Daughter's Day 2021 : बाप असणं ही सर्वांसाठी आनंदाची गोष्ट आणि त्यातही एका लेकीचा बाप असणं ही अभिमानाची आणि भाग्याची गोष्ट. भारतीय संस्कृतीत मुलीला देवीचं, लक्ष्मीचं रुप मानलं जातंय. तिच्या आगमनाने आपले घर-अंगण आनंदाने आणि समाधानाने भरून जातं. तिच्या मोहक हास्याने आणि बडबडीने केवळ घरच नव्हे तर आई-वडिलांचे जीवन प्रकाशमय होतं. आज इंटरनॅशनल डॉटर्स डे अर्थात आंतरराष्ट्रीय कन्या दिन साजरा करण्यात येतोय. 


'डॉटर्स डे'चा इतिहास
दरवर्षी सप्टेंबर महिन्याच्या चौथ्या रविवारी डॉटर्स डे म्हणजे मुलींचा दिवस साजरा केला जातो. जगभरात अनेक देशात, विशेषत: विकसनशील आणि मागास देशात आजही मुलींना दुय्यम स्थान दिलं जातं. मुलगाच हवा या हट्टापायी मुलीला गर्भातच मारलं जातं. त्यामुळे जगभरात जनजागृती करण्यासाठी संयुक्त राष्ट्राने 2012 साली पहिल्यांदा डॉटर्स डे साजरा करायचं ठरवलं. 


केवळ आजच्या दिवशी डॉटर्स डे साजरा करायचा का? केवळ आजच्या दिवशी मुलींचा सन्मान करायचा का? प्रत्येक दिवस हा मुलीच्या सन्मानाचा असायला हवा. मात्र भारतासारख्या देशात आजही मुलींना दुय्यम वागणूक दिली जाते, तिचा जन्म नाकारला जातो. 


मुलगी म्हणजे चूल आणि मूल ही संकल्पना आज मोठ्या प्रमाणात बदलली आहे. जे लोकं आजही मुलीला कमी लेखतात त्यांना मुली कमजोर नसतात याची जाणीव करुन देण्याचा हा दिवस आहे. आपण आजूबाजूला अशी अनेक उदाहरणं पाहतो की मुलांनी आईवडिलांना वाऱ्यावर सोडलं, मात्र मुलींनी त्यांच्या आई-वडिलांची काळजी घेतलीय. अशी अनेक उदाहरणं पाहायला मिळतात जिथं मुलगी आयुष्यभर आपल्या आईवडिलांचा सांभाळ करते.


आजही जगात अनेक देशांच्या प्रमुखपदी महिला विराजमान आहेत. अनेक महत्वाच्या संस्थांचं प्रतिनिधित्व मुली करत आहेत. भारतात देखील अनेक राज्यांचा कारभार महिलांच्या हाती आहे. देशातील महत्वाची पदं महिला भूषवत आहेत. महत्वाच्या प्रशासनिक पदांवर महिला अत्यंत चांगलं कर्तव्य बजावत आहेत.


त्यामुळं आपण जर आपल्या मुलींना दुय्यम वागणूक देत असाल, तिला कमजोर समजत असाल तर तो दृष्टीकोन आजच बदला. आपल्या मुलीला तिच्या पायावर उभं राहण्याची संधी द्या, तिच्या पंखांना बळ द्या. ती आपल्यासाठी स्पेशल आहे याची जाणीव तिला करुन द्या.


आजही देशात रोज असंख्य महिला अत्याचाराच्या घटना घडताना दिसतायंत. आपल्या देशात एकीकडे मुलीला देवीचं रुप समजून तिची पूजा केली जाते आणि त्याच वेळी दुसरीकडे तिच्यावर अत्याचार केला जातोय. त्यामुळे समाजात वावरताना मुली सुरक्षित नाहीत. अशावेळी पितृसत्ताक समाजाची मानसिकता बदलण्याची गरज आहे.


संबंधित बातम्या :