रियाद : सौदी अरबमधील राजपुत्र मन्सूर बिन मुकरीन यांचा यमेन बॉर्डरजवळ हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाल्याचं वृत्त समोर येत आहे. राजपुत्र मन्सूर यांच्यासह हेलिकॉप्टरमध्ये अनेक अधिकारीही होते. त्यांचाही या अपघातात मृत्यू झाल्याचं समजतं आहे. या अपघाताचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, राजपुत्र मन्सूर हे आपल्या अधिकाऱ्यांसोबत दक्षिण-पश्चिम भागातील निरीक्षण दौऱ्यावर होते. त्याचवेळी झालेल्या हेलिकॉप्टरला अपघातात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
दुसरीकडे, आज सौदी अरबमध्ये एक मोठी राजकीय उलथापालथही सुरु आहे. सौदी अरबचे राजपुत्र मोहम्मद बिन सलमान यांनी भ्रष्टाचारविरोधी आयोगाचं गठन करुन प्रमुख उद्योजकांसह 11 राजपुत्र आणि अनेक आजी-माजी मंत्र्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक केली आहे.