सध्याची परिस्थिती काय
वेस्टर्न एक्सप्रेस हायवे मुंबईतील महत्त्वाच्या मार्गापैकी एक आहे. मुंबई शहर आणि उपनगराला जोडणाऱ्या या महामार्गावरून प्रति तास पाच हजार ते सात हजार वाहनांची ये-जा सुरू असते. मात्र, सध्या विविध कारणांमुळे वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरुन प्रवास करण्यास वेळ लागतो. खराब रस्ते, जंक्शनवर सिग्नल यंत्रणा नसणे, लेन मार्किंग सुस्पष्ट नसणे अशा विविध कारणांमुळे या हायवेवरुन प्रवास करण्यास वेळ लागत आहे.
एमएमआरडीए काय सुधारणा करणार
वांद्रे ते बोरिवली चार लेनची वाहतूक अधिक चांगल्या प्रकारे करण्यासाठी विविध कामे करण्यात येणार असून त्याचा अंदाजित खर्च 100 कोटी रुपये असणार आहे. वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील वांद्रे ते बोरिवली या दरम्यानचा 25 किमीचा पट्टा शहराच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. या मार्गावर वाहनचालकांसाठी सुस्पष्ट साइन बोर्ड, जंक्शन डिझाइन, उड्डाणपूलावर सहजपणे प्रवेश आणि बाहेर पडता यावे, लेन मार्किंग आदी बाबींची आवश्यकता आहे. या कामासाठी एमएमआरडीएने जागतिक पातळीवरील सल्लागाराची नेमणूक केली आहे. वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील वाहतूक अधिक वेगवान आणि उत्तम कशी होईल, वाहतूक कोंडी कशी टाळता येईल याबाबतही अभ्यास करण्यात येणार आहे.
वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील वाहतूक सुरळीत, वेगवान व सुरक्षित होण्यासाठी सर्वंकष अभ्यास करण्यात येणार आहे. त्याशिवाय मध्यवर्ती आणि पदपथांवर ग्रीन वॉल आणि फ्लोरिंग लॅण्डस्कॅपद्वारे सुशोभिकरण करण्यात येणार आहे. त्याशिवाय रस्त्यावरील दिवे ही उच्च दर्जाचे असणार आहेत. जेणेकरुन वाहन चालकांना रात्रीच्या वेळी अधिक चांगल्या प्रकारे सुरक्षित प्रवास करता येणे शक्य होणार आहे.
पादचाऱ्यांच्या सुरक्षितेसाठी देखील पावले उचलण्यात येणार आहे. पादचारी पुलाचा वापर करणाऱ्या पादचाऱ्यांना अधिक सुरक्षित प्रवास करता यावा याकडेही लक्ष देण्यात आले आहे. उड्डाणपुलाखाली असणाऱ्या मोकळ्या जागेचे सुशोभिकरण करण्यात येणार असून आकर्षक रंगसजावटीने या भिंती रंगवण्यात येणार आहेत. त्याशिवाय प्रसाधनगृहे आणि भविष्याची गरज ओळखून ई-वाहनांसाठी चार्जिंग स्टेशनही वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे 11 लाख चौमी क्षेत्रावर असून 5.8 लाख चौमी भागासाठी निविदा काढण्यात आली आहे. तर, 4.8 लाख चौमीवर होणाऱ्या कामाच्या निविदा एका आठवड्यात काढण्यात येणार आहे. काही ठिकाणी क्राँक्रिटीकरण करण्याची आवश्यकता आहे. त्याशिवाय खेरवाडी जंक्शनवर असणाऱ्या नाल्याचे परीक्षण एमएमआरडीए करणार असून नाल्याची ड्रेनेज क्षमता वाढवण्यात येणार आहे.
वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर असणाऱ्या पादचारी पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण करण्यात आले. त्याअनुषंगाने काही दुरुस्तीची कामे पूर्ण करण्यात येणार आहेत. त्याशिवाय वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील 25 किमी मार्गावर मुख्य रस्ता आणि पदपथांमध्ये अॅण्टी क्रॅश बॅरियर लावण्यात येणार आहेत.
सर्व उड्डाणपूले स्वच्छ करण्यात येणार असून उड्डाणपूलाखालील अतिक्रमणे हटवण्यात येणार आहेत. त्याठिकाणचे सुशोभिकरण करण्यात येणार आहे. मुंबईतील कलाकारांना आपली चित्रं रेखाटण्याची संधी मिळणार आहे. या कामाचा पहिला टप्पा लवकरच सुरू होणार असून पायलट जंक्शनवर काम करण्यात येणार आहे. सविस्तर प्रोजेक्ट रिपोर्ट लवकर सादर होणार आहे. वेस्टर्न एक्स्प्रेसवरून प्रवास करणे हा सुरक्षित आणि आनंददायी अनुभव असणार असल्याची अपेक्षा एमएमआरडीएने व्यक्त केली आहे. ही कामे सहा महिन्यात पूर्ण करण्याचा मानस एमएमआरडीएने व्यक्त केला आहे.