चीन : चीनमधील रुईली शहरात कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. कोरोनाचं संक्रमण रोखण्यासाठी संपूर्ण शहराचं लसीकरण करण्याचा निर्णय चीन सरकारने घेतला आहे. शहरातील 3 लाख लोकांचं पाच दिवसांच्या आत लसीकरण करण्याचं चीन सरकारचं लक्ष्य आहे. शहरात लसीकरणाची सुरुवात शुक्रवारपासून (2 एप्रिल) झाली आहे. सरकारी चॅनेलवर प्रसारित झालेल्या व्हिडीओत दिसत आहे की,  रुईली शहरातील लोक रांगेत उभं राहून लसीकरण करुन घेत आहेत. 


रुईली शहरात मंगळवारी 16 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर स्थानिक प्रशासनाने जोरदार हालचाल सुरु करत संपूर्ण शहराचं लसीकरण करण्याचा निर्णय घेतला. कोरोनाबाधित 12 लोक चीनचे नागरिक आहेत तर चार म्यानमारचे नागरिक आहेत. रुईली शहर म्यानमारच्या सीमेला लागून आहे. 


कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदा संपूर्ण शहराचं लसीकरण


लोकांना होम क्वॉरंटाईन राहण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता शहरातील इतर दुकाने बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. म्यानमारमधून घुसखोरी करणाऱ्यांना रोखण्यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. चीनमध्ये कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण शहराचं लसीकरण करण्याची ही पहिलीच वेळ आहे. राष्ट्रव्यापी लसीकरण जोरात सुरु असताना चीन सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 


चीनमध्ये आतापर्यंत 90 हजार 217 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 4636 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर दुसरीकडे जगभरात 13 कोटी हून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर मृतांची संख्या 28 लाखांच्या पुढे गेली आहे. जगभरात विविध देशांमध्ये कोरोना लसीकरण मोहिम सुरु आहे. 


भारतात जवळपास 8 कोटी नागरिकांचं लसीकरण


देशभरात  दिल्या गेलेल्या कोरोना लसींच्या डोसची एकूण संख्या आज 7.9 कोटींवर गेली आहे. आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या  तात्पुरत्या अहवालानुसार एकूण 12,31,148 सत्रांद्वारे ,7,91,05,163 लसींचे डोस दिले गेले आहेत. गेल्या 24 तासांत एक लाखांहून अधिक म्हणजे 1 लाख 03 हजार 558 नव्या रूग्णांची नोंद झाली. महाराष्ट्रात सर्वाधिक 57 हजार 074  नव्या रूग्णांची नोंद झाली.


संबंधित बातम्या


Maharashtra New Corona Guidelines: मिशन ‘ब्रेक दि चेन’ : राज्य सरकारकडून नवीन नियमावली जाहीर


Remdesivir Details | ...म्हणून रेमडिसीवीर औषध सर्वच ठिकाणी उपलब्ध नाही