US Made Artificial Sun : अमेरिकेच्या अनेक दशकांच्या प्रयत्नाला यश आलं आहे. अमेरिकन शास्त्रज्ञांनी 'कृत्रिम सूर्य' बनवला आहे. हा मूळ सूर्याच्या पृष्ठभागापेक्षा 100 पट जास्त गरम असल्याचा दावा अमेरिकेने केला आहे. अमेरिकेच्या ऊर्जा विभागाने 13 डिसेंबर 2023 रोजी ही घोषणा केली आहे. याआधी चीननेही कृत्रिम सूर्य बनवला होता. या ऊर्जेचा वापर भविष्यात ऊर्जा संकट दूर करण्यासाठी केला जाईल. पण यासाठी आणखी वेळ लागणार आहे.


न्यूक्लियर फ्यूजन म्हणजेच 'कृत्रिम सूर्य' 


न्यूक्लियर फ्यूजनला 'कृत्रिम सूर्य' असं म्हटलं जातं. अमेरिकेने पहिल्यांदाच न्यूक्लियर फ्यूजन यशस्वीपणे पार पडलं आहे. कॅलिफोर्नियातील लॉरेन्स लिव्हरमोर नॅशनल लॅबोरेटरीच्या नॅशनल इग्निशन फॅसिलिटीमध्ये अमेरिकन शास्त्रज्ञांनी ही ऐतिहासिक कामगिरी केली आहे. सूत्राने सीएनएनला दिलेल्या माहितीनुसार ही माहिती समोर आली आहे. या माहितीनुसार, अमेरिकेच्या ऊर्जा विभाग मंगळवारी अधिकृतपणे कृत्रिम सूर्याबाबतची चाचणी यशस्वी झाल्याची घोषणा केली आहे. 


भविष्यात 'या' कृत्रिम सूर्याचा होणार फायदा


सध्या लोकांना या कृत्रिम सूर्याच्या ऊर्जेचा फायदा मिळण्यासाठी वेळ लागणार आहे पण, भविष्यात या कृत्रिम सूर्यामुळे लोकांना स्वच्छ, प्रदूषणमुक्त ऊर्जा पुरवठा मिळू शकेल. हा पुरवठा स्वस्त आणि अधिक काळासाठी उपलब्ध असेल. मिशिगन विद्यापीठातील न्यूक्लियर इंजिनीअरिंगच्या सहाय्यक प्राध्यापक कॅरोलिन कुरंज यांनी याबाबत माहिती देत सांगितलं आहे, आम्ही नुकताच फ्यूजन रेकॉर्ड मोडला आहे.


फ्यूजन चेंबरमध्ये काय घडलं?


न्यूक्लियर फ्यूजन ही एक आण्विक प्रतिक्रिया आहे. ज्यामध्ये दोन अणू एकत्र येऊन कमी वस्तुमान असलेले एक किंवा अधिक नवीन अणू तयार होतात. यामध्ये वस्तुमानातील फरकाचं ऊर्जेत रूपांतर होते. येथे आइन्स्टाईनचा E=MC2 नियम लागू होतो. प्रकाशाचा वेग खूप जास्त असतो. अशा परिस्थितीत, अणूंच्या एकूण वस्तुमानाच्या थोड्या प्रमाणात ऊर्जामध्ये रूपांतरित झाल्याने मोठ्या प्रमाणात ऊर्जा निर्माण होते. फ्यूजन चेंबर ही प्रक्रिया घडते. अशाप्रकारे मोठ्या प्रमाणत ऊर्जा तयार केली जाते.


चीननेही बनवलाय कृत्रिम सूर्य


अमेरिकेआधी चीननेही सूर्याच्या ऊर्जेला पर्यायी स्त्रोत म्हणून कृत्रिम सूर्य तयार केला होता. 30 डिसेंबरला चीनने ऐतिहासिक कामगिरी केली. 'न्यूक्लिअर फ्यूजन रिअॅक्टर'मधून 17 मिनिटांमध्ये 7 कोटी अंश सेल्सिअस ऊर्जा उत्सर्जित करण्यात आली. इतक्या कमी वेळात निर्माण झालेली ही उर्जा ही खऱ्या सूर्यापासून मिळणाऱ्या उर्जेपेक्षा खूप जास्त होती. त्यामुळे चीनमध्ये तरी हा प्रयोग यशस्वी मानला जातोय.