मुंबई : पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसेंच्या नाराजीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गोपीनाथगडावर त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. चुका माणसांकडून होतात. त्याचा राग पक्षावर कशाला काढता, अशा शब्दात पाटलांनी दोन्ही नाराज नेत्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. तुमच्या वेदना, खंत समजू शकतो. पक्ष त्याची दखल घेईल, असा शब्द पाटलांनी दिला. त्याचबरोबर मराठी शब्द जरा जपून वापरा, उद्या सगळं ठिक झाल्यावर आपल्याला अपराधी वाटायला नको, अशा शब्दात पाटील यांनी खडसे आणि पंकजांना समजावून सांगितलं.

गोपीनाथगडावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलही उपस्थित होते. आपल्या भाषणात त्यांनी घरातले वाद घरातच मिटवले पाहिजे असं वक्तव्य केलंय. कारण आपण घरातले वाद रस्त्यावर येऊ देत नाही. सोबतच व्यक्तीवर राग असू शकतो पक्षावर राग ठेवू नका अशा शब्दात त्यांनी पंकजा मुंडेंना मनवण्याचा प्रयत्न केला.

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी मेळाव्याआधी गोपीनाथगडावर जाऊन गोपीनाथ मुंडेंच्या स्मृतिस्थळाचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांच्यासोबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, एकनाथ खडसे, प्रकाश मेहता, हरिभाऊ बागडे यांनीही गोपीनाथ मुंडेंच्या स्मृतीस्थळाला अभिवादन केलंय. मात्र, त्याआधी पंकजा मुंडे यांच्या परळीतील यशश्री बंगल्यावर बंद दाराआड चर्चा झाली. चंद्रकांत पाटील, एकनाथ खडसे, प्रकाश मेहता आणि पंकजा मुंडे यांच्यात जवळपास अर्धा तास चर्चा झाली.

एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे यांच्या पक्ष सोडण्याच्या चर्चांवर चंद्रकांत पाटील म्हणाले, नाथाभाऊ तुम्ही जाण्याची किंवा स्वतंत्र पक्ष काढण्याची भाषा करु नका. पक्षाच्या चुका झाल्या नाहीत. चुका माणसांच्या झाल्यात. पक्षावर कशाला राग काढताय. उलट तुम्ही बोला की तू काल आला आहेस. आम्ही पक्षातच राहणार आहे. तू जायचे तर जा, असे तुम्ही आम्हाला म्हणा आणि पक्षात राहून संघर्ष करा.

Chandrakant Patil Gopinathgad | राष्ट्रवादीविरोधातील लढाई मुंडेंकडून शिकलो, पवारांबद्दल अनादर नाही, पण पक्षासाठी लढलो- चंद्रकांत पाटील | ABP Majha



गोपीनाथ मुंडेंच्या प्रेरणेमुळेच आम्ही शरद पवारांना अंगावर घेऊ शकलो. पश्चिम महाराष्ट्रात जास्तीत जास्त जागा जिंकू शकलो. गेल्या पाच वर्षात गोपीनाथ मुंडे यांच्या प्रेरणेमुळे पश्चिम महाराष्ट्रात जागा वाढल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. याशिवाय, गोपीनाथ मुंडे भरल्या ताटावरुन उठून गेल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या, पण मुंडेंच्या निधनानंतर खचून न जाता त्यांनी कुटुंबाला समर्थपणे सावरले, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.