Nashik Weather Update : नाशिक शहर व जिल्ह्यात यंदाचा उन्हाळा (Heat) चांगलाच तापदायक ठरत आहे. फेब्रुवारीपासूनच पडत असलेल्या उन्हाच्या लहरीमुळे नाशिककर अक्षरशः वैतागले आहेत. मार्च व एप्रिलमध्ये नागरिक उकाड्याने हैराण झाले झाले असून आज नाशिकमध्ये कमाल 42 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर 26.8 किमान तापमानाची (Temperature) नोंद झाली आहे.  


मंगळवारी (दि.21) 41.8 तापमान नोंदवले गेले आहे. एप्रिलमध्ये 40.7 तापमान नोंदवले गेले होते. हे तापमान यंदाचे सर्वाधिक तापमान असेल, असा अंदाज वर्तवला जात होता. परंतु आज 42 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. या वर्षातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाल्याची माहिती पेठरोडवरील हवामान केंद्राने (IMD) दिली आहे. 


दुपारी नाशिकचे रस्ते निर्मनुष्य


एप्रिलमध्ये नाशिककरांना दोनदा उष्णतेच्या लाटेचा (Heat Wave) सामना करावा लागला होता. तीव्र उन्हामुळे नाशिककरांना दिवसभर प्रखर उन्हाचा चटका जाणवत असल्याने उन्हाच्या झळा असह्य होत आहे. सकाळी अकरा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत शहरातील रस्त्यांवर अघोषित संचारबंदी बघावयास मिळत आहे. सोमवारी रणरणत्या उन्हात मतदारांनी बाहेर पडल्याने रस्ते गजबलेले दिसून आले होते. मात्र, मंगळवारी आणि बुधवारी पुन्हा शहरातील रस्ते निर्मनुष्य दिसून आले. 


बुधवारी 42 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद 


मे महिन्याच्या प्रारंभी काही ठिकाणी झालेल्या अवकाळी पावसामुळे तापमान 36 अंशापर्यंत खाली आले होते. मात्र, 16 मेपासून अचानक तापमानाची तीव्रता वाढली. एप्रिल महिन्याच्या पंधरवड्यात तापमानाचा पारा 40.7 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला होता. त्यावेळी सलग चार दिवस कमाल तापमान हे 40 पार स्थिरावत होते. त्यानंतर 28 एप्रिल रोजी तापमान 41 अंशाच्याही पुढे सरकले. त्यानंतर मंगळ्वारी तापमानाचा हा रेकॉर्ड मोडीत निघाला व तापमान थेट 41.8 पर्यंत गेल्याची नोंद करण्यात आली. या पाठोपाठ आज बुधवारी 42 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. 


रात्रीदेखील उकाड्याचा सामना 


बुधवारी प्रखर उष्णतेमुळे नागरिक घामाघूम झाले होते. घरातसुद्धा नागरिकांना उष्णता जाणवत होती. किमान तापमानदेखील 24 अंशापुढे सरकल्यामुळे नाशिककरांना रात्रीदेखील उकाड्याचा सामना करावा लागत आहे. यंदा एप्रिलअखेर दुसऱ्यांदा उष्णतेच्या लाटेचा सामना नाशिककरांना करावा लागला. आता मे महिन्यात ही त्यापेक्षा उष्णतेला तोंड द्यावे लागत आहे. यामुळे नाशिककरांची अक्षरशः लाही-लाही झाल्याचे चित्र आहे .  


वातानुकूलित यंत्रणा, पंखे, कूलरचा वापर वाढला


तीव्र उकाड्यामुळे नागरिकांकडून वातानुकूलित यंत्रणा, पंखे, कूलर, फ्रीजचा अधिक वापर केला जात आहे. यामुळे विजेची मागणीसुद्धा वाढली आहे. वीजपुरवठा काही तांत्रिक कारणांमुळे अल्पवेळ जरी खंडित झाला तरी देखील नागरिकांना घरात बसणे कठीण होत आहे.


आणखी वाचा 


राज्यात उष्णतेची लाट येणार, अवकाळीचा जोरही कायम राहणार, हवामानचा नेमका अंदाज काय?