Universal Flu Vaccine : जगभरात दरवर्षी अनेकांना व्हायरल फ्लू (Viral Flu) म्हणजे इन्फ्लुएंझाचा (Influenza) संसर्ग होतो. सध्या अमेरिकेमध्ये व्हायरल फ्लूचा संसर्ग मोठ्या प्रमाणात झाल्याचं पाहायला मिळत आहे. शास्त्रज्ञांनी या इन्फ्लुएंझा विरोधात लढण्यासाठी नवीन लस तयार केली आहे. शास्त्रज्ञांनी दावा केला आहे की, ही लस सर्व प्रकरच्या इन्फ्लुएंझा विरोधात लढण्यासाठी मदत करते. ही 'यूनिव्हर्सल वॅक्सीन' सर्व प्रकारच्या फ्लूवर प्रभावी आहे. लसीच्या एका डोसमध्ये लस प्रभावी असल्याचं समोर आलं आहे. शास्त्रज्ञांनी दावा केला आहे की, ही 'यूनिव्हर्सल वॅक्सीन' 20 स्ट्रेन विरोधात प्रभावी असून या विषाणूंविरोधात लढण्यासाठी तुमची मदत करते.
'यूनिव्हर्सल वॅक्सीन' सर्व प्रकारच्या फ्लूवर प्रभावी
शास्त्रज्ञांच्या अहवालानुसार, ही नवीन लस म्हणजे 'यूनिव्हर्सल वॅक्सीन' सर्व प्रकारच्या फ्लूविरूद्ध रोगप्रतिकारशक्ती निर्माण करू शकते. वैद्यकीय क्षेत्रातील हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. शास्त्रज्ञांचा दावा आहे की, सध्या अस्तित्वात असणाऱ्या फ्लूच्या लसी मानवी शरीरातील चार प्रकारच्या स्ट्रेनवर प्रभावी ठरतात. यापैकी दोन इन्फ्लूएंझा ए स्ट्रेनवर आणि दोन बी स्ट्रेनविरोधात लढण्यासाठी मदत करतात. इन्फ्लूएंझावरील लसी दरवर्षी बदलल्या जातात, पण आता शास्त्रज्ञांनी नव्याने तयार केलेली ही लस सर्व इन्फ्लूएंझा रोगांवर लढण्यासाठी मदत करेल.
अनेक स्ट्रेनचा प्रसार प्राण्यांपासून माणसांमध्ये होतो
काही स्ट्रेन म्हणजे विषाणू मानवी शरीरात संसर्ग झाल्यामुळे ओळखले जातात. तर काही विषाणूंचा संसर्ग प्राण्यामुळे होतो. असे विषाणू प्राण्यांच्या शरीरातून मानवी शरीरात शिरण्याची शक्यता आहे. याबाबत शास्त्रज्ञांकडून भीती व्यक्त केली जाते. प्राण्यांकडून मानवी शरीरात आलेले हे विषाणू मानवी शरीराला कमकुवत करू शकतात. मानवी शरीर हे प्राण्यांमध्ये संक्रमित झालेल्या विषाणूंशी लढण्यास तयार नसते. या विषाणूंविरोधात लढण्यासाठी अधिक रोगप्रतिकारशक्ती लागते. पण आता शास्त्रज्ञांनी तयार केलेली नवीन इन्फ्लूएंझाची ही युनिव्हर्सल लस मानवी शरीरात मजबूत रोगप्रतिकारशक्ती निर्माण करण्यास मदत करेल.
सर्व प्रकारच्या विषाणूंशी लढण्यास सक्षम
शास्त्रज्ञांनी तयार केलेली युनिव्हर्सल लस मानवी शरीराला सर्व प्रकारच्या विषाणूंशी लढण्यासाठी तयार करू शकते. यामुळे गंभीर आजार आणि मृत्यू टाळता येतील. सध्या अनेक प्रकारच्या विविध राष्ट्रीय संस्थांकडून वेगवेगळ्या युनिव्हर्सल लसी तयार करण्याचं काम सुरु आहे. मोठ्या प्रमाणात लसींचं उत्पादन सुरु आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या