Anjali Kulthe at UNSC : मुंबईवरील 26/11 दहशतवादी हल्ल्याला (26/11 Mumbai Terrorist Attack) 14 वर्षे पूर्ण झाली आहेत. आर्थिक राजधानीसह संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या या हल्ल्याच्या आठवणी अजूनही मुंबईकरांच्या मनात कायम आहेत. या हल्ल्यात अनेक पोलीस शहीद झाले, अनेकांनी आपल्या प्रियजनांना गमावलं तर त्याच वेळी काहींनी जीवाची बाजी लावून अनेकांचे प्राण वाचवले. या काही जणांमध्ये अंजली कुलथे (Anjali Kulthe) यांचाही समावेश आहे. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात अनेकांचे प्राण वाचवणाऱ्या कामा हॉस्पिटलमधील (Cama & Albless Hospitals) स्टाफ नर्स अंजली कुलथे यांनी गुरुवारी (15) संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (UNSC) व्हिडीओच्या माध्यमातून संवाद साधला आणि आपलं दु:ख, भावना व्यक्त केल्या. हल्ल्यात त्यावेळी जिवंत पकडलेला एकमेव दहशतवादी म्हणजे अजमल कसाब (Ajmal Kasab). पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाबला जेव्हा जेलमध्ये भेटल्या त्यावेळची आठवण त्यांनी सांगितली. अजमल कसाबला त्याच्या कृत्याबद्दल अजिबात पश्चाताप नव्हता ना खंत होती, असं अंजली कुलथे म्हणाल्या.


मुंबईत 26 नोव्हेंबर 2008 रोजी लष्कर ए तोयबाचा 10 दहशतवाद्यांनी मुंबईत धुमाकूळ घातला होता. समुद्रमार्गे आलेल्या या दहशवाद्यांनी मुंबईतीन अनेक ठिकाणी बंदूक आणि बॉम्बने हल्ला केला. या हल्ल्यात 166 निष्पाप लोकांचा मृत्यू झाला होता तर 300 हून अधिक जण जखमी झाले होते.


अजमल कसाबला कृत्याचा पश्चात्ताप नव्हता : अंजली कुलथे


'युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काऊन्सिल मीटिंग: ग्लोबल अॅप्रोच टू टेररिझम: चॅलेंजेस अँड द वे फॉरवर्ड'मध्ये व्हिडीओ लिंकद्वारे संबोधित करताना अंजली कुलथे यांनी हल्ल्यातील पीडितांच्या भावना, त्यांची भीती शेअर केली. हल्ला झाला त्यावेळी अंजली कुलथे या कामा अॅण्ड आल्ब्लेस हॉस्पिटल फॉर वूमन अॅण्ड चिल्ड्रेन इथे स्टाफ नर्स म्हणून काम करत होत्या. त्यांनी सुरक्षा परिषदेच्या सदस्यांना सांगितलं की, "कसाबला जिवंत पकडल्यानंतर त्याची ओळख पटवण्यासाठी त्या  तुरुंगात गेल्या होत्या. परंतु अजमल कसाबला आपल्या कृत्याचा अजिबात पश्चात्ताप नव्हता हे त्यांच्या देहबोलीवरुन तसंच त्याच्या बोलण्यातून जाणवलं."


अंजली कुलथे यांनी 20 गर्भवतींचे प्राण वाचवले!


पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनस रेल्वे स्थानक, नरिमन हाऊस, कामा हॉस्पिटल, लिओपोल्ड कॅफे, ओबेरॉय-ट्रायडंट हॉटेल आणि ताज हॉटेलला लक्ष्य केलं होतं. दहशतवाद्यांनी कामा हॉस्पिटलमध्ये गोळीबार केला त्यावेळी अंजली कुलथे ड्युटीवर होत्या. कुलथे यांनी कसाबसह दोन दहशतवाद्यांना रुग्णालयाच्या दरवाजातून आत घुसताना आणि सुरक्षारक्षकांवर गोळीबार केल्याचं पाहिलं होतं. या हल्ल्याच्या दरम्यान आपल्या जीवाची पर्वा न करता त्यांनी 20 गर्भवती महिलांचे प्राण वाचवले होते. अंजली कुलथे यांनी सांगितलं की, "26/11 च्या हल्ल्यावेळी मी नाईट ड्युटीवर होते. सीएसएमटी स्थानकावर गोळीबार झाल्याची माहिती मिळाली. त्यानंतर दहशतवादी कामा रुग्णालयात घुसले. त्यांनी आमच्यावर गोळीबारही केला. या घटनेत माझे सहकारी जखमी झाले. मी तातडीने वॉर्डचे दरवाजे बंद केले आणि सर्व गर्भवती महिलांना वॉर्डातील एका छोट्या पॅन्ट्रीच्या जागेत नेलं. त्या सगळ्या घाबरल्या होत्या. मी दिवे बंद केले आणि त्यांना शांत केले. एका महिलेला प्रसुती वेदना सुरु झाल्या, पण बाहेर गोळीबार सुरु असल्याने डॉक्टर येऊ शकले नाहीत. आम्ही सकाळपर्यंत वॉर्डमध्ये होतो आणि पोलीस आले तेव्हाच गेट उघडले."


एवढ्या लोकांना मारुनही त्याच्या चेहऱ्यावर पश्चातापाची लकेर नव्हती : अंजली कुलथे


UNSC मध्ये कुलथे म्हणाल्या की, "हल्ल्याच्या एक महिन्यानंतर मला अजमल कसाबची ओळख पटवण्यासाठी बोलावलं होतं. माझे कुटुंबीय घाबरले होते पण मी साक्षीदार बनण्याचं ठरवलं होतं. जेव्हा मी त्यावेळी ओळखलं तेव्हा तो उपहासात्मक हसला आणि म्हणाला मॅडम तुम्ही अचूक ओळखलं. मीच अजमल कसाब. इतक्या लोकांना मारुनही त्याच्या चेहऱ्यावर पश्चात्तापाची लकेर नव्हती." त्याच्या चेहऱ्यावरील विजयाची भावना आजही मला छळते, त्रास देते. 26/11 च्या मुंबई हल्ला घडवून आणणारे अजूनही मोकाट असल्याने   हल्ल्यातील आम्ही पीडित 14 वर्षांनंतरही न्यायाच्या प्रतीक्षेत आहोत.


संबंधित बातमी