Bomb Blast in Karachi : पाकिस्तानच्या (Pakistan) कराचीतील खरादर (Kharadar) भागात सोमवारी संध्याकाळी बॉम्बस्फोट झाला. या दुर्घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला असून 10 पेक्षा अधिक लोक जखमी झाले आहेत. जियो न्यूजच्या रिपोर्टनुसार, हा बॉम्बस्फोट खरदार परिसरात बोल्टन मार्केट या गर्दीच्या ठिकाणा जवळ झाला. सध्या पोलिसांकडून स्फोटामागचं कारण शोधण्यासाठी तपास सुरु आहे. प्राथमिक तपासाच्या अंदाजानुसार, या बॉम्बहल्ल्यात पोलिसांच्या गाडीला लक्ष्य केल्याचं सांगितलं जातं आहे.


डॉन न्यूज टीव्हीवर दाखवल्या गेलेल्या व्हिडीओनुसार, या स्फोटात एक दुचाकी, एक रिक्षा आणि एका पोलिसांच्या वाहनाचं नुकसान झालं आहे. या फुटेजमध्ये लोक आग विझवण्याचा प्रयत्न करतानाही दिसत आहेत. सध्या स्फोटात जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. घटनास्थळी उपस्थित लोकांनी सांगितलं की, स्फोट इतका भयंकर होता की याचा आवाज दूरपर्यंत ऐकू गेला.


एका आठवड्याच्या कालावधीत कराचीमध्ये हा दुसऱ्यांदा झालेला स्फोट आहे. कराचीमध्ये 13 मे रोजी रात्री उशीरा बॉम्बस्फोट झाला होता. हा स्फोटात अनेक गाड्यांचं नुकसान झालं. याचा आवाज दूरपर्यंत ऐकू गेला. हा स्फोट कराचीतील सदर परिसरात झाला. हा स्फोटही बाजारातील गर्दीच्या ठिकाणी झाला.


स्फोटात दोन किलो स्फोटकांचा वापर
आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, या स्फोटामध्ये सुमारे दोन किलो स्फोटकांचा वापर करण्यात आला. याशिवाय अर्धा किलो बॉल बेयरिंगचाही वापर केल्याची माहिती समोर येत आहे. हा स्फोट टायमर लावू करण्यात आला. या स्फोटाची जबाबदारी सिंध आणि बलूचिस्तानमधील अलगाववादी गुटा संघटनेनं घेतली आहे. कराची पोलिसांनी हा दहशतवादी हल्ला असल्याचं म्हटलं आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या