गोंदिया :  भारत मातेच्या सेवेसाठी लेह- लडाख (Ladakh) येथे भारतीय सैन्य दलात कर्तव्यावर असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील तुमखेडा येथील जवानाला हृदयविकाराच्या झटक्यामुळे (Heart Attack) वीरमरण आले. ही घटना 6 सप्टेंबरच्या सायंकाळी चार वाजता सुमारास घडली.  सुरेश हुकलाल नागपुरे असे शहीद जवानाचे नाव आहे. या वृत्ताची माहिती मिळताच तुमखेडासह तालुक्यात एकच शोककळा पसरली. शनिवार (9 सप्टेंबर) रोजी वीर जवानाचे पार्थिव त्यांच्या मूळगावी पोहचले.  


वीर जवान सुरेशचे मित्र मंडळीसह परिसरातील आप्तेष्टी यांनी पार्थिवाच्या अंतिम दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यावेळी शहीद जवान सुरेश नागपुरे यांच्या प्रति अक्षरशः अश्रूंना वाट मोकळी करून देत शोक संवेदना व्यक्त करण्यात आली. धो-धो बरसणाऱ्या पावसात देखील नागरिक हजारोंच्या संख्येने अंत्यदर्शनासाठी उपस्थित होते. 


सहा महिन्यांची चिमुकली झाली पोरकी


शहीद जवान सुरेश नागपुरे यांच्या पश्चात कुटुंबात पत्नी, सहा महिन्यांची मुलगी, आई-वडील, दोन भाऊ आणि एक बहीण असा परिवार आहे. आपल्या वडिलांनी जगाचा अखेरचा निरोप घेतला आहे याची साधी कल्पनाही त्या चिमुकलीला नाही. सुरभी असं तिचं नाव असून आता वडिलांची माया तिच्यापासून कायमची हिरावली गेली आहे. या गोष्टीमुळे संपूर्ण गोंदिया जिल्ह्यामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. 


शहीद जवानाच्या विरहात पत्नी बेशुद्ध 


काही महिन्यांपूर्वीच तिरोडा तालुक्यातील पिपरिया येथील अभिलाषा यांच्याशी सुरेश नागपुरे यांचा विवाह झाला होता. त्यामुळे अवघ्या काही महिन्यांचा संसार त्यांच्या वाटेला आला. नवी स्वप्न घेऊन काही महिन्यांपूर्वी त्यांनी त्यांच्या नव्या संसाराला सुरुवात केली होती. पण सुरेश यांच्या अशा अचानक जाण्याने अभिलाषा यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. ही गोष्ट त्यांच्यासाठी अतिशय वेदनादायी ठरलीये.  पती गेल्याची बातमी कळताच पत्नी अभिलाषा पतीच्या विरहात बेशुद्ध झाल्या होत्या.


सुरेश नागपूरे हे लेह लडाखच्या सीमेवर त्यांचे कर्तव्य बजावत होते. त्यावेळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या अशा निधनामुळे त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला धक्का बसला. त्यांचा स्वभाव हा अतिशय मनमिळाऊ असल्याचं सांगण्यात येतं. त्यामुळे त्यांच्या अंतयात्रेसाठी संपूर्ण गाव जमा झालं होतं. त्यामुळे त्यांच्या निधनामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. 


हेही वाचा : 


सुरेश नागपूरे हे लेह लडाखच्या सीमेवर त्यांचे कर्तव्य बजावत होते. त्यावेळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.