US Visa B-1, B-2 New Rule : भारतातून दरवर्षी अनेक उच्चशिक्षित तरुण-तरुणी विदेशात नोकरीसाठी जातात. गलेलठ्ठ पगाराच्या नोकरीसाठी अमेरिका, कॅनडा, ब्रिटन आणि फ्रान्स यासारख्या देशाला सर्वाधिक पसंती दर्शवली जाते. भारतातून अमेरिकेत नोकरीसाठी जाणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. पण काही जणांना वर्क व्हिसा नसल्यामुळे अमेरिकेत नोकरी मिळत नाही. पण आता अशा लोकांसाठी खूशखबर आहे. अमेरिेकत बिझनेस व्हिसा अथवा टुरिस्ट व्हिसा (B-1, B-2) घेऊन जाणाऱ्याला नोकरीसाठी अर्ज करता येणार आहे. त्याशिवाय या व्हिसावर त्यांना मुलाखतही देता येईल. अमेरिकेतील एका फेडरल एजन्सीने याबाबतची माहिती दिली आहे.
फेडरल एजेन्सीने सांगितले की, बिझनेस व्हिसा अथवा टुरिस्ट व्हिसा द्वारे तुम्ही नोकरी मिळवू शकता, पण नोकरी सुरु करण्यापूर्वी तुम्हाला व्हिसा बदलावा लागणार आहे. यूएस सिटिजनशिप एण्ड इमिग्रेशन सर्विसने (USCIS) बदललेल्या नियमांबाबत ट्विट करत माहिती दिली आहे. जेव्हा गैर स्थलांतरितांना कामावरून काढून टाकण्यात आले, तेव्हा त्यांच्याकडे इतर पर्याय आहेत याबाबत माहीत नव्हते. काही प्रकरणांमध्ये ज्यांचा नोकरी व्हिसा संपला त्यांना 60 दिवसात देश सोडावा लागेल असे होते. पण त्यांच्याकडे काही पर्याय आहेत, याबाबत कल्पना नव्हती.
अमेरिकेत नोकरी केल्यानंतर पर्याय काय?
अमेरिकेत एखाद्या कर्मचाऱ्याची नोकरी गेली तर त्याच्याकडे 60 दिवसांचा वाढीव कालावधी (ग्रेस पीरियड) असतो. जोपर्यंत कर्मचाऱ्याला पगार दिला जातो, त्या दिवसापासून हा कालावधी सुरु होतो. दुसरीकडे स्थलांतरित नसलेल्यांना नोकरीवरुन काढून टाकल्यानंतर काही पर्याय असतात. यामध्ये तो व्याक्ती एका निर्धारित वेळेपर्यंत अमेरिकेत राहू शकतो. त्यानंतर त्या व्याक्तीला देश सोडून जावे लागते. त्या व्यक्तीसाठी ग्रेस पीरियडचा पर्याय असतो. या कालावधीत तो व्यक्ती आपल्या व्हिसा स्टेट्समध्ये बदल करण्यासाठी अर्ज करु शकतो. अथवा व्हिसाचा कालावधी वाढवण्यासाठी अर्ज करु शकतो. यासाठी तो परिस्थितीचा हवाला देऊन इंप्लॉयमेंट ऑथरायजेशन डॉक्यूमेंटसाठी अर्ज करु शकतो. त्याशिवाय दुसरीकडे नोकरी मिळण्यासाठीही अर्ज करु शकतो. USCIS म्हटले की, जर एखादा कर्मचाऱी 60 दिवसांच्या ग्रेस पीरियडदरम्यान वरीलपैकी कोणतेही पाऊल उचलले तर अमेरिकेत राहण्याचा कालावधीमध्ये वाढवला जाऊ शकतो. त्या व्यक्तीचा व्हिसा संपलेला असला तरीही तो अमेरिकेत अतिरिक्त कालावधीपर्यंत थांबू शकतो.