रत्नागिरी : चीनमध्ये सध्या करोना व्हायरसचा धोका वाढताना दिसत आहे. चीनमध्ये भारतातील देखील अनेक विद्यार्थी अडकून पडले आहेत. त्यामध्ये कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यातील तीन विद्यार्थिनींचा देखील समावेश आहे. कोरोना व्हायरसमुळे चीनमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुखरुप आणण्यासाठी केंद्र सरकार पुरेपूर प्रयत्न करत आहे. चीनमध्ये अडकलेल्या भारतीयांमध्ये महाराष्ट्रातील रत्नागिरीमधील तीन मुलींचा समावेश आहे. सुमेना मुनीर हमदुले, झोया महवाश हमदुले आणि सादीया बशीर मुजावर अशी या विद्यार्थिनींची नावं आहेत. चीनमधील नानटॉग प्रांतातील विद्यापीठात शिक्षणासाठी या तिन्ही विद्यार्थिनी गेल्या आहेत.


चीनमध्ये करोना व्हायरसचा धोका वाढल्यानंतर त्यांच्या पालकांसह सर्वांनाच त्यांच्या प्रकृतीची चिंता वाटत होती. पण, या तिन्ही मुली सुखरूप असून त्यांना करोनाचा कोणताही धोका नाही आहे. कारण, गुरूवारी (30 जानेवारी) रात्री जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी या विद्यार्थिनींशी संवाद साधला असून त्या सुरक्षित असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडून 'एबीपी माझा'ला देण्यात आली आहे. शिवाय, या तिन्ही विद्यार्थिनींकडे जीवनावश्यक वस्तुंचा पुरेसा पुरवठा असल्याची माहिती देखील यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयानं दिली आहे.

Corona Virus | चीनमधला कोरोना व्हायरस भारतात? रुग्णांनी आणि नागरिकांनी काळजी घ्यावी?



काय आहे मुलींची नेमकी स्थिती?

सध्या मुलींच्या सुट्ट्यांचा कालावधी सुरू आहे. या सुट्ट्या 23 फेब्रुवारीपर्यंत आहेत. चीनमधील करोना व्हायरसच्या वाढत्या धोक्यामुळे कुणालाही घराबाहेर जाण्याची मुभा नाही. त्यामुळे या तिन्ही विद्यार्थिनी घरातच आणि सुखरूप आहेत. या मुलींसह भारतातील चीनमध्ये अडकून पडलेल्या सर्व विद्यार्थ्यांना सुखरूप आणण्यासाठी भारतीय दूतावासामार्फत प्रयत्न सुरू झाले आहेत. दरम्यान चीनमध्ये पुणे, पिंपरी - चिंचवड, लातूर, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली आणि नांदेडमधील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

कोरोना व्हायरस म्हणजे काय? 

प्राण्यांपासून या विषाणूचा मनुष्याला संसर्ग होतो. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननुसार, हा विषाणू समुद्री खाद्यपदार्थांशी निगडीत आहे. याची सुरुवात चीनच्या हुवेई प्रांताच्या वुहान शहरातील सीफूड मार्केटमधून झाली आहे. डब्ल्यूएचओने देखील हा विषाणू एका व्यक्तीकडून दुसर्‍या व्यक्तीपर्यंत पसरू शकतो, अशी भीती व्यक्त केली आहे.