नवी दिल्ली : गेल्या दीड वर्षामध्ये कोरोनाने जगभर अक्षरश: धुमाकूळ घातलेला आहे. त्यामुळे अनेक देशांच्या अर्थव्यवस्था जमिनीवर आपटल्या आणि लाखो लोकांचा मृत्यू झाला. मग या कोरोनाच्या विषाणूचा प्रादुर्भाव या आधी झाला होता का असा अनेकांना प्रश्न पडला आणि त्यावर जगभरात संशोधन सुरु झालं. ऑक्सफोर्ड विद्यापीठातही (Oxford University) कोरोना विषाणूच्या इतिहासावर संशोधन सुरु झालं आणि त्यातून एक महत्वाची माहिती समोर आली आहे. कोरोनाचा विषाणू हा काही दशक किंवा शतकं जुना नसून तब्बल 21 हजार वर्षांपूर्वी त्याचं अस्तिस्व होतं असं ऑक्सफोर्डच्या संशोधकांनी दावा केला आहे. (Coronavirus Epidemics first hit more than 21000 years ago).
गेल्या दोन दशकात सार्सच्या या विषाणूने मानवाच्या शरीरात दोन वेळा प्रवेश केला आहे. 2002 ते 2004 या दरम्यान जगात सार्सचा रोग पसरला होता. त्यावेळी या प्रादुर्भावाला SARS-Cov-1 हा विषाणू कारणीभूत होता. त्यानंतर आता या सार्सच्या विषाणूने दुसऱ्यादा मानवी शरीरात प्रवेश केला असून कोरोनाच्या प्रादुर्भावासाठी SARS-Cov-2 हा विषाणू कारणीभूत आहे.
कोरोनाच्या विषाणूवर ऑक्सफोर्ड विद्यापीठात संशोधन सुरु असून त्यात असं दिसून आलंय की कोरोनाच्या महामारीने तब्बल 21 हजार वर्षांपूर्वी पहिल्यांदा आपलं अस्तित्व दाखवलं होतं. कोरोनाच्या या विषाणूचे मूळ हे काही शतकांपूर्वीचं असेल असा अंदाज अनेकांनी व्यक्त केला होता. हे गृहितक ग्राह्य धरुनच यावर संशोधन सुरु झालं. पण संशोधकांनी जो काळ अपेक्षित धरला होता त्यापेक्षा एक-दोन नव्हे तर 30 पट मागे याचं अस्तित्व सापडलं.
कोरोनाच्या विषाणूचं मूळ शोधल्यानंतर हा विषाणू मानवाच्या शरीरात किती काळापर्यंत थांबू शकतो, त्याची तिव्रता किती असू शकते किंवा भविष्यात यापासून आणखी किती धोका असू शकतो अशा अनेक गोष्टींवर प्रकाश पडू शकतो असं प्रो. कात्झोरॅकिस यांनी सांगितलं. प्रो. कात्झोरॅकिस हे या संशोधनाच्या टीमचे प्रमुख आहेत.
या संशोधनाचा एक हिस्सा असणारे महॅन गॅफरी म्हणाले की, "कोरोना विषाणूचे मूळ शोधून काढण्यासाठी आम्ही एक पद्धत शोधून काढली होती. त्यातून असं लक्षात आलं की आताच्या कोरोनाच्या विषाणूचे मूळ हे 21 हजार वर्षांपूर्वीही अस्तित्वात होतं. यामुळे मानवाच्या RNA आणि DNA मध्ये भूतकाळात काय बदल झालेत याचाही अभ्यास करता आला."
संबंधित बातम्या :
- Corona Vaccine : 'बायोलॉजिकल ई'च्या 5 ते 18 वयोगटातील मुलांसाठीच्या लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या चाचणीसाठी DCGI ची मंजुरी
- Coronavirus : भारत आता कोरोनाच्या 'एन्डेमिक' स्थितीत, लोक कोरोनासोबत जगायला शिकलेत: डॉ. सौम्या स्वामिनाथन
- Covid 22 : नवीन सुपर व्हेरिएंट 'कोविड 22' हा डेल्टापेक्षाही अधिक धोकादायक; तज्ज्ञांचा इशारा