Bitcoin : टेस्लाच्या कार खरेदीसाठी आता बिटकॉईनचा वापर करता येणार नाही. टेस्लाने आपल्या कार खरेदीसाठी बिटकॉईनचा पर्याय दिला होता. आता कंपनीने हा निर्णय मागे घेतला असून तशा प्रकारची घोषणा सीईओ इलॉन मस्क यांनी केली आहे. क्रिप्टोकरन्सी ही अनेक स्तरावर वापर करण्याजोगी चांगली कल्पना आहे पण पर्यावरणाच्या ऱ्हासाची किंमत मोजून त्याचा वापर आपण करत नसल्याचं इलॉन मस्क यांनी सांगितलंय.


इलॉन मस्क यांनी आता आपण बिटकॉईनचा वापर करणार नसल्याचं स्पष्ट करताना सांगितलं की, "टेस्लाची कार आता बिटकॉईनच्या माध्यमातून खरेदी करता येणार नाही. बिटकॉईनचा वापर हा पारंपरिक इंधनांच्या व्यवहारांसाठी विशेषत: कोळशाच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारांसाठी मोठ्या प्रमाणात करण्यात येतोय. कोळसा हा कार्बन उत्सर्जनाचे सर्वात मोठं आणि वाईट माध्यम आहे."


इलॉन मस्क यांनी आपल्या ट्वीटच्या माध्यमातून म्हटलंय की, "क्रिप्टोकरन्सी ही अनेक स्तरावर वापर करण्याजोगी चांगली कल्पना आहे. भविष्यातील क्रिप्टोकरन्सीचे ते एक आघाडीचे माध्यम असेल. पण पर्यावरणाच्या ऱ्हासाची मोठी किंमत मोजून आपण त्याचा वापर करू शकत नाही."


इलॉन मस्क यांच्या बिटकॉईन न स्वीकारण्याच्या या निर्णयानंतर बिटकॉईनच्या किंमती 17 टक्क्यांनी घसरल्याचं वृत्त आहे.


 






टेस्लाकडून आता कोणत्याही बिटकॉईची विक्री होणार नसल्याचं इलॉन मस्क यांनी सांगितलं असून आता आपण इतर क्रिप्टोकरन्सीच्या पर्यायांची चाचपणी करत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. इलॉन मस्क गेले काही दिवस डॉजकॉईन या क्रिप्टोकरन्सीचा पुरस्कार करताना दिसत आहेत. 


या आधी टेस्लाची कार बिटकॉईनच्या माध्यमातून खरेदी करता येऊ शकते अशी घोषणा करत कंपनीने आपल्या वेबसाईटवर पेमेंट ऑप्शनमध्ये डॉलरसह बिटकॉईनचा पर्यायही दिला होता.


काही दिवसांपूर्वीच मस्क यांची बिटकॉईनमध्ये मोठी गुंतवणूक
कोरोनाच्या काळात जागतिक अर्थव्यवसस्थेत मंदी असताना बिटकॉईनची किंमत मात्र सातत्याने वाढत राहिली. या काळात जगातल्या अनेक मोठ्या गुंतवणूकदारांनी त्यामध्ये गुंतवणूक केली. टेस्लाच्या इलॉन मस्कनेही यामध्ये 1.5 बिलियन डॉलरची गुंतवणूक केली आहे. त्यानंतर बिटकॉईनच्या किंमतीत वेगाने वाढ झाल्याचं दिसून आलंय. तसेच बीएनवाय मेलन, मास्टरकार्ड या कंपन्यांनीही बिटकॉईनमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे.


भारतात परवानगी नाही
जगामध्ये अनेक देश बिटकॉईनमध्ये गुंतवणूक करत असताना भारतात अजून त्याला परवानगी देण्यात आली नाही. सध्याचे कायदे हे क्रिप्टोकरन्सीच्या वापरासंबंधात अपूर्ण आहेत, त्यामधील संदिग्ध गोष्टींचा सामना करण्यास ते पुरेसे नाहीत. आरबीआय आणि सेबी यांसारख्या नियामक मंडळांकडे क्रिप्टोकरन्सीच्या वापराबाबत निश्चित असे नियम नाहीत. त्यामुळे क्रिप्टोकरन्सीच्या वापरावर थेट नियंत्रण ठेवता येत नाही. या संबंधी लवकरच या संबंधी केंद्र सरकार संसदेत विधेयक आणेल असं केंद्र सरकारच्या वतीनं संसदेत सागण्यात आलं आहे.


आरबीआयने बिटकॉइनसारख्या व्हर्च्युअल करन्सीच्या वापरावर 2018 साली बंदी घातली होती. ती बंदी सर्वोच्च न्यायालयाने उठवली होती.


काय आहे बिटकॉइन?
बिटकॉइन ही एक व्हर्च्युअल करन्सी आहे. डॉलर,रुपया किंवा इतर चलनाचा वापर ज्या पध्दतीनं केला जातो तशाच पध्दतीनं पण डिजिटल स्वरुपात बिटकॉइनचा वापर केला जातो. ऑनलाइन पेमेंटव्यतिरिक्त डॉलर किंवा इतर चलनामध्ये याचे रुपांतर केले जाऊ शकते. याची सुरुवात 2009 साली करण्यात आली आहे. आज याचा वापर ग्लोबल पेमेंट स्वरुपात करण्यात येतोय. याच्या खरेदी आणि विक्रीसाठी एक्सचेंजदेखील आहेत.


भारतात अद्याप बिटकॉइनच्या व्यवहारांना मंजूरी देण्यात आली नाही. बिटकॉइनमधील गुंतवणूक ही भविष्यात सोन्याच्या गुंतवणूकीला पर्याय ठरण्याची शक्यता आहे.


महत्वाच्या बातम्या :