मुंबई : केनियात पोलिसांच्या गैरसमजातून घडलेल्या गोळीबारात भारतीय वंशाच्या नागरिकाला जीव गमवावा लागला आहे. शनिवारी केनियातील नैरोबीमध्ये ही घटना घडली. 32 वर्षीय बिझनेसमन बंटी शाहचा या घटनेत मृत्यू झाला.


भारतीय वंशाचा केनियन नागरिक असलेला बंटी शाह बॉबमिल इंडस्ट्रीजमध्ये नोकरी करत होता. शनिवारी पहाटे तीन वाजताच्या सुमारास केनियाची सुरक्षा यंत्रणा दहशतवादविरोधी ऑपरेशन पार पाडत होती. बंटीच्या घराशेजारीच हे ऑपरेशन सुरु होतं.

गोळीबाराचा आवाज ऐकून बंटीला जाग आली. चोरट्यांनी गोळी झाडल्याचा समज करुन त्यानेही प्रत्युत्तरादाखल हवेत गोळीबार केला. बंटीच्या गोळीचा आवाज ऐकून एखाद्या गुन्हेगाराने फायरिंग केल्याचा सुरक्षा यंत्रणांचा समज झाला. त्यामुळे त्यांनी बंटीच्या दिशेने गोळी झाडली, त्यात त्याचा मृत्यू झाला.

परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी ट्विटरवरुन या प्रकाराची माहिती दिली. स्वराज यांनी केनियातील भारतीय दूतावासाकडून या प्रकरणाचा अहवाल मागवला आहे. केनियन पोलिसांनी या घटनेबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे. केनियामध्ये भारतीय वंशाचे सुमारे 80 हजार नागरिक राहतात.