काबुल : अफगाणिस्तानमधून अमेरिकेचा शेवटचा सैनिक बाहेर पडला आणि तालिबान्यांनी सत्ता स्थापन करण्यासाठी हालचाल सुरु केली. त्या आधी अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशररफ घणी यांनी देश सोडून पळून जाणं पसंत केलं. अशा स्थितीत अमरुल्ला सालेह यांनी स्वत:ला काळजीवाहू राष्ट्रपती घोषित केलं आणि तालिबान्यांविरोधात लढा पुकारल्याचं दिसतंय. 


कोणत्याही परिस्थितीत आपण तालिबानी दहशतवाद्यांसमोर झुकणार नाही. लाखो अफगाणी नागरिकांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे त्याला मी कधीच तडा जाऊ देणार नाही असा पण करत अमरुल्ला सालेह यांनी पंजशीरमधून तालिबान्यांच्या समोर उभं राहण्याचं धाडसं केलंय. 


अफगाणिस्तानचे काळजीवाहू राष्ट्रपती अमरुल्ला सालेह यांनी आपला एक जुना म्हणजे तब्बल 10 वर्षांपूर्वीचा एक व्हिडीओ रीट्वीट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. अमरुल्ला सालेह आपल्या ट्वीटमध्ये म्हणतात, "अमेरिकेचा शेवटचा सैनिक अफगाणिस्तानमधून गेला, पण अफगाणिस्तान आहे त्या ठिकाणीच आहे. नद्या वाहतायंत आणि पर्वतं भव्य उभी आहेत. तालिबानी दहशतवाद्यांचा लोक तिरस्कार करतात, म्हणूनच संपूर्ण देशाला त्यांच्यापासून सुटका हवीय. जर महासत्तेला संकुचित किंवा प्रादेशिक सत्ता व्हायचं असेल तर ठिक आहे."


हा व्हिडीओ जवळपास 11 वर्षापूर्वीचा तो सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. अमेरिका जरी सोडून गेली तरी आपण कायम लढत राहणार असल्याचं अमरुल्ला सालेह सांगतात. 


काय म्हटलंय अमरुल्ला सालेह यांनी...जाणून घेऊया त्यांच्याच शब्दात


"तुम्ही (अमेरिका) जर सोडून जायचं ठरवलंच असेल तर त्याने फारसा काही फरक पडणार नाही...


आम्ही फक्त त्यांना आमची अडचण सांगू शकतो, त्यांना आपल्या समान हितसंबंधांची जाणीव करून देऊ शकतो. पण त्यांनी ठरवलंच असेल तर तो त्यांचा निर्णय आहे.


आम्ही तिसऱ्या जगातले राष्ट्र आहोत, आम्हाला आमच्या मर्यादा माहिती आहेत.


नैतिकता, राजकारण आणि तत्वांचा विचार केला तर एक महासत्ता म्हणून त्यांनी इथंच थांबायला हवं. ते सोडून जातायंत हा त्यांचा निर्णय आहे. पण याचा अर्थ असा नाही की मी थांबेन...आम्ही लढत राहू...चालत राहू...


इथली भव्य पर्वतं ही तशीच राहणार आहेत... इथल्या नद्या वाहायच्या थांबणार नाहीत...


ते सोबत असते तर खूप भारी झालं असतं...पण ते जातायंत याचा अर्थ असा नाही की आमचं जगणं थांबेल."


 



अमरुल्ला सालेह हे तालिबान्यांच्या विरोधात एकाकी झुंजतायंत, तेही देश सोडून न जाता, तिथेच राहून. तालिबान्यांविरोधातली लढाई ही आमची लढाई आहे आणि आम्हालाच ती लढली पाहिजे असं मत ते मांडतात. त्यांचे हे शब्द अनेकांना प्रेरणा देणारे आहेत. ते या लढाईत यशस्वी होतील किंवा त्यांना मरण येईल. पण त्यांच्या या निश्चयावरुन येत्या काळात तालिबानी दहशतवाद्यांविरोधात अफगाणिस्तानमध्ये मोठी आघाडी उघडली जाणार हे नक्की.