मुंबई : मी आता मंत्री नाही, आमदारही नाही. मात्र तुमच्यासाठी राजकारणात आहे. पुन्हा रस्त्यावर उतरुन आंदोलन करुन सरकारकडे न्याय मागू. घाबरु नका, मुख्यमंत्री माझा भाऊच आहे, असं वक्तव्य भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी केलं. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त बीडच्या परळीमधील भगवानगडावर खास मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्यातील भाषणात पंकजा मुंडे यांनी हे वक्तव्य केलं.  या मेळाव्याला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, एकनाथ खडसे, प्रकाश मेहता यांच्यासह नेते, पदाधिकारी आणि पंकजा मुंडे यांचे समर्थक उपस्थित होते.


यावेळी केलेल्या भाषणादरम्यान पंकजा मुंडे यांनी भाजपमधील काही नेत्यांवर, प्रामुख्याने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. पंकजा मुंडे म्हणाल्या की, कोणताही पक्ष एका व्यक्तीच्या मालकीचा नसतो. असे म्हणत पंकजा मुंडे यांनी अप्रत्यक्षपणे देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं.

दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे औरंगाबाद येथील स्मारक का रखडले?

रखडलेल्या स्व. गोपीनाथ मुंडेंच्या स्मारकासाठी निधी देण्याचं मुख्यमंत्र्यांकडून आश्वासन : एकनाथ खडसे

मुंडेंचं स्मारक बनवू नका, मराठवाड्याला दुष्काळमुक्त करा
गोपीनाथगडावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना माझी हात जोडून विनंती आहे की, गोपीनाथ मुंडेचं स्मारक बनवू नका. पाच वर्ष झाली त्यांचं निधन होऊन. पण माझ्या मराठवाड्याला दुष्काळमुक्त करा. मराठवाड्यातील शेतकरी सधन बनवण्यासाठी योगदान द्या. मी उद्धव ठाकरेंवर टीकाही करणार नाही, शुभेच्छा देणार आहे. तुम्ही आताच मुख्यमंत्री झाला आहात, त्यामुळे लगेचच हे करा किंवा ते करा बोलणार नाही. पण माझ्या मराठवाड्याला दिशा द्या. कुटुंबवत्सल मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे संवेदनशीलपणे काम करतील."

पंकजा मुंडे मुंबईत असताना उद्धव ठाकरे गोपीनाथगडावर  
उद्धव ठाकरे यांनी 5 नोव्हेंबर रोजी मराठवाड्याच्या दौऱ्यावर असेलल्या उद्धव ठाकरेंनी गोपीनाथ गडावर गोपीनाथ मुंडेंच्या स्मृतीस्थळाला भेट देऊन अभिवादन केलं होतं. यावेळी स्मृतीस्थळावर शिवसेना आणि भाजपच्या बोधचिन्हांच्या फुलांची रांगोळी साकारण्यात आली होती. विशेष म्हणजे यावेळी पंकजा मुंडे मुंबईत उपस्थित असताना दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावेळी मात्र मुंडे कुटुंबियांपैकी कुणी उपस्थित नव्हतं.