Haiti Earthquake : हैती या कॅरेबियन देशात 7.2 रिश्टर क्षमतेचा भूकंप झाला. या भूकंपामुळे मोठ्या प्रमाणावर जीवितहानी आणि वित्तहानी झाली. मीडिया रिपोर्टनुसार, या भूकंपात आतापर्यंत 724 लोकांचा मृत्यू झाला असून कमीत कमी 2800 नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. भूकंपामुळे अनेक इमारतींची पडझड झाली आहे. संपूर्ण शहर उद्ध्वस्थ झालं आहे. तसेच अनेकजण अद्यापही इमारतींच्या ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. 


शनिवारी भूकंपामुळे हैतीमधील अनेनक शहरं उद्ध्वस्थ झाली आहे. प्रशासनाकडून युद्ध पातळीवर बचावकार्य सुरु आहे. भूकंपामुळं उद्भवलेल्या भूस्खलनामुळे बचाव कार्यात अडथळे येते आहेत. आधीपासूनच कोरोनाच्या प्रादुर्भावाचा सामना करणाऱ्या हैतीतील नागरिकांच्या समस्या भूकंपामुळे आणखी वाढल्या आहेत. 


पुढील आठवड्यात संकट आणखी वाढू शकतं 


भूकंपाचा केंद्रबिंदू राजधानी पोर्ट औ प्रिन्सपासून 125 किलोमीटरवर असल्याचं अमेरिकेच्या भूगर्भ सर्व्हेक्षणाकडून सांगण्यात आलं आहे. भुकंपाच्या तीव्र धक्क्यानंतर काही सौम्य धक्केही जाणवले. त्यामुळे भीतीच्या सावटाखाली नागरिकांनी रात्र रस्त्यावरच काढली. 


दुसरीकडे पुढच्या आठवड्यात हैतीवरील संकट आणखी वाढण्याची शक्यता आहे. ग्रेस वादळ सोमवार किंवा मंगळवारी हैतीच्या किनारपट्टीला धडकेल, असा अंदाज आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी युएसएड प्रशासक समांथा पॉवर यांची हैतीच्या मदतीसाठी समन्वयक म्हणून नियुक्ती केली आहे. युएसएड हैतीमधील नुकसानीचा आढावा घेऊन मदत करणार आहे. अमेरिकेसह अर्जेंटिना, चिली या देशांनीही मदतीची घोषणा केली आहे.


दरम्यान, कोरोना संकट, राष्ट्रपतींची हत्या, अफाट गरीबी आणि भूकंप या लागोपाठच्या संकटांमुळे हैतीमध्ये बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. लाखो नागरिक बेघर झाले आहेत. हैतीच्या सरकारने संपूर्ण देशात एक महिन्यासाठी आरोग्यसेवेचा आपात्काळ जाहीर केला आहे. 


हैतीच्या राष्ट्रपतींची घरात घुसून हत्या


कॅरेबियन देश हैतीचे राष्ट्रपती जोवेननल मोसे यांची त्यांच्या राहत्या घरात हत्या करण्यात आली आहे. या हल्ल्यात मोसे यांच्या पत्नी जखमी झाल्या आहेत. हैतीच्या पंतप्रधानांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. राष्ट्रपती मोसे यांच्या खासगी निवासस्थानी काही अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला. हैतीचे अंतरीम पंतप्रधान क्लाउड जोसेफ यांनी सांगितले होते की, एका गटाने राष्ट्रपती मोसे यांची हत्या केली. त्यांच्या खासगी निवासस्थानावर काही अज्ञात गटाने रात्रीच्या सुमारास हल्ला केला. मोसे यांनी पत्नी मार्टिन मोसे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :