WHO Warning on H5N1 Flu : जगभरात बर्ड फ्लूचा (Bird Flu) धोका वाढताना दिसत आहे. धोकादायक बाब म्हणजे बर्ड फ्लू माणसांमध्येही संक्रमित होऊ शकतो. अनेक देशांमध्ये एव्हीयन फ्लू (Avian Influenza) म्हणजेच बर्ड फ्लूचा (Bird Flu) उद्रेक वाढताना दिसत आहे. बर्ड फ्लूमुळे पक्षांचाच नाही तर मांजरी सारख्या प्राण्यांचाही मृत्यू झाल्याचीही धक्कादायक बाब समोर आली आहे. यामुळे जगभरात चिंता वाढली आहे. आता पोलंडमध्ये अनेक मांजरींचा अचानक मृत्यू झाला आहे. या सर्व मांजरींचा मृत्यू बर्ड फ्लूमुळे झाल्याचं बोललं जात आहे.
बर्ड फ्लूच्या H5N1 स्ट्रेनमुळे अनेक मांजरींचा मृत्यू
मीडिया रिपोर्टमध्ये अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलंडमध्ये मोठ्या संख्येने मांजरींचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. यांती चाचणी केलेल्यांपैकी निम्म्याहून अधिक नमुन्यांमध्ये H5N1 स्ट्रेन सापडला आहे. H5N1 स्ट्रेन हा H1N1 म्हणजेच बर्ड फ्लूचा उपप्रकार असल्याचं, जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. मृत मांजरींच्या चाचणी केलेल्या 47 नमुन्यांपैकी एका जंगली मांजरीसह 29 नमुने H5N1 फ्लूसाठी पॉझिटिव्ह होते.
H5N1 स्ट्रेन मानवांमध्येही संक्रमित होण्याचा धोका
जागतिक आरोग्य संघटने (WHO) ने एका निवेदनात म्हटलं आहे की, ''देशातील विस्तृत भौगोलिक क्षेत्रामध्ये जास्त संख्येने संक्रमित मांजरींचा हा पहिला अहवाल आहे. पक्ष्यांमध्ये आढळणारा बर्ड फ्लूचा हा स्ट्रेन मानवांमध्ये प्रसारित होण्याची शक्यता आहे, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. याचा परिणाम नवीन साथीच्या रोगाचा उद्रेक होण्यास कारणीभूत ठरू शकतो, असंही डब्ल्यूएचओनं म्हटलं आहे.
H5N1 ची लक्षणे कोणती आणि किती गंभीर?
H5N1 स्ट्रेन आढळलेल्या अनेक मांजरींनी श्वास घेण्यात अडचण येत होती. त्यासोबतच अतिसारामार्फत रक्तस्राव आणि न्यूरोलॉजिकल समस्यांसह गंभीर लक्षणे विकसित झाल्याची माहिती जागतिक आरोग्या संघटनेने दिली आहे. दरम्यान, सामान्य लोकांना बर्ड फ्लूचा संसर्ग होण्याचा धोका कमी असतो. पशू किंवा पक्षांच्या संपर्कात राहिल्याने याची लागण होऊ शकते.
दरम्यान, डब्ल्यूएचओने पुढे सांगितलं आहे की, या संक्रमित मांजरींचा बर्ड फ्लूची लागण झालेले पक्षी किंवा त्यांचे वास्तव्य असलेल्या ठिकाणाशी संपर्क आल्यामुळे त्यांना बर्ड फ्लूची लागण झाल्याची शक्यता आहे. रिपोर्टनुसार, संक्रमित काही मांजरी पाळीव होत्या, तर काही जंगली होत्या, असं नमूद करण्यात आलं आहे.
मानवी संक्रमणाचा धोका
दरम्यान, या मृत मांजरीच्या संपर्कातील माणसांमध्ये संक्रमण झाल्याचं अद्याप आढळलेलं नाही. त्या व्यक्तींना काही काळ देखरेखीखाली ठेवण्यात आलं होतं. पण, संक्रमित मांजरींच्या संपर्कातील कोणत्याही मानवाला याचा संसर्ग झाल्याची कोणतीही लक्षणे आढळलेली नाहीत, अशी माहिती डब्ल्यूएचओने सांगितलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :