Chandrayaan 3: 23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरून भारताने इतिहास रचला. दक्षिण ध्रुवावर जाणारा भारत पहिला देश ठरला. त्याचबरोबर भारत चंद्रावर जाणारा (Chandrayaan 3) चौथा देश ठरला आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्थेने ऐतिहासिक कामगिरी करत जगाचे लक्ष वेधून घेतलं आहे. याशिवाय चंद्रावर उतरण्याबरोबरच भारताने एक रोव्हरही पाठवला आहे. भारताचा प्रज्ञान रोव्हर (Pragyan Rover) हा चंद्रावर उपस्थित असलेल्या दोन रोव्हरपैकी एक आहे. दुसरा रोव्हर हा भारताचा सर्वात मोठा प्रतिस्पर्धी चीनचा आहे. युतु-2 असे या रोव्हरचे नाव आहे. हे दोन रोव्हर ऐकमेकांसमोर येतील का? समोरासमोर आले तर काय होईल? असे प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र, चंद्रावर असून देखील ते कधीच समोरासमोर येणार नाहीत. कारण दोघांमध्ये जवळपास 1900 किमीचे अंतर आहे.
भारताचे रोव्हर आणि चायनाचे युतु-2 या दोन रोव्हरमध्ये 1891 किमीचे अंतर आहे. चंद्रावर कोसळलेल्या चांद्रयान-2 चे अवशेष शोधणाऱ्या शनमुगा सुब्रमण्यम यांनी ट्वीट करत दोन रोव्हरमधील अंतराची माहिती दिली आहे. चंद्रावर दोन रोव्हर सक्रिय असल्याचीही पहिलीच वेळ आहे. आतापर्यंत जगातील एलीट स्पेस क्लबमध्ये अमेरिका, चीन आणि सोव्हिएत युनियन या देशांचा समावेश होता. आता भारताने देखील त्यात प्रवेश केला आहे.
भारताच्या प्रज्ञान रोव्हरचे काय काम आहे?
भारताचे प्रज्ञान रोव्हर सहा चाकी आहे. चंद्रावरील नमुने गोळा करून, चंद्रावर फिरून आणि पृथ्वीवर माहिती पाठवणे हे या रोव्हरचे काम आहे. पृथ्वीवर छायाचित्रे पाठवण्यासाठी यामध्ये नेव्हिगेशन कॅमेरा आहे. चंद्रावर पाणी शोधण्याचं काम हे रोव्हर करणार आहे. तसेच काही दुर्मीळ गोष्टी जसे की युरेनियम, सोने सापडण्याची शक्यता आहे. सध्या रोव्हर ठरल्याप्रमाणे काम करत आहे. चीनचा युतु 2 हा रोव्हर 2019 पासून चंद्राच्या पृष्ठभागावर काम करत आहे. तर दुसरीकडे भारताच्या प्रज्ञान रोव्हरमध्ये केवळ 14 दिवस काम करण्याची क्षमता आहे . कारण प्रज्ञान रोव्हर जेथे आहे तेथे रात्रीचे तापमान उणे 150 अंशांपर्यंत पोहोचेल, ज्यामध्ये रोव्हरला काम करणे शक्य होणार नाही.
कसा आहे चीनचा युतु-2 रोव्हर?
चीनचा युतु-2 हा रात्री स्लीप मोडमध्ये जातो. याआधी चीनचा चंद्रावर युतु रोव्हर चांग ई 3 या लँडरद्वारे चंद्राच्या कक्षेत पोहोचला होता. चीनचा रोव्हर देखील सहा चाकी आहे. त्याची रेंज 10 किमी आहे. चीनचे पुढील रोव्हर चांग ई-7 मिशनद्वारे पाठवण्यात येणार आहे. जे 2026 मध्ये प्रक्षेपित होईल. तो युतु-2 पेक्षा मोठा असणार आहे.
हे ही वाचा :