Afghanistan Crises : अफगाणिस्तानची राजधानी काबुलवर ताबा मिळवल्यानंतर 21 दिवसांनी आता तालिबान्यांनी पंजशीर प्रांतावरही ताबा मिळवल्याचा दावा केला आहे. अफगाणिस्तानच्या इस्लामी अमीरातचे प्रवक्ते जबीहुल्लाह मुजाहिद यांनी दावा केला आहे की, आतापर्यंत पंजशीरमध्ये नॅशनल रेजिस्टेंस फ्रंटचे नेते अहमद मसूद यांचा ताबा होता. पंजशीरवरुन तालिबान आणि नॅशनल रेजिस्टेंस फ्रंट यांच्यात संघर्ष सुरु होता. यामध्ये दोन्ही बाजूनं शेकडो नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
प्रवक्ते जबीहुल्लाह मुजाहिद म्हणाले की, "पंजशीर प्रांत पूर्णपणे तालिबानच्या ताब्यात आला आहे. सर्वशक्तिमान ईश्वराच्या मदतीनं पंजशीर प्रांतावर पूर्णपणे विजय मिळाला आणि इस्लामी अमीरातच्या नियंत्रणात आला. पंजशीरमध्ये अनेक विद्रोही गटाच्या सदस्यांना मारण्यात आलं, तर इतर काहीजणांनी पळ काढला. आम्ही पंजशीरच्या नागरिकांना आश्वासन देतो की, आम्ही त्यांच्यासोबत कोणताही भेदभाव करणार नाही. ते सर्व आमचे बांधव आहेत आणि आम्ही एक देश म्हणून एकत्र राहू. या विजयानंतर आमचा देश पूर्णपणे युद्धाच्या भोवऱ्यातून बाहेर आला आहे. आमच्या देशातील नागरिक स्वतंत्र आणि समृद्धीच्या वातावरणात शांतीपूर्ण आणिआनंदी आयुष्य जगू शकतात."
तालिबान्यांच्या विरोधात लढा देत असलेल्या समूहाच्या नेत्यांनी सांगितलं होतं की, ते शांततापूर्ण चर्चा करण्यासाठी तयार आहेत. अहमद मसूदनं सांगितलं होतं की, धार्मिक मौलविंनी ज्या योजना चर्चेसाठी समोर ठेवल्या आहेत, त्या योजनेचं ते समर्थन करतात. तसेच त्यांनी तालिबान्यांना युद्ध थांबवण्याचं आवाहन केलं होतं.
एनआरएफचे प्रवक्ते फहीम दष्टी तालिबानशी लढताना मारले गेले
पंजशीरमध्ये तालिबान्यांना विद्रोही गटाकडून जोरदार प्रत्युत्तर मिळत असल्याची माहिती मिळत होती. नॅशनल रेजिस्टेंस फ्रंटचे कमांडर आणि NRF चे प्रवक्ते फहीम दश्ती यांचा तालिबान्यांशी लढताना मृत्यू झाला आहे. यासंदर्भात NRF कडून अधिकृतपणे माहिती देण्यात आली. फहीम दश्ती यांच्यासोबत पंजशीरमधील आणखी एक नेते जनरल अब्दुल वदोद जारा यांचाही मृत्यू झाला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :