Afghanistan News: अफगाणिस्तानमधील परिस्थितीवर पाकिस्तानची नोबेल पुरस्कार विजेती मलाला युसुफझाईचे वक्तव्य समोर आले आहे. ती म्हणाले की अफगाणिस्तानवर तालिबानच्या कब्जामुळे मोठा धक्का बसला आहे. महिला, अल्पसंख्यांक आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांच्या स्थितीबद्दल खूप चिंता वाटतेय. तालिबानने अफगाणिस्तानच्या मोठ्या भागावर ताबा मिळवल्यानंतर मलालाचे हे पहिले विधान आहे.


मलालाने ट्वीट केले, की “अफगाणिस्तान तालिबान्यांनी ताब्यात घेतले आहे, हे पाहून आम्हा सर्वांना मोठा धक्का बसला आहे. मला तिथल्या महिला, अल्पसंख्यांक आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांची खूप चिंता वाटतेय. जागतिक, प्रादेशिक आणि स्थानिक शक्तींनी त्वरित युद्धबंदी करुन मानवतावादी मदत प्रदान करणे, निर्वासित आणि नागरिकांचे संरक्षण करणे आवश्यक आहे.”






मलाला युसुफझाई यापूर्वीच तालिबानच्या निशाण्यावर राहिली आहे. यामुळेच मलालाला पाकिस्तान सोडावे लागले. खरं तर, केवळ मलालाच नाही, जगभरातील अनेक लोकांना अफगाणिस्तानमधील परिस्थिती पाहून मनापासून धक्का बसला आहे. अफगाणिस्तानमध्ये अनेक प्रकल्प उभारणाऱ्या भारतासह सर्व देशांचे भविष्य आता धोक्यात आले आहे.


येत्या काळात अफगाणिस्तानमध्ये कोणत्या प्रकारची सत्ता समीकरणे असतील हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतु, अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशरफ घनी राजीनामा देऊ शकतात असा दावा अहवालांमध्ये केला जात आहे. पण एक गोष्ट स्पष्ट आहे की तालिबानशी लढण्यासाठी अफगाण सरकारकडे खूप मर्यादित पर्याय शिल्लक आहेत. काबूलवरील तालिबानची पकड इतक्या लवकर बळकट होणार नाही अशी अपेक्षा होती, पण त्यांनी ज्या प्रकारे काबूल पाडला आहे, त्यामुळे अनेकांना धक्का बसला आहे.