नवी दिल्ली:  आपल्या प्रेमासाठी पाकिस्तानातून चार मुलांसह भारतात आलेल्या सीमा हैदरची (Seema Haider) कहाणी भारतातल्या प्रत्येकाला माहित आहे. सीमा भारतात आल्यापासून ती प्रसिद्धीच्या झोतात राहिली आहे, त्यामुळेच चित्रपट निर्माते अमित जानी यांना ही कथा रंजक वाटली आणि त्यांनी यावर चित्रपट बनवण्याचं ठरवलं आणि त्यांनी तशी घोषणाही केली. आता या सगळ्यानंतर 28 ऑगस्टला या चित्रपटाचं पोस्टर रिलीज होत आहे.


पोस्टर रिलिजसाठी चित्रपट निर्माते अमित जानी मुंबईत


सोमवारी ( 28 ऑगस्ट) प्रदर्शित होणाऱ्या या पोस्टरसाठी चित्रपटाचे निर्माते अमित जानी मुंबईत पोहोचले आहेत. या चित्रपटाला राज ठाकरेंचा पक्ष मनसेकडून सातत्याने विरोध होत आहे. चित्रपट निर्माते अमित जानी यांना सातत्याने धमक्या मिळत आहेत, पाकिस्तानी व्यक्तीला घेऊन तिच्यावर आधारित चित्रपट बनवल्याने त्यांना धमक्या येत आहेत. त्यानंतर निर्माते अमित जानी यांनी मुंबई हायकोर्टातही धाव घेतली आहे. हे प्रकरण सुरू असतानाट अमित जानी यांनी हा चित्रपट प्रदर्शनाची तारीख, म्हणजेच चित्रपटाची रिलीज डेटही जाहीर केली आहे.


सीमा-सचिनवर आधारित चित्रपट 'या' दिवशी होणार प्रदर्शित


सीमा-सचिनची प्रेमकहाणी खूपच रंजक आहे. पाकिस्तानातील कराची येथे राहणारी सीमा आपल्या पतीला सोडून चार मुलांसह सचिनच्या प्रेमासाठी भारतात आली. यानंतर संपूर्ण देशात सीमा चर्चेचा विषय बनली. यानंतर चित्रपट निर्माते अमित जानी यांनी या प्रेमकथेवर चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला. या चित्रपटाचं नाव 'कराची ते नोएडा' असं ठेवण्यात आलं आहे.


या चित्रपटाच्या माध्यमातून सीमा हैदरही बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या सगळ्यात आता या चित्रपटाची रिलीज डेटही समोर आली आहे. अमित जानी यांनी हा चित्रपट प्रजासत्ताक दिनी, म्हणजेच 26 जानेवारीला प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच वेळी, चित्रपटाचा पोस्टर सोमवारी, म्हणजेच 28 ऑगस्ट 2023 रोजी रिलीज होणार आहे.


मनसेच्या धमकीनंतर अमित जानी पोहोचले कोर्टात


सीमाच्या जीवनावर आधारित चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नसल्याचा इशारा मनसेने दिला आहे. राज ठाकरेंचा मनसे पक्ष चित्रपटातील पाकिस्तानी कलाकार किंवा पाकिस्तानी नागरिकाच्या भूमिकेला विरोध करत आहे. राज ठाकरे यांच्या पक्षाकडून सतत धमक्या मिळाल्यानंतर अमित जानी यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेत मनसेविरोधात फौजदारी रिट याचिका दाखल केली आहे.


राज ठाकरे यांच्या पक्षाच्या नेत्यांना चित्रपटाबाबत चुकीची माहिती देण्यात आल्याचं अमित जानी यांनी म्हटलं आहे. अमित जानी मनसेला विनंती करत आहे की, "आमच्याशी या आणि बोला. तुम्ही येत नसाल, तर मला भेटायला बोलवा. मला खात्री आहे की आमचं म्हणणं ऐकून मनसेचे सर्व गैरसमज दूर होतील. खुद्द राज ठाकरे या चित्रपटाचं कौतुक करतील."


हेही वाचा: