Sri Lanka Nationwide Curfew : गेल्या काही दिवसांपासून आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या श्रीलंकेत सोमवारी रात्री आठ वाजल्यापासून मंगळवारी पहाटे पाच वाजेपर्यंत देशव्यापी कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.  आर्थिक संकटामुळे श्रीलंकेत अनेक घडामोडी घडत आहेत. नुकताच पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. 


श्रीलंकेतील माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार,  सोमवारी रात्री आठ ते मंगळवारी पहाटे पाच वाजेपर्यंत देशभरात संचारबंदी लागू असेल. श्रीलंका सध्या स्वातंत्र्यानंतरच्या सर्वात वाईट आर्थिक संकटाचा सामना करत आहे. अन्न, इंधनाचा तुटवडा, महागाई आणि वीज कपातीवरून श्रीलंका सरकारच्या विरोधात मोठ्या प्रमाणात निदर्शने होत आहेत. श्रीलंकेतील बिघडलेली परिस्थिती पाहता भारताने मदतीसाठी आवश्यक गोष्टी पाठवल्या आहेत. 


गेल्या आठवड्यात श्रीलंकेत झालेल्या हिंसाचारात नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. या हिंसाचारानंतर  पोलिसांनी विविध आरोपांखाली दोनशे पेक्षा जास्त लोकांना अटक केली आहे. 






दरम्यान,  श्रीलंकेमध्ये परिस्थिती आता नियंत्रणाबाहेर गेली आहे का? असा सवाल उपस्थित होतोय. तिथे सुरु असलेला हिंसाचार पाहता संरक्षण मंत्रालयाने लष्कराला गोळीबाराचा आदेश दिलाय. जे नागरिक सरकारी मालमत्तेचं नुकसान करत असतील किंवा हिंसाचारामध्ये सहभाग घेत असतील त्यांना थेट गोळ्या घाला, असा आदेश श्रीलंकेच्या संरक्षण मंत्रालयाने लष्कराला दिलाय.


श्रीलंकेत दररोज नव-नवीन घटना घडत आहेत. अलीकडेच राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांना पंतपदावरून दूर करत रानिल विक्रमसिंघे यांना नवे पंतप्रधान बनवले आहे. परंतु, श्रीलंकेच्या आर्थिक संकटासाठी राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांना जबाबदार धरून त्यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या आंदोलकांच्या समर्थनार्थ आता नवे पंतप्रधान विक्रमसिंघे पुढे आले आहेत.  त्यामुळे श्रीलंकेतील वातावरण आणखीनच बिघडत आहे. 


महत्वाच्या बातम्या


Sri Lanka Economic Crisis: श्रीलंकेत सफरचंद 1200, तर द्राक्षे 1800 रुपये; सामान्य नागरिकांच्या अडचणी संपेना