न्यूयॉर्क : अफगाणिस्तानवर आता तालिबानने नियंत्रण प्रस्थापित केलं असून राष्ट्रपती अशरफ घनी हे देश सोडून गेले आहेत. या बिघडलेल्या परिस्थितीमुळे अफगाणिस्तानमध्ये आता अनागोंदी माजली असून याच विषयावर भारतीय प्रमाणवेळेनुसार, आज संध्याकाळी साडे सात वाजता संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेची एक बैठक आयोजित करण्यात आली आहे. भारतीय परराष्ट्रमंत्री एस जयशंकर हे या बैठकीचे अध्यक्ष असतील. 


सुरक्षा परिषदेची या मुद्द्यावर एक बैठक व्हावी अशी मागणी  रशियाने केली होती. त्या आधी संयुक्त राष्ट्राचे प्रमुख अॅन्टोनिया गुटेरस यांनी अफगाणिस्तानमधील परिस्थितीवर बोलताना तालिबानने हिंसाचाराचा मार्ग सोडावा असं आवाहन केलं होतं. महिला आणि बालकांचे अधिकार आणि सुरक्षा यावर त्यांनी विशेष चिंता व्यक्त केली होती. 


 




भारतीय परराष्ट्रमंत्री एस जयशंकर हे न्यूयॉर्कमध्ये आहेत. भारतासहित जगातल्या प्रमुख राष्ट्रांचे अफगाणिस्तानमधील परिस्थितीवर बारीक लक्ष आहे. आजच्या बैठकीत तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर प्रस्थापित केलेल्या नियंत्रणावर चर्चा होणार आहे. पण अफगाणिस्तानच्या प्रश्नावर त्या देशाची बाजू कोण आणि कशा प्रकारे मांडणार, त्या संबंधी पुढाकार कोण घेणार हा प्रश्न निर्माण झाला आहे. 


अफगाणिस्तानमधील बिघडलेल्या परिस्थितीला रशियाने अमेरिका हाच देश जबाबदार असल्याचं सांगितलं आहे. तर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही बायडेन सरकारवर निशाणा साधत ही अमेरिकेची आतापर्यंतची सर्वात मोठी नाचक्की असल्याचं सांगितलं. 


अमेरिका आणि नाटोचे सैन्य अफगाणिस्तानमधून माघारी गेल्यानंतर काहीच अवधीत तालिबानी दहशतवादी संघटनेनं या देशावर कब्जा मिळवला आहे. 


संबंधित बातम्या :