काबुल : अफगाणिस्तानमध्ये आता लवकरच तालिबानचे सरकार स्थापन होणार असून त्याची जोरदार तयारी सुरु आहे. मुल्ला मोहम्मद हसन अखुंद याची तालिबान सरकारच्या प्रमुखपदी निवड होणार असून तसा प्रस्ताव हिब्दतुल्लाह अखंदजादा याने दिला असल्याचं काबुलच्या माध्यमांनी सांगितलं आहे. 


मुल्ला मोहम्मद हसन अखुंद हा गेल्या विस वर्षांपासून तालिबानमध्ये महत्वाची भूमिका बजावतोय. तालिबानशी संबंधित महत्वाचे निर्णय घेणाऱ्या रहबारी शूरा चा तो प्रमुख आहे. तसेच त्याला एका धार्मिक नेत्याच्या स्वरुपात प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. त्यामुळे तालिबान सरकारच्या प्रमुखपदी त्याचं नाव सर्वात पुढं आलं. 


काबुलच्या माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, हक्कानी नेटवर्कचा सिराजुद्दीन हक्कानी हा तालिबान सरकारचा नवी गृहमंत्री असणार आहे तर तालिबानचा संस्थापक मुल्ला उमरचा मुलगा याकुब हा संरक्षण मंत्री असणार आहे. 


पंजशीरवर कब्जा केल्याचा तालिबानचा दावा
अफगाणिस्तानची राजधानी काबुलवर ताबा मिळवल्यानंतर 21 दिवसांनी आता तालिबान्यांनी पंजशीर प्रांतावरही ताबा मिळवल्याचा दावा केला आहे. आतापर्यंत पंजशीरमध्ये नॅशनल रेजिस्टेंस फ्रंटचा नेता अहमद मसूद याचा ताबा होता. पंजशीरवरुन तालिबान आणि नॅशनल रेजिस्टेंस फ्रंट यांच्यात संघर्ष सुरु होता. यामध्ये दोन्ही बाजूनं शेकडो नागरिकांचा मृत्यू झाला आहे. 


काश्मीर मुद्द्यावर तालिबानची भूमिका स्पष्ट
काहीच दिवसांपूर्वी आम्हाला भारतासोबत मैत्रीपूर्ण संबंध ठेवायचं असल्याचं तालिबानने स्पष्ट केलं होतं. आता काश्मिरातील मुस्लिमांसाठी आपल्याला आवाज उठवण्याचा हक्क असल्याचं तालिबानच्या प्रवक्त्याने सांगितलं आहे. त्यामुळे तालिबान्यांच्या आडाने पाकिस्तान काश्मिरातील फुटीरतावादी गटाला उसकवणार आणि भारतातील दहशतवादी कारवायांत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 


तालिबानचा प्रवक्ता सुहैल शाहीन याने झुम कॉलच्या माध्यमातून बीबीसीला एक मुलाखत दिली. या मुलाखतीत तो म्हणाला की, भारतातील जम्मू-काश्मीरमधील मुस्लिम असतील वा इतर देशांतील मुस्लिम असतील, धर्माच्या आधारे त्यांच्यासाठी आवाज उठवण्याचा तालिबानला पूर्ण हक्क आहे. आम्ही काश्मिरातील मुस्लिमांच्या हक्कांसाठी आवाज उठवू आणि भारताला सांगू की मुस्लिम हे तुमचेच नागरिक आहेत, त्यांना समान अधिकार मिळाला पाहिजे. 


संबंधित बातम्या :