McDonald : फास्टफूडमध्ये लोकप्रिय ब्रँड असलेल्या मॅकडॉनल्ड या फूड जॉईंटचे देखील कोट्यवधी ग्राहक चाहते आहेत. आता मॅकडॉनल्डने  रशियामधील सर्व रेस्टॉरंट्स विकण्याची प्रक्रिया सुरू केली आहे, अशी माहिती कंपनी प्रशासनाकडून देण्यात आली आहे. 30 वर्षांहून अधिक काळानंतर देशातून बाहेर पडण्याचा निर्णय आम्ही घेतला असून याला  युक्रेनवरील आक्रमणाची किनार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.


जगातील सर्वात मोठी फास्ट फूड साखळी असलेल्या मॅक-डीने मार्चमध्ये रशियामधील 847 रेस्टॉरंट्स बंद करण्याचा निर्णय घेतला होता, याचा त्यांना दरमहा $50 दशलक्षचा फटका बसला होता. आता विक्रीनंतर सुमारे $1.2 अब्ज ते $1.4 अब्ज नॉन-कॅश चार्ज नोंदवण्याची अपेक्षा आहे.


मध्य मॉस्कोमधील प्रतिष्ठित पुष्किन स्क्वेअर स्थानासह रशियातील मालमत्ता विकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एके काळी सोव्हिएत युनियनच्या मरणासन्न अवस्थेत अमेरिकन भांडवलशाहीच्या भरभराटीचे प्रतीक असलेले, ही स्टोअर्स 1990 मध्ये देशातील पहिले उघडण्यात आले होते. उद्घाटनाला 5,000 हून अधिक लोक उपस्थित होते.परंतु आता एका प्रतिष्ठित पाश्चात्य ब्रँडची माघार बघायला मिळते आहे..


रशियामधील सर्व रेस्टॉरंट्स स्थानिक खरेदीदाराला विकण्याचा विचार करत असून आम्ही ट्रेडमार्क कायम ठेवणार आहोत असं मॅकडोनाल्ड्सने सांगितले. युक्रेनमधील युद्धामुळे उद्भवलेले मानवतावादी संकट मुळे मॅकडोनाल्ड्सने असा निष्कर्ष काढला आहे की, रशियामधील व्यवसायाची सतत मालकी यापुढे टीकू शकत नाही


इतर अनेक पाश्चात्य कंपन्यांनी त्यांची रशियन मालमत्ता विकण्यास किंवा स्थानिक व्यवस्थापकांकडे सोपवण्यास सहमती दर्शविली आहे कारण ते युक्रेन संघर्षावरील निर्बंधांचे पालन करण्यासाठी आणि क्रेमलिनकडून परदेशी मालकीच्या मालमत्ता जप्त केल्या जातील अशा धमक्यांचा सामना करण्यासाठी झुंजतात. रशियामधील 62,000 कर्मचाऱ्यांना कोणताही व्यवहार पूर्ण होईपर्यंत पगार मिळत राहतील आणि त्यांना कोणत्याही संभाव्य खरेदीदारासोबत भविष्यातील नोकऱ्या मिळतील अशी ग्वाही देखील मॅकडोनाल्ड्सने दिली आहे.


 रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धात दोन्ही देशांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागत आहे. आतापर्यंत अनेकांना त्यांचा जीव देखील गमवावा लागला असून बाजारपेठेवर देखील याचा परिणाम पाहायला मिळत आहे.