Important Days in May 2023 : अवघ्या दोन दिवसांवर मे महिना येऊन ठेपला आहे. मे महिना खरंतर सुट्ट्यांचा महिना म्हणून ओळखला जातो. पण त्याचबरोबर या महिन्यात महाराष्ट्र दिन, बुद्ध पौर्णिमा, संकष्ट चतुर्थी साजरी केली जाणार आहे. पण, त्याचबरोबर अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सणांबरोबरच थोर महापुरुषांच्या जयंती आणि पुण्यतिथी देखील या महिन्यात आहेत. हे दिवस नेमके कोणते ते जाणून घेऊयात.  


1 मे - महाराष्ट्र दिन (Maharashtra Day)


महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याचा निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो. 1 मे 1960 रोजी स्वतंत्र महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. हा दिवस मराठी माणसाचा आहे आणि तो मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशी ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या 106 हुतात्म्यांचे स्मरण या दिवशी केले जाते.


1 मे - जागतिक कामगार दिन (World Labour Day)


जागतिक कामगार दिन हा जगभरातील कामगार चळवळींच्या गौरवासाठी साजरा केला जाणारा दिवस आहे. हा दिवस साजरा करण्यास 1 मे 1886 साली सुरुवात झाली. कोणत्याही समाजाच्या आणि देशाच्या विकासात कामगारांची भूमिका महत्वपूर्ण राहिली आहे. कामगारांच्या या योगदानाची दखल घेऊन त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून जगभर 1 मे या दिवशी कामगार दिवस साजरा केला जातो. जगभरातील 80हून अधिक देशांमध्ये हा दिवस राष्ट्रीय सुट्टीचा दिवस म्हणून पाळला जातो.


1 मे - मोहिनी एकादशी 


वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला मोहिनी एकादशीचा उपवास ठेवला जातो. या दिवशी विष्णु देवाची मोहिनी स्वरूपात पूजा केली जाते. या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने सर्व पाप आणि दु: खांपासून मुक्ती मिळते. या दिवशी व्रत कथासाराचे पठण केल्याने पुण्य लाभते असे म्हणतात.


2 मे - जागतिक अस्थमा दिन (World Asthma Day) 


दरवर्षी मे महिन्यात येणारा पहिला मंगळवार हा 'जागतिक अस्थमा दिन' मानला जातो. अस्थमा या आजाराविषयी जागरुकता निर्माण व्हावी म्हणून 'ग्लोबल इनिशिएटीव्ह फॉर अस्थमा' (GINA) या संस्थेतर्फे याचे आयोजन केले जाते.


3 मे - जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिन (World Press Freedom Day) 


'जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन दरवर्षी 3 मे रोजी जागतिक स्तरावर साजरा करण्यात येतो. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेमार्फत 1993 मध्ये जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिनाची स्थापना करण्यात आली होती.


4 मे - आंतरराष्ट्रीय अग्निशमन दिवस (International Firefighter’s Day)


आंतरराष्ट्रीय अग्निशमन दिवस (IFFD) दर वर्षी 4 मे रोजी साजरा केला जातो. पहिल्यांदा 1999 मध्ये हा दिवस साजरा केला गेला होता. याचा मुख्य उद्दिष्ट आपले प्राण पणाला लावून वन्यजीवांचे प्राण वाचविणाऱ्या फायर फायर्ट्सचा सन्मान आणि आभार मानणे हा आहे. या साहसी कामामध्ये बरेच सैनिकही मरण पावले आहेत.


4 मे - श्री नृसिंह जयंती 


नृसिंह अवतार हा विष्णूच्या दशावतारांपैकी चौथा अवतार मानला जातो. वैशाख शुद्ध चतुर्दशीला हिरण्यकश्यपू या राक्षसाच्या नाशासाठी देवांच्या विनंतीवरूनच विष्णूंनी हा अवतार घेतला. अशी आख्यायिका प्रचलित आहे. नृसिंह जयंती व्रत वैशाख शुक्ल पक्षाच्या चतुर्दशीला असते. यंदा 4 मे 2023 रोजी गुरुवारी नृसिंह जयंती आहे. 


5 मे - बुद्ध पौर्णिमा (Buddha Purnima)


बुद्ध जयंती किंवा बुद्ध पौर्णिमा हा बौद्ध धर्मीयांचा सर्वात महत्त्वाचा सण आणि उत्सव आहे. हा सण जगभरात विशेषतः भारतात वैशाख पोर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो. हा दिवस गौतम बुद्धांची जयंती आणि त्यांचा निर्वाण दिवस देखील आहे. भगवान बुद्धांना या दिवशी ज्ञानप्राप्ती झाली. आपल्या मानवतावादी आणि विज्ञानवादी धम्म सिद्धांतामुळे तथागत बुद्धांना जगातील महापुरुष आणि गुरू मानले जाते. बौद्ध धर्मीयांची मोठ्या प्रमाणावर संख्या असणाऱ्या चीन, जपान, व्हियेतनाम, थायलंड, भारत, म्यानमार, श्रीलंका, सिंगापूर, अमेरिका, कंबोडिया, मलेशिया, नेपाळ, इंडोनेशिया या देशांसह सुमारे 180 देशांतील बौद्ध लोक हा सण उत्साहात साजरा करतात. यातील अनेक देशांत बुद्ध जयंतीची सार्वजनिक सुट्टी असते. 


6 मे - नारद जयंती 


नारद मुनी हे देवांचे दूत असल्याचे म्हटले जाते. अशाच जगातील प्रथम निर्माते, देवर्षि नारद मुनी यांची जयंती देशभर साजरी केली जाते. यंदा 6 मे रोजी नारद जयंती साजरी केली जाणार आहे. दरवर्षी वैशाख महिन्यातील कृष्ण प्रतिपदावर नारद जयंती साजरी केली जाणार आहे.


7 मे - जागतिक हास्य दिन (World Laughter Day)


जागतिक हास्य दिन दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या रविवारी साजरा केला जातो. हा दिवस पूर्णपणे हसण्यासाठी आणि हसण्यासाठी समर्पित आहे. या दिवशी देश-विदेशात विविध प्रकारच्या विनोदी स्पर्धांचे आयोजन केले जाते. सर्व लोकांच्या मानसिक आणि शारीरिक विकासासाठी हसणे खूप फायदेशीर आहे.


8 मे - संकष्ट चतुर्थी - चंद्रोदय 09.53


प्रत्येक मराठी महिन्याच्या वद्य चतुर्थी दिनी संकष्ट चतुर्थी साजरी केली जाते. गणेश भक्त या दिवशी संपूर्ण दिवस उपवास करतात. गणपतीचे नामस्मरण करून संकष्ट चतुर्थी व्रत केले जाते. गणेश भक्तांसाठी संकष्ट चतुर्थीला विशेष महत्त्व असते. या दिवशी चंद्रोदयानंतर उपवास सोडला जातो. त्यानंतर वेळेनुसार चंद्रोदय झाल्यानंतरच नैवेद्य दाखवला जातो. यानंतर गणेशभक्त उपवास सोडतात. 


8 मे -  रवींद्रनाथ टागोर जयंती


रवींद्रनाथ टागोर हे जगप्रसिद्ध भारतीय कवी, कलावंत, शिक्षणतज्ज्ञ आणि तत्त्वचिंतक होते. ज्यांना गुरुदेव असे ही संबोधले जाते. हे एक ब्राह्मोपंथीय, चित्रकार, नाटककार, कादंबरीकार, बंगाली कवी, संगीतकार आणि समाजसुधारक होते. 19 व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि 20 व्या शतकाच्या प्रारंभी यांच्या कार्यामुळे बंगाली साहित्य आणि संगीतात आमूलाग्र बदल घडून आला. रवीद्रनाथांनी रचलेल्या 'जन गण मन' आणि 'आमार शोनार बांग्ला' ह्या रचना अनुक्रमे भारत आणि बांग्लादेश यांची राष्ट्रगीते म्हणून स्वीकारण्यात आल्या आहेत.


8 मे - जागतिक रेडक्रॉस दिन (World Redcross Day)


रेडक्रॉस ही एक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्था आहे. ही संस्था गरजूंना आपातकाळी सेवा देते. संस्था रुग्ण, युद्धात घायाळ, नैसर्गिक आपत्तीमध्ये अडकलेले असलेल्या  लोकांना जीवनदान देण्याचे तसेच घायाळांवर वैद्यकीय उपचार करून त्यांना मदत करण्याचे कार्य करते. रेड क्रॉस मोहिमेस जन्म देणारे जीन हेनरी ड्यूनेन्ट यांचा जन्म 8 मे 1828 रोजी झाला होता. त्यांचा जन्मदिनाला संपूर्ण विश्वात रेडक्रॉस दिन म्हणून साजरे केले जाते. जागतिक रेडक्रॉस दिनाला आंतरराष्ट्रीय स्वयं सेवक दिन म्हणून देखील साजरे केले जाते. ही संस्था तब्बल 150 वर्षांपासून काम करीत आहे.


8 मे - जागतिक थॅलेसेमिया दिन (World Thalassaemia Day)


दरवर्षी 8 मे रोजी जगभरात 'जागतिक थॅलेसेमिया दिन' साजरा केला जातो. थॅलेसेमिया हा रक्ताशी संबंधित आजार आहे, जो अनुवांशिक आहे. हा आजार पालकांकडून पिढ्यानपिढ्या संक्रमित होतो. लहानपणापासून लहान मुलांना होणाऱ्या या आजारात मुलांना वारंवार रक्तपेढीत न्यावे लागते. या आजारात रुग्णाला गरजेपेक्षा जास्त रक्त मिळू लागते, त्यामुळे बाहेरून रक्त आणावे लागते. रक्ताच्या कमतरतेमुळे रुग्णाच्या शरीरात हिमोग्लोबिन तयार होत नाही आणि त्यांना अॅनिमिया होतो. रुग्णाला जगण्यासाठी दर दोन ते तीन आठवड्यांनी रक्त चढवावे लागते. 1994 साली प्रथमच 'जागतिक थॅलेसेमिया दिन' साजरा करण्याचा विचार करण्यात आला. त्याच वर्षी, इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ थॅलेसेमियाने 8 मे हा दिवस थॅलेसेमियाच्या रुग्णांना समर्पित केला होता आणि या आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांच्या संघर्षाबद्दल सर्वसामान्यांमध्ये जागृती करण्यासाठी या दिवसाची स्थापना करण्यात आली होती. 


9 मे - महाराणा प्रताप जयंती (तारखेप्रमाणे) 


महाराणा प्रताप हे सध्याच्या राजस्थान राज्यातील उत्तर-पश्चिम भारतातील मेवाडचे तेरावे सर्वात महान राजा होते. मुघल साम्राज्याच्या विस्तारवादाविरुद्धच्या लष्करी प्रतिकारासाठी ते प्रसिद्ध होते. भारतातील संपूर्ण मुघल साम्राज्य गुढग्यावर आणून देशाचे प्रथम स्वातंत्र्यता सेनानी म्हणून ओळखले जाणारे हेच ते महापराक्रमी वीर हिंदसूर्य महाराणा प्रताप.  9 मे रोजी यांची तारखेप्रमाणे जयंती साजरी केली जाते. 


11 मे - राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस  (National Technology Day (India)


1998 साली आजच्याच दिवशी भारताने केलेल्या अणुचाचणीने आपल्या तंत्रज्ञानातील प्रगती जगाला दिसून आली. पोखरण अणुचाचणीची घटना साजरी करण्यासाठी 11 मे हा दिवस राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस म्हणून देशभरात साजरा केला जातो. अणुचाचणी तंत्रज्ञानातील प्रगतीचे प्रतीक म्हणून दरवर्षी ‘राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस’ साजरा केला जातो. 11 मे 1998 रोजी भारताने एरोस्पेस अभियंता आणि दिवंगत माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या मार्गदर्शनाखाली राजस्थान येथील भारतीय लष्कराच्या पोखरण चाचणी क्षेत्रात शक्ती-I या आण्विक क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वीपणे पार पाडली. 


12 मे - जागतिक परिचारिका दिन (International Nurses Day)


रुग्णांची सेवा करणाऱ्या परिचारिकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी 12 मे हा दिवस आंतरराष्ट्रीय किंवा 'जागतिक परिचारिका दिन' म्हणून साजरा केला जातो. 1971 मध्ये आंतराष्ट्रीय परिचारिका परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. आधुनिक नर्सिंगच्या फाऊंडर लेडी फ्लोरेन्स नायटिंगल यांचा जन्म ज्या तारखेला झाला, तो दिवस जागतिक परिचारिका दिवस म्हणून घोषित करण्यात आला. तेव्हापासून संपूर्ण जगात 12 मे हा दिवस जागतिक परिचारिका दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.


15 मे - आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन (International Day of Families)


संयुक्त राष्ट्रसंघाद्वारे (United Nations) दरवर्षी 15 मे रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन (International Family Day) साजरा केला जातो. आरोग्य, शिक्षण, लैंगिक समानता, मुलांचे हक्क आणि सामाजिक समावेश यांसारख्या कुटुंबांच्या कल्याणासाठी केंद्रस्थानी असलेल्या महत्त्वाच्या बाबींवर प्रकाश टाकण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. 


15 मे - अभिनेत्री माधुरी दीक्षितचा जन्म 


माधुरी दीक्षितचा जन्म 15 मे 1967 रोजी मुंबईत एका मराठी कुटुंबात झाला. बॉलिवूडची धक् धक् गर्ल म्हणून माधुरी दीक्षितची विशेष ओळख आहे. 80 आणि 90 च्या दशकात, माधुरीने स्वतःला हिंदी चित्रपटसृष्टीतील एक आघाडीची अभिनेत्री आणि सुप्रसिद्ध नृत्यांगना म्हणून स्वत:ला सिद्ध केलं. माधुरीला आजवर अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. यापैकीच भारत सरकारचा चौथा सर्वोच्च नागरी सन्मान "पद्मश्री" नेही माधुरीला सन्मानित करण्यात आले आहे. 


17 मे - जागतिक उच्च रक्तदाब दिन (World Hypertension Day)


उच्च रक्तदाबाला हायपर टेन्शन (Hypertension) असं देखील म्हणतात. सध्याच्या जगात अनेक जण या समस्येमुळे त्रस्त आहेत. या समस्यावर वेळीच नियंत्रण ठेवले गेले नाही तर उच्च रक्तदाबामुळे हृदयविकाराचा झटका, पक्षाघात किंवा हृदयाशी संबंधित दुसऱ्या कोणत्याही समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने रक्तदाब नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे. ही समस्या अनेक नागरिकांना असल्यानेच आणि त्याबाबत जागरूकता निर्माण व्हावी म्हणून दरवर्षी 17 मे रोजी जागतिक उच्च रक्तदाब दिन साजरा केला जातो.


18 मे - जागतिक संग्रहालय दिन (International Museum Day)


जगभरात 18 मे हा दिवस जागतिक संग्रहालय दिवस म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. 1977 सालापासून जगभरात हा दिवस साजरा केला जातो. दरवर्षी आंतरराष्ट्रीय संग्रहालय कौन्सिल यांच्यामार्फत जगभरात विविध कार्यक्रमाचे आयोजन जागतिक संग्रहालय दिवसाच्या निमित्ताने केले जाते.


18 मे - जागतिक एड्स लसीकरण दिन (World AIDS Vaccine Day)


दरवर्षी 18 मे हा जागतिक एड्स लसीकरण दिन म्हणून साजरा केला जातो. एड्स लसीकरणासाठी लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी या दिवसाचे आयोजन करण्यात आले आहे. एड्ससारख्या रोगासाठी लसी शोधलेल्या शास्त्रज्ञांचे आभार मानण्यासाठी देखील हा दिवस साजरा केला जातो. एड्स सारख्या आजरावर उपचार शक्य आहे लोकांना याबद्दल विश्वास ठेवणे आवश्यक आहे व या दिवशी विविध संस्था, चिकित्सक मिळून हेच काम करतात. 1997 मध्ये 18 मे रोजी मॉर्गन स्टेट युनिव्हर्सिटीत अमेरिकेचे अध्यक्ष बिल क्लिंटन यांनी भाषण केले. त्याआधारे जागतिक एड्स लसीकरण दिन साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. 


22 मे - महाराणा प्रताप जयंती (तिथीप्रमाणे)


महाराणा प्रताप हे सध्याच्या राजस्थान राज्यातील उत्तर-पश्चिम भारतातील मेवाडचे तेरावे सर्वात महान राजा होते. मुघल साम्राज्याच्या विस्तारवादाविरुद्धच्या लष्करी प्रतिकारासाठी ते प्रसिद्ध होते. भारतातील संपूर्ण मुघल साम्राज्य गुढग्यावर आणून देशाचे प्रथम स्वातंत्र्यता सेनानी म्हणून ओळखले जाणारे हेच ते महापराक्रमी वीर हिंदसूर्य महाराणा प्रताप. 22 मे रोजी यांची तिथीप्रमाणे जयंती साजरी केली जाते. 


22 मे - आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन (International Day for Biological Diversity)


आज आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन आहे. तो दरवर्षी 22 मे रोजी जगभरात साजरा केला जातो. लोकांना जैवविविधतेची जाणीव करून देणे हा त्याचा मुख्य उद्देश आहे. जिवंत जगाच्या हिताच्या दृष्टीने त्याचे अनेक महत्त्व आहे. याची सुरुवात 90 च्या दशकात झाली होती जेव्हा 1992 मध्ये रिओ दि जानेरो, ब्राझील येथे संयुक्त राष्ट्रसंघाच्या पुढाकाराने "पृथ्वी परिषद" आयोजित करण्यात आली होती. त्या परिषदेत पर्यावरण रक्षणावर विशेष भर देण्यात आला. पुढच्या वर्षी 1993 मध्ये 29 डिसेंबरला पहिल्यांदा जैवविविधता दिन साजरा करण्यात आला. संयुक्त राष्ट्र संघाने सुरू केलेला जैवविविधता दिवस 29 डिसेंबर 2000 पर्यंत साजरा केला जात होता. त्यानंतर 2001 पासून तो 22 मे रोजी साजरा केला जातो. 


23 मे - विनायक चतुर्थी (अंगारक योग)


कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी ही 'संकष्टी चतुर्थी' म्हणून ओळखली जाते आणि शुक्ल पक्षातील चतुर्थी 'विनायक चतुर्थी' म्हणून ओळखली जाते. मे महिन्याच्या शेवटी म्हणजेच 23 मे ला विनायक चतुर्थी येत आहे. पंचांगानुसार ज्येष्ठ शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला विनायक चतुर्थी व्रत पाळले जाते. या दिवशी श्रीगणेशाची पूजा करण्याबरोबरच उपवास ठेवला जातो. या दिवशी गणपतीची पूजा केल्याने सर्व संकट दूर होतात, असा विश्वास आहे.


25 मे - गुरुपुष्यामृत योग सकाळी 06.04 पासून सायंकाळी 05.52 पर्यंत 


प्रत्येक वर्षाची काहीतरी वैशिष्ट्य असतात. मराठी 'शोभन नाम संवत्सर' या नवीन वर्षाबाबत जर बोलायचं झालं तर यावर्षी सहा गुरुपृष्यामृताचे योग आहेत. या योगावर लोक अनेक वस्तूंची खरेदी करतात. या दिवशीचा शुभ योग सकाळी 06.04 पासून सुरु होतो तो सायंकाळी 05.52 पर्यंत असेल.


26 मे - झाशीची राणी लक्ष्मीबाई पुण्यतिथी 


राणी लक्ष्मीबाई यांचे संपूर्ण नाव लक्ष्मीबाई गंगाधरराव नेवाळकर. या एकोणिसाव्या शतकातील झाशी राज्याच्या राणी होत्या. भारतात इ.स. 1857 च्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीविरुद्ध झालेल्या स्वातंत्र्य उठावातील या एक अग्रणी सेनानी होत्या. त्यांच्या शौर्याने त्यांना ‘क्रांतिकारकांची स्फूर्तिदेवता’ म्हणून जनमानसात अढळ स्थान प्राप्त झाले आहे. 26 मे रोजी राणी लक्ष्मीबाई यांची पुण्यतिथी आहे.


28 मे - स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती 


विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म 28 मे 1883 रोजी भागलपूरच्या नाशिक जिल्ह्यातील एका सामान्य हिंदू ब्राह्मण कुटुंबात झाला. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील आघाडीचे नेते होते. हिंदू राष्ट्रवादी विचारसरणीचे नेते म्हणून त्यांची ओळख होती. सावरकरांवर रशियन क्रांतिकारकांचा जास्त प्रभाव होता. लहानपणापासूनच त्यांना देशप्रमाची आवड होती. देशासाठी त्यांनी तुरुंगवासही भोगला आहे. 


29 मे - अभिनेते पंकज कपूर यांचा जन्मदिन.


29 मे 1954 साली ज्येष्ठ अभिनेते पंकज कपूर यांचा जन्म झाला. पंकज कपूर हे एक भारतीय अभिनेते आहेत. त्यांनी आजवर अनेक हिंदी थिएटर, टेलिव्हिजन आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. आतापर्यंतच्या कारकिर्दीत त्यांना एक फिल्मफेअर पुरस्कार आणि तीन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांसह ते अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांची 'ऑफिस ऑफिस' ही मालिका प्रचंड लोकप्रिय झाली. तसेच इंस्पेक्टर पीके राख (1989), एक डॉक्टर की मौत (1991) मधील डॉ. दीपांकर रॉय आणि विशाल भारद्वाजच्या मॅकबेथच्या रूपांतरातील अब्बा जी (शेक्सपियरच्या किंग डंकनवर आधारित) या त्यांच्या आतापर्यंतच्या सर्वाधिक गाजलेल्या भूमिका आहेत.


30 मे - गोवा राज्य दिन 


गोवा हे भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात छोटे आणि लोकसंख्येच्या दृष्टीने चौथे छोटे (सिक्कीम, मिझोरम आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांनंतरचे) राज्य आहे. ते भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर असून, त्याच्या उत्तरेला महाराष्ट्र, पूर्व व दक्षिणेला कर्नाटक ही राज्ये, तर पश्चिमेला अरबी समुद्र आहे. 30 मे 1987 रोजी गोव्याला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला. गोवा राज्याला एक अलौकिक असा सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. गोव्यात पोर्तुगाली संस्कृतीचा विशेष पगडा दिसून येतो.


30 मे - अभिनेते परेश रावल यांचा जन्मदिन.


बॉलिवूड अभिनेते परेश रावल यांचा 30 मे 1950 रोजी झाला. परेश रावल यांनी निभावलेल्या अनेक भूमिका लोकप्रिय ठरल्या. त्यापैकी हेरा फेरी या चित्रपटातील बाबूराव ही भूमिका प्रचंड लोकप्रिय ठरली. 2014 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 1994 मध्ये सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. यानंतर त्यांना सर्वोत्कृष्ट कॉमेडियनचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला आहे. केतन मेहता यांच्या सरदार या चित्रपटात ते स्वातंत्र्यसैनिक वल्लभभाई पटेल यांच्या मुख्य भूमिकेत दिसले होते. 


31 मे - निर्जला एकादशी 


दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला निर्जला एकादशी व्रत पाळले जाते. ज्येष्ठ महिन्यात जलपूजन करणे महत्वाचे आहे कारण या महिन्यात सूर्यदेवाची तेज तीव्र असते त्यामुळे उष्णता अधिक वाढते. निर्जला एकादशी व्रताला पांडव एकादशी किंवा भीमसेनी एकादशी असेही म्हणतात. या एकादशीच्या व्रताचे पुण्य सर्व तीर्थयात्रा आणि दानापेक्षा अधिक असल्याचे सांगितले जाते. 


31 मे - अहिल्याबाई होळकर जयंती 


मराठी साम्राज्याची राणी म्हणून नावलौकिक मिळवलेल्या, पहिली स्त्री ज्यांनी स्त्रियांची सेना बनवून नारी शक्तीचा परिचय जगाला करून दिला, एक अतिशय योग्य शासक आणि संघटक न्यायप्रियता, पराक्रमी योद्धा अशी ओळख असलेल्या, तसेच होळकर घराण्याचा 'मान' म्हूणन ओळखल्या जाणाऱ्या महाराणी राजमाता अहिल्याबाई होळकर यांची जयंती 31 मे रोजी साजरी केली जाते.


31 मे - जागतिक तंबाखू विरोधी दिन (Anti-Tobacco Day)


हा दिवस 31 मे रोजी पाळण्याचा उद्देश हा की जगभर हानिकारक तंबाखूचे दुष्परिणाम पोहोचावेत आणि लोकांनी हे व्यसन सोडावे. जागतिक आरोग्य संघटनेने हा दिवस साजरा करण्याचे ठरवले आणि चर्चेअंती त्यांनी 1987 साली यावर अंतिम ठराव संमत केला. जागतिक आरोग्य संघटनेने 1988 सालापासून दरवर्षी 7 एप्रिल रोजी 'वर्ल्ड नो टोबॅको डे' पाळला जाईल अशी घोषणा केली, या तारखेला जागतिक आरोग्य संघटनेला 40 वर्षे पूर्ण होत होती म्हणून हा दिवस ठरविण्यात आला. परंतु, काही कारणास्तव हा दिवस बदलण्यात आला आणि 31 मे हा दिन निश्चित करण्यात आला. म्हणून 1988 सालापासून दर 31 मे रोजी 'वर्ल्ड नो टोबॅको डे' पाळण्यात येतो.


महत्त्वाच्या बातम्या :


Important Days in April 2023 : 'एप्रिल फूल डे', 'अक्षय्य तृतीया', 'रमजान ईद'सह एप्रिल महिन्यातील 'हे' आहेत महत्त्वाचे दिवस; वाचा संपूर्ण यादी