वाशिम : वाशिम (Washim) जिल्ह्यातील सुपुत्राला काश्मीरमधील लेहमध्ये (Leh) वीरमरण आलं. सैन्यदलात कार्यरत असलेले शिरपूर इथले 31 वर्षीय आकाश आढागळे यांना काल (10 सप्टेंबर) वीरमरण प्राप्त झाले. या घटनेमुळे संपूर्ण शिरपूर गावासह जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.


कर्तव्यावर असताना दुर्घटनेत आकाश आढागळे गंभीर जखमी


आकाश आढागळे गेल्या अकरा वर्षांपासून भारताच्या इंडियन आर्मीमध्ये कार्यरत होते. 8 सप्टेंबर 2023 रोजी कर्तव्यावर असताना एका दुर्घटनेमध्ये ते गंभीर जखमी झाले होते. सैन्यदलाच्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. उपचारादरम्यान काल 10 सप्टेंबर रोजी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी रुपाली आढागळे, 4 वर्षांची तन्वी नावाची मुलगी, आई विमलबाई आढागळे आणि दोन भाऊ नितीन आढागळे आणि उमेश अडागळे असा परिवार आहे. 


आकाश यांचे दोन्ही बंधू देखील देशसेवेत


शहीद आकाश यांचे मोठे भाऊ नितीन सीमा सुरक्षा बल सध्या कार्यरत आहेत. धाकटे बंधू उमेश हे महाराष्ट्र सुरक्षा बलमध्ये कार्यरत आहेत. तीनही भावंड देश सेवेमध्ये कार्यरत आहेत.


11 वर्षे देशसेवा, कर्तव्यावर असतानाच काळाने घाला घातला


अशा परिस्थितीमध्ये त्यांनी कठोर परिश्रम घेऊन शहीद आकाशने अत्यंत विपरीत परिस्थितीमध्ये इंडियन आर्मीमध्ये 2011 मध्ये प्रवेश मिळवला होता. तब्बल 11 वर्ष त्यांनी देशाची सेवा केली. मात्र देशाची सेवा करत असतानाच काळाने त्यांच्यावर घाला घातला. 8 सप्टेंबर रोजी काश्मीर येथील लेहमध्ये त्यांचा अपघात झाला होता. त्यानंतर त्यांना सैन्यदलाच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केलं. परंतु गंभीर जखमी असलेल्या आकाश आढागळे यांची प्राणज्योत मालवली.


हेही वाचा


Gondia News : सहा महिन्यांची चिमुकली झाली पोरकी, गोंदियातील तुमखेडा येथील शहीद जवानाला अखेरचा निरोप


उद्या शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार


उद्या म्हणजेच 12 सप्टेंबर 2023 रोजी त्यांचे पार्थिव त्यांच्या मूळगावी शिरपूर इथे आणले जाणार आहे. तिथेच त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मात्र ऐन तारुण्यात वयाच्या अवघ्या 31 व्या वर्षी वीरमरण आल्याने हळहळ व्यक्त होत आहे.