Amazon Layoff: जगभरातील प्रमुख कंपन्यांमध्ये नोकरकपातीचं पेव फुटलं असून आता  जगप्रसिद्ध कंपनी अमेझॉन त्यांच्या 9,000 कर्मचाऱ्यांना नारळ देण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. या आधी फेसबुकच्या मालकीच्या मेटा कंपनीने त्याच्या 10 हजार कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला असून आता अमेझॉननेही (Amazon) त्याच मार्गावरुन चालण्याचं ठरवल्याचं दिसून येतंय. जगभरात सुरू असलेली नोकरभरती ही भविष्यातील जागतिक मंदीची नांदी असल्याचं सांगण्यात येतंय. 


मायक्रोसॉफ्ट कॉर्प, सेल्सफोर्स इंक, अल्फाबेट आणि मेटा प्लॅटफॉर्मसह असंख्य टेक दिग्गजांनी अलिकडच्या काही महिन्यांत हजारो नोकर्‍या कमी केल्या आहेत. फेसबुकची मूळ कंपनी असलेल्या 'मेटा'ने पुन्हा एकदा नोकरकपात जाहीर केली आहे. दुसऱ्यांदा करण्यात आलेल्या नोकरकपातीमध्ये 10,000 कर्मचाऱ्यांना कमी करण्यात येणार आहे. कंपनीने यापूर्वीच 11,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं होतं. 


अमेझॉनचे सीईओ अँडी जेसी यांनी सांगितलं की, गेल्या काही वर्षांमध्ये कंपनीमध्ये पुरेशी नोकरभरती करण्यात आली होती. आता जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये मंदीची शक्यता लक्षात घेता नोकर कपात केली जाणार आहे. जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये एक प्रकारची अनिश्चितता दिसून येत आहे. त्यामुळे कर्मचारी कपातीशिवाय कंपनीकडे कोणताही पर्याय उरला नाही. 


Nasdaq वर सकाळच्या व्यवहारात Amazon चे शेअर्स 1.1 टक्क्यांनी घसरले होते. या आधी अमेझॉनने जानेवारी महिन्यात त्याच्या 18 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केलं होतं. त्यानंतर आता 9000 कर्मचाऱ्यांना कामावरुन काढलं आहे. ही नोकरकपात अमेझॉनच्या इतिहासातील दुसरी मोठी नोकर कपात आहे. 


 






 


अमेरिकेतील आयटी क्षेत्रातील कंपन्यांवर मंदीचे सावट दिसून येत आहे. यंदाचं वर्ष हे मंदीचं असल्याचं अनेकांनी यापूर्वी सांगितलं आहे. त्याचीच आता प्रचीती येत असल्याचं दिसून येतंय. अमेझॉनच्या या तिमाहीतील नफ्यात मोठी घट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे कंपनीने येत्या काही आठवड्यात 9000 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. 


ही बातमी वाचा: