International Nurses Day 2023 : आज (12 मे) आंतरराष्ट्रीय नर्स दिन. रुग्णांची सेवा करणाऱ्या परिचारिकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी 12 मे हा दिवस आंतरराष्ट्रीय किंवा 'जागतिक परिचारिका दिन' म्हणून साजरा केला जातो. 1971 मध्ये आंतराष्ट्रीय परिचारिका परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. आधुनिक नर्सिंगच्या फाऊंडर लेडी फ्लोरेन्स नायटिंगल यांचा जन्मदिवस जागतिक परिचारिका दिन म्हणून साजरा करण्यात येतो. फ्लोरेन्स नायटिन्गेल यांनी आधुनिक नर्सिंगचा पाया रचला. त्यांच्याच स्मरणार्थ हा दिन साजरा केला जातो.
परिचारिका दिनाचा इतिहास
12 मे 1820 रोजी इटलीच्या फ्लोरेन्समध्ये विल्यम नाईटिंगेल आणि फेनी यांच्या घरात फ्लोरेन्स यांचा जन्म झाला. सुखवस्तू कुटुंबातील असलेल्या फ्लोरेन्स यांचं पालनपोषण इंग्लंडमध्ये झालं. त्यांना वयाच्या 16 वर्षी जाणीव झाली की आपला जन्म सेवेसाठी झाला आहे. गणित, विज्ञान आणि इतिहासात निपुण असलेल्या फ्लोरेन्स यांना नर्स बनायचं होतं. रुग्ण, गरीब आणि पीडितांची त्यांना मदत करायची होती. परंतु वडील त्यांच्या इच्छेच्या विरोधात होते. कारण त्यावेळी नर्स पेशाकडे सन्मानाने पाहिलं जात नसे. फ्लोरेन्स यांनी आपली जिद्द कायम ठेवली आणि 1851 मध्ये त्यांनी नर्सिंगच्या शिक्षणाला सुरुवात केली. 1853 मध्ये त्यांनी लंडनमध्ये महिलांसाठी रुग्णालय सुरु केलं.
1854 मध्ये क्रीमियाचं युद्ध झालं तेव्हा ब्रिटीश सैनिकांना रशियातील क्रीमियामध्ये लढण्यासाठी पाठवलं होतं. ब्रिटन, फ्रान्स आणि तुर्कीचं युद्ध रशियासोबत होतं. युद्धात सैनिक जखमी झाल्याचं आणि मृत पावल्याचं वृत्त समजताच फ्लोरेन्स परिचारिकांचं पथक घेऊन तिथे पोहोचल्या. परिस्थिती अतिशय बिकट होती. अस्वच्छता, दुर्गंधी, साधनांचा तुटवडा, पिण्याचं पाणी नसल्याने आजार वेगाने वाढला आणि प्रादुर्भावामुळे सैनिकांचा मृत्यू झाला. फ्लोरेन्स यांनी रुग्णालयाची परिस्थिती सुधारण्यासोबतच रुग्णांच्या आंघोळीकडे, खाण्यापिण्याकडे, जखमींच्या ड्रेसिंगवर लक्ष दिलं. यामुळे सैनिकांच्या परिस्थितीत अतिशय सुधारणा झाली.
युद्धकाळात फ्लोरेन्स नाईटिंगेल यांनी जखमी आणि आजारी सैनिकांच्या सेवेसाठी दिवसरात्र एकत्र केले. सैनिकांच्या वतीने त्यांच्या कुटुंबाला त्या पत्र पाठवत असत. रात्रीच्या वेळी हातात लालटेन घेऊन त्या रुग्णांची विचारपूस करत असत, त्यांची देखभाल करायच्या. यामुळे सैनिक प्रेम आणि आदराने त्यांना 'लेडी विद लॅम्प' म्हणायचे. 1856 मध्ये युद्धानंतर परतल्यानंतर याच नावाने त्या प्रसिद्ध झाल्या.
13 ऑगस्ट, 1919 रोजी फ्लोरेन्स नाईटिंगेल यांचं निधन झालं. फ्लोरेन्स यांच्या नायटिन्गेल यांच्या सन्मानार्थ त्यांचा जन्मदिवस हा परिचारिका दिवस म्हणून साजरा करण्यास सुरुवात झाली. या खास निमित्ताने नर्सिंग क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या परिचारिकांना फ्लोरेन्स नाईटिंगेल पुरस्काराने सन्मानित केलं जातं.