Flydubai Incident : फ्लाय दुबईच्या विमानात ओमानच्या को-पायलटला भारतीय वंशाचा पायलट भिडला, 180 प्रवाशांचा जीव वाचवला
Flydubai Incident : फ्लाय दुबई कंपनीचे विमान FZ1073 च्या कॉकपिटमध्ये झालेल्या वादामुळं 180 प्रवाशांची जीव धोक्यात आला होता. या प्रकरणी इस्त्रायलकडून चौकशी सुरु करण्यात आली आहे.

दुबई : दुबईहून इस्त्रायलच्या तेल अवीवला जाणाऱ्या फ्लाय दुबई एअरलाईन्या विमानाच्या कॉकपिटमध्ये दोन पायलटमध्ये झालेल्या वादानं जगभरात खळबळ उडवून दिली आहे. फ्लाय दुबईच्या विमानाच्या कॉकपिटमध्ये काय घडलं यासंदर्भातील माहिती समोर आली आहे. ओमानचा को पायलट फ्लाय दुबईच्या विमानावर नियंत्रण मिळवून ते क्रॅश करण्याच्या तयारीत होता. मात्र, भारतीय पायलट स्मित मच्छार यानं ओमानच्या को पायलटचा प्रयत्न हाणून पाडला.
भारतीय पायलट लढला अन्...
भारतीय पायलट स्मित मच्छार यानं ओमानचा को पायलट विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न करत असताना हस्तक्षेप केला. यामुळं विमान आणि विमानात प्रवास करणारे प्रवासी सुरक्षित राहिले. फ्लाय दुबई एअरलाईनच्या FZ1073 कॉकपिटमध्ये झालेल्या राड्यानंतर विमान सुरक्षितपणे सौदी अरेबियातील ताबुक विमानाकडे वळवण्यात आलं आणि तिथे सुरक्षित लँडिंग करण्यात आलं. विमान लँड होताच प्रवाशांनी आनंदानं टाळ्या वाजवल्या.
सूत्रांच्या माहितीनुसार फ्लाय दुबईच्या विमानाच्या कॉकपिटमध्ये झालेल्या हिंसक घटनेत जखमी झालेला पायलट स्मिच मच्छार आहे. स्मित यानं 2022 मध्ये फ्लाय दुबईत सेवा सुरु केली होती. त्यापूर्वी 10 वर्ष स्पाइसजेटमध्ये पायलट म्हणून काम करत होता. स्मित मच्छार त्याच्या कुटुंबासह दुबईत वास्तव्यास आहे.
फ्लाय दुबईच्या विमानातून 180 लोक प्रवास करत होते. सूत्रांच्या माहितीनुसार इस्त्रायलच्या अधिकाऱ्यांकडून या घटनेचा तपास करण्यात येत आहे. ओमानच्या पायलटला इस्त्रायलला जाणाऱ्या विमानाची जबाबदारी आणि परवानगी कशी मिळाली याचा शोध घेतला जात आहे.
फ्लाय दुबईच्या कॉकपिटमध्ये काय घडलं?
दुबईहून इस्त्रायलच्या तेल अवीवला जाणाऱ्या फ्लाय दुबईचं विमान जॉर्डनवरुन जात होतं, त्याचवेळी विमानातून एटीसीला इमरजन्सी मेसेज पाठवला गेला. आपत्कालीन मेसेज दोन्ही पायलटमध्ये झालेल्या वादासंदर्भात पाठवला गेला होता, असं इस्त्रायलच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं. रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार केिन क्रूनं कॉकपिटमध्ये जाण्यापूर्वीच को पायलटनं कॅप्टन म्हणजेच स्मित मच्छारवर चाकूनं हल्ला केला होता. यानंतर हल्लेखोर को पायलटचा विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न होता, असं म्हटलं जातंय. मात्र, भारतीय वंशाच्या पायलटनं को पायटलटचा प्रयत्न हाणून पाडला.























