Maharashtra Weather News : राज्यातील तापमानात (Temperature) सातत्यानं वाढ होत आहे. कुठं उन्हाचा चटका बसत आहे. तर कुठं अवकाळीचा जोर पाहायला मिळत आहे. दरम्यान, संपूर्ण विदर्भ, मराठवाडा, नंदुरबार, धुळे जळगांव, नाशिक, अहमदनगर अशा 24 जिल्ह्यात दुपारचे कमाल तापमान सरासरीपेक्षा 4 ते 6 डिग्री से. ग्रेड ने अधिक वाढणार आहे. म्हणजे 40 ते 44 डिग्री से. ग्रेड दरम्यानचे राहणार असल्याची माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली आहे. पण या स्थितीतही अवकाळीची शक्यता कायम राहणार आहे.
आजपासून पुढील तीन दिवस म्हणजे शनिवार दिनांक 25 मे पर्यंत उष्णतेच्या लाटेची स्थिती जाणवू शकते अशी माहिती माणिकराव खुळे यांनी दिली आहे.
पुढील तीन दिवस गुजरात राज्य आणि मुंबईसह कोकणातील 7 जिल्ह्यात उष्णतेची लाटसदृश स्थितीसहित दमटयुक्त उष्णतेची स्थिती जाणवेल. विशेषतः या उष्णतेचा प्रभाव मुंबई शहर, ठाणे, पालखेड येथे अधिक जाणवेल, अशी माहिती माणिकराव खुळे यांनी दिली.
अवकाळीची शक्यता कायम
उष्णतेची लाट सदृश्यस्थिती असली तरी संपूर्ण महाराष्ट्रात आजपासून पुढील तीन दिवस म्हणजे 25 मे पर्यंत ढगाळ वातावरणासहित तुरळक ठिकाणी किरकोळ अवकाळी पावसाची शक्यता कायम आहे. गुरुवार, शुक्रवार म्हणजेच दिनांक 23 आणि 24 मे असे दोन दिवस दक्षिण महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर, परभणी आणि नांदेड या 8 जिल्ह्यात अवकाळीची शक्यता अधिक जाणवेल अशी माहिती माणिकराव खुळे यांनी दिली.
मराठवाड्यासह विदर्भातील 19 जिल्ह्यात 24 मे पासून अवकाळीचे ढगाळ वातावरणही निवळेल. तर मुंबईसह कोकण, खान्देश, नाशिक नगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर येथे मात्र 24 मे नंतरही वातावरण टिकून राहील. दरम्यान, अंदमानवर पोहोचलेल्या मान्सूनची आगेकूच कायम असून बंगालच्या उपसागरात आठवड्यादरम्यान कदाचित चक्रीवादळाच्या बीज-रोवणीही होवु शकते असे वाटते.
अवकाळी पावसाचा शेती पिकांना मोठा फटका
दरम्यान, सध्या सुरु असलेल्या अवकाळी पावसाचा मोठा फटका काही भागातील शेती पिकांना बसला आहे. शेतकऱ्यांची हाती आलेली पिकं वाया गेली आहेत. विशेषत: फळबागांसह भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत. दरम्यान, अशाच स्थितीत आणखी अवकाळी पावसाची शक्यता सांगितली आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना चिंता वाटत आहे. दरम्यान, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी सरकारकडे मदतीची मागणी केली आहे.
महत्वाच्या बातम्या: