावास आणि राजदूतांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न असल्याचं दिसून येत आहे. व्हायरल पोस्टरमध्ये 8 जुलै रोजी खलिस्तान समर्थकांना भारतीय दूतावासाबाहेर जमण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. अमेरिकेमधील भारतीय दूतावासावर खलिस्तानी समर्थकांनी हल्ला केला, त्यानंतर आता कॅनडामध्येही खलिस्तानी सक्रीय होताना दिसत आहेत.


कॅनडानंतर लंडनमध्येही खलिस्तान समर्थकांची हल्ल्याची तयारी


अमेरिकेच्या सॅन फ्रान्सिस्कोमधील भारतीय दूतावासात रविवारी जाळपोळ खलिस्तानी समर्थकांनी करत हल्ला केला. आता कॅनडा आणि लंडनमध्ये मोठ्या निदर्शनांची तयारी केली जात आहे. खलिस्तान समर्थकांकडून 8 जुलै रोजी 'किल इंडिया' नावाची रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीमध्ये भारतीय राजदूत आणि भारताचा निषेध केला जाणार आहे. यासाठी सोशल मीडियाचा वापर केला जात आहे. लंडनमधील 'किल इंडिया' रॅलीचे पोस्टर ट्विटरवर व्हायरल झाले आहे. काही निनावी ट्विटर हँडलच्या माध्यमातून हे पोस्टर अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं जात आहे.


हरदीपसिंग निज्जरच्या हत्येचा उल्लेख


काही दिवसांपूर्वी कॅनडातील गुरुद्वाराबाहेर खलिस्तान टायगर फोर्सचा मोठा दहशतवादी हरदीप सिंह निज्जर याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. ही हत्या भारताकडून करण्यात आल्याचा खलिस्तान समर्थकांचा आरोप आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार, लंडनमध्ये ऑनलाइन व्हायरल होत असलेल्या पोस्टरमध्ये हेच लिहिलं आहे. या व्हायरल पोस्टरमध्ये खलिस्तानी समर्थकांना भारतीय दूतावासाबाहेर एकत्र येण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. पोस्टरवर ब्रिटनमधील भारतीय उच्चायुक्त विक्रम दोराईस्वामी आणि बर्मिंगहॅममधील भारताचे महावाणिज्यदूत डॉ. शशांक विक्रम यांचे फोटो आहेत. फोटोंमध्ये त्यांना हत्येसाठी जबाबदार ठरवण्यात आलं आहे.


सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल


सोशल मीडियावर आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीमध्ये अमेरिकेती शीख फॉर जस्टिसचे जनरल वकील गुरपतवंत सिंह पन्नू दावा करत आहे की, जागतिक शीख समुदाय पंजाबला मुक्त करण्यासाठी शांततापूर्ण आणि लोकशाही प्रक्रिया तयार करत आहे. 'निज्जरच्या हत्येला प्रत्येक भारतीय मुत्सद्दी (Indian Diplomat) जबाबदार आहे, मग तो ब्रिटन, अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया किंवा युरोपीय देशांतील असो', असा आरोपही केला आहे.


संबंधित इतर बातम्या :


Watch: खलिस्तानी समर्थकांचा भारतीय दूतावासावर हल्ला; जाळपोळ करण्याचा प्रयत्न, अमेरिकेकडून जाहीर निषेध