Iran : गेल्या काही दिवसांपासून देशात कर्नाटकातील हिजाब प्रकरणाची चर्चा सुरु आहे. देशात हिजाबसाठी सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा दिला जातोय. आता इस्लामिक देश असलेल्या इराणमध्ये (Iran) हिजाबविरुद्ध चळवळीला सुरुवात झाला आहे. इराणमधील महिला या सध्या इराण पोलीस आणि सरकार विरोधात आंदोलन करत आहेत.
इराणमधील महिला आक्रमक
इराणमध्ये हिजाब परिधान न केल्यानं पोलिसांनी महसा अमिनी नावाच्या महिलेला अटक केली होती. अटकेत असताना महसा अमिनीचा मृत्यू झाला. त्यामुळे आता इराणमधील महिला संतप्त झाल्या आहेत. इराणमधील महिला आता इराण पोलिसांच्या विरोधात रस्त्यावर उतरल्या आहेत. इराण पोलिसांना विरोध दर्शवत इराणमधील महिला या हिजाब जाळत आहेत, तसेच त्या लांब केस देखील कापत आहेत. महसा अमिनीला न्याय मिळण्यासाठी इराणच्या महिला आंदोलन करत आहेत. काही इराणी महिला हिजाब न परिधान करुन महसा अमिनीसाठी न्याय मागत आहेत. आपला संताप व्यक्त करत शनिवारी शेकडो लोकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं. या आंदोलनात महिलांनीही सक्रिय सहभाग घेतला, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटो आणि व्हिडिओमध्ये अनेक महिला चेहऱ्यावरून हिजाब काढून निषेध दर्शवताना दिसत आहेत. सक्केज या महसा अमिनीच्या होम टाऊनमध्ये देखील लोक रस्त्यावर उतरुन सरकारविरोधात आंदोलन करत आहेत. सध्या इराणमध्ये 'नो टू हिजाब' हे कॅम्पेन सुरु आहे.
काय आहे प्रकरण?
महसा अमिनीला हिजाब न परिधान केल्या प्रकरणी इराणच्या पोलिसांनी 13 सप्टेंबर रोजी अटक केली. त्यानंतर पोलीस कोठडीत असताना तिची तब्येत इतकी बिघडली आणि ती कोमात गेली, त्यानंतर महसा अमिनीचा मृत्यू झाला.
इराणमध्ये 1979 साली क्रांती झाली होती, त्यानंतर महिलांना हिजाब घालणे बंधनकारक करण्यात आले. तसेच येथे कायदा आहे की, महिलांनी केस लपवताना डोके आणि मान झाकणारा असा हिजाब घालावा. मात्र आता इराणमध्ये हिबाज विरोधात उठणारे आवाज इस्लामिक कट्टरतावादी राजवटीला आव्हान देऊ लागले आहेत. त्यामुळे हा आवाज दाबण्यासाठी सरकार कठोर पावले उचलताना दिसत आहे.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या :
- Hijab Controversy : हिजाब घालण्यास कोणालाही मनाई नाही, प्रश्न शाळांमधील निर्बंधांचा आहे; सर्वोच्च न्यायालयाचे खडे बोल
- Pakistan Flood : पाकिस्तानमध्ये भीषण पूरस्थिती, जनजीवन विस्कळीत, एक कोटीहून अधिक बालकांचे अन्न-पाण्याविना हाल
- Flood : अमेरिकेसह पाकिस्तान इटलीत पुराचं थैमान, लाखो लोक बेघर, भारतातील काही राज्यातही पूरस्थिती