मुंबई : आयटी क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या एक्सेंजर (Accenture) कंपनीने त्यांच्या 19,000 कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करण्याची घोषणा केली आहे. ही संख्या कंपनीच्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी 2.5 टक्के इतकी आहे. याशिवाय कंपनीने आपली वार्षिक कमाई आणि नफ्याच्या अंदाजातही कपात केली आहे. कंपनीचा वाढत चाललेला तोटा कमी करण्यासाठी हे पाऊल उचलल्याचं सांगण्यात येतंय. याआधी अॅमेझॉनने (Amazon)  त्याच्या 9,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याची घोषणा केली होती. टेक कंपन्यांकडून इतक्या मोठ्या प्रमाणात सातत्याने होणारी नोकरकपात म्हणजे जागतिक मंदीची चाहूल (Recession In IT Sector) असल्याचं सांगितलं जातंय. 


रॉयटर्स या वृत्तसमूहाने या संदर्भातील वृत्त दिलं असून त्यामध्ये म्हटलंय की, एक्सेंजर कंपनीने आपली महसूल वाढ आणि नफ्याचा अंदाजही कमी केला आहे. एक्सेंजर कंपनीने यंदाची महसूल वाढीचा अंदाज हा 8 ते 10 टक्के इतका असल्याचं सांगितलं आहे. गेल्या वर्षी तो 8 ते 11 टक्के इतका होता. 


 






या वर्षी मंदीच्या सावटाखाली असलेल्या आयटी क्षेत्रातल्या लाखो कर्मचाऱ्यांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या. अमेझॉन (Amazon), मेटा (Meta), मायक्रोसॉफ्ट (Microsoft) आणि इतर कंपन्यांनी लाखो कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. अमेझॉनच्या या तिमाहीतील नफ्यात मोठी घट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तीन दिवसांपूर्वी अमेझॉनने त्याच्या 9,000 कर्मचाऱ्यांना कमी केल्याचं जाहीर केलं होतं. अमेझॉनची ही दुसरी कर्मचारी कपात असून त्या आधी जानेवारी महिन्यात कंपनीने 18,000 कर्मचारी कपातीची घोषणा केली होती. 


Recession In IT Sector : आयटी कंपन्यांवर मंदीचं सावट


यंदाचं वर्ष हे मंदीचं वर्ष असल्याचा अंदाज अनेकांनी या आधी वर्तवला आहे. गेल्या अडीच वर्षांमध्ये कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जगभरातील अर्थव्यवस्था या घसरल्या होत्या. त्या अजूनही पूर्णपणे सावरल्या नाहीत. आता पुन्हा त्यांच्यासमोर मंदीचं आव्हान असणार आहे. विशेषत: आयटी क्षेत्रातल्या कंपन्यांना या मंदीचा फटका जास्त बसू शकतो असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्याचाच परिणाम आता दिसून येतोय. जगभरातल्या आघाडीच्या आयटी कंपन्यांनी या वर्षी त्यांच्या लाखो कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला आहे. 


आयटी कंपन्यातील सुरू असलेली ही कर्मचारी कपात यापुढेही कायम राहणार असल्याचा अंदाज अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. 


 


ही बातमी वाचा: