Coronavirus Outbreak : जगभरात पुन्हा कोरोना विषाणूने (Covid19) डोकं वर काढलं आहे. चीनमध्ये (China) कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. त्यानंतर आता अमेरिकेतही (America) कोरोनाचा वाढत आहे. जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीच्या आकडेवारीनुसार, अमेरिकेतील आतापर्यंत संसर्ग झालेल्या एकूण कोरोना रुग्णांची संख्या 100 दशलक्षच्या पुढे पोहोचली आहे. 2020 च्या सुरुवातीस कोरोनाचा उद्रेक झाल्यापासूनची ही सर्वाधिक आकडेवारी आहे. गेल्या आठवड्यापर्यंत अमेरिकेतील एकूण 100,003,814 जणांना कोरोनाची लागण झाली होती तर, एकूण मृत्यू झालेल्यांची संख्या 1,088,236 पर्यंत पोहोचली.


कोरोना महामारी सुरु झाल्यापासून आतापर्यंत कॅलिफोर्नियामध्ये सर्वाधिक 11.6 दशलक्षाहून अधिक कोरोना रुग्ण आढळले आहेत तर, टेक्सास कोरोना रुग्ण संख्येत दुसऱ्या क्रमांकावर असून तिथे 8.1 दशलक्ष रुग्ण आहेत. फ्लोरिडामध्ये 7.3 दशलक्ष आणि न्यूयॉर्कमध्ये 6.5 दशलक्ष रुग्णांना आतापर्यंत कोरोनाबाधित पॉझिटिव्ह आढळले आहेत.


नवीन वर्षात 'या' देशामध्ये जाणं टाळा


नवीन वर्षाची चाहूल लागली आहे. बहुतेक जण यावेळी सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी फिरायला जाता. काही जण देशातच तर काही जण परदेश वारी करत सुट्ट्यांची मज्ज घेतात. जर तुम्हीही नवीन वर्ष साजरं करण्यासाठी परदेशात जाण्याची योजना आखली असेल तर वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तुम्ही खबरदारी बाळगणं फार गरजेच आहे. जगभरात अमेरिका, चीन, जपान आणि दक्षिण कोरियामध्ये कोरोनाचा संसर्ग झपाट्याने पसरत आहे. न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेतही कोरोनाचा संसर्ग होत आहे, पण त्याचं प्रमाण कमी आहे. वाढता कोरोनाचा धोका लक्षात घेता कोरोनाचा उद्रेक होत असलेल्या देशांमध्ये जाणं टाळा आणि तुमच्या आरोग्याची काळजी घ्या.


अमेरिकेतील कोरोनाचा आलेख वाढता


चीननंतर आता अमेरिकेतही कोरोना संसर्गामध्ये मोठी वाढ झाली आहे. ओमायक्रॉनचा सबव्हेरियंट XBB च्या रुग्णांमध्ये उत्तर-पूर्व अमेरिकेत 50 टक्क्यांहून अधिक वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनने (CDC) दिलेल्या माहितीनुसार, 24 डिसेंबर रोजी अमेरिकेमध्ये 18.3 टक्के नवीन कोरोनाबाधित आढळले आहेत. हे प्रमाण मागील आठवड्यात 11.2 टक्के होते.


चीनमध्ये कोरोना संसर्गाचा कहर


चीनमध्ये कोविड-19 विषाणूच्या ओमायक्रॉन प्रकाराचा सबव्हेरियंट BF.7 चा कहर पाहायला मिळत आहे. चीनमध्ये एकाच दिवसात कोरोनाचे 3.7  कोटी रुग्ण सापडले आहेत तर, 18 टक्के लोकसंख्येला कोरोनाची लागण झाली आहे. रुग्णालयांमध्ये जास्त गर्दी वाढली आहे. रुग्णालयांमध्ये उपचारासाठी जागाच शिल्लक नाही, अशी परिस्थिती आहे. लोकांना जमिनीवर ठेऊन उपचार करावे लागत आहेत. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या मृतदेहांचा खच पडला आहे.


दक्षिण कोरियातील कोरोनाची परिस्थिती


मीडिया रिपोर्टनुसार, दक्षिण कोरियातील नवीन कोविड-19 रुग्णांची संख्या शुक्रवारी 75,000 च्या वर पोहोचली. हिवाळ्यात पुन्हा कोरोना विषाणू वेगाने पसरत आहे. एका आठवड्यापूर्वीच्या तुलनेत ही रुग्णवाढ सुमारे 5,600 ने जास्त आहे. दक्षिण कोरियामध्ये शुक्रवारी 75,744 नवीन कोविड-19 संसर्गाची नोंद झाली आहे, यामध्ये परदेशातील 73 जणांचा समावेश आहे. दक्षिण कोरोनामध्ये आतापर्यंत 2,84,66,390 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.