Pakistan : पाकिस्तानात इम्रान खान (Imran Khan) यांची सत्तेतून हकालपट्टी झाल्यानंतर अनेक नव्या घडामोडी पाहायला मिळत आहेत. पाकिस्तानात मोठे राजकीय बदलही घडताना दिसत आहेत. नवे पंतप्रधान शाहबाज शरीफ (Shahbaz Sharif) यांच्या सत्ते आल्यानंतर अवघ्या काही दिवसानंतरच मोठे बदल होताना पाहायला मिळत आहेत. शपथविधीनंतर नव्या पंतप्रधानांचं बंधुप्रेम पाहायला मिळत आहे. पंतप्रधन शाहबाज शरीफ यांनी माजी पंतप्रधान नवाज शरीफ (Nawaz Sharif) यांचे डिप्लोमॅटिक पासपोर्ट जारी करण्याचे आदेश दिले आहेत. पंतप्रधान शाहबाज शरीफ माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचे छोटे बंधू आहेत. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांची लवकरच घरवापसी होण्याची शक्यता आहे. मात्र, न्यायालयाच्या शिक्षेमुळे नवाझ शरीफ यांना पाकिस्तानात परतल्यावर थेट तुरुंगात जावं लागणार आहे. 


माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या परतीसाठी त्यांचा डिप्लोमॅटिक पासपोर्ट जारी करण्याचे आदेश पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी दिले आहेत. हे नवे आदेश इम्रान खान यांची सत्तेतून हकालपट्टी झाल्यानंतर आणि शरीफ यांनी पंतप्रधान म्हणून नुकतीच शपथ घेतल्यानंतर अवघ्या काही दिवसातच दिले आहेत. माजी पंतप्रधान नवाझ शरीफ ईदनंतर पाकिस्तानात परतण्याची शक्यता असल्याचा दावा पीएमएल-एनचे ज्येष्ठ नेते जावेद लतीफ यांनी केला आहे. न्यायालयाच्या शिक्षेमुळे नवाझ शरीफ यांना परतताना थेट तुरुंगात जावे लागेल, अशी शक्यता सध्या वर्तवली जात आहे.


नवाझ शरीफ यांना उपचारासाठी पाकिस्तान सोडावे लागले होते. त्यानंतर पाकिस्तान सरकारने त्याच्या पासपोर्टचे नूतनीकरण केले नाही. दरम्यान, डॉक्टरांकडून पाकिस्तानला जाण्याची परवानगी मिळाल्यानंतर आणि देशातील प्रलंबित भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये न्यायालयाकडून दिलासा मिळाल्यानंतर ते ईदनंतर लंडनहून पाकिस्तानात परतण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांना 2017 मध्ये पनामा पेपर्स प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने पदावरून हटवले. त्यानंतर त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप करण्यात आले. माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या नेतृत्वाखालील सरकारने नवाज शरीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावले होते. त्यानंतर नोव्हेंबर 2019 मध्ये लाहोर उच्च न्यायालयाकडून परदेशात उपचारासाठी जाण्याची परवानगी मिळाल्यानंतर ते लंडनला रवाना झाले होते.


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha