वाशिम : मागील काही महिन्यांपासून वाशिम (Washim) जिल्ह्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था मोडल्याचं चित्र आहे. सध्या वाशिममधील गुन्ह्यांमध्ये (Crime) देखील वाढ होत चालल्याचं पाहायला मिळत आहे. तर जिल्ह्यातील महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्न देखील ऐरणीवर आल्याचं म्हटलं जात आहे.
मालेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या डोंगरकिन्ही गावात अशीच एक घटना घडली. या घटनेमुळे जिल्ह्यामध्ये एकच खळबळ माजली आहे. अल्पवयीन मुलीला घरात एकटं पाहून तिच्यावर शेजारील व्यक्तीने अत्याचार केल्याती घटना बुधवारी घडली. ही घटना राखीपौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच 30 ऑगस्ट रोजी घडली. या प्रकरणी मालेगाव पोलिसांनी डोंगरकिन्ही येथील एका व्यक्तीवर गुन्हा दाखल केला असून त्याला अटक देखील करण्यात आला आहे.
नेमकं प्रकरण काय?
डोंगरकीन्ही या गावात एक 17 वर्षीय मुलगी आपल्या कुटुंबियांबरोबर राहत होती. दुपारच्या वेळेस तिच्या कुटुंबातील सदस्य हे शेतामध्ये गेले होते. याच संधीचा फायदा घेऊन शेजारील एका 42 वर्षीय व्यक्तीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. तसेच जर तिने घडलेल्या प्रकाराबाबत कुठे वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी देखील दिली. या व्यक्तीने तिच्या घरात कोणी नाही हे पाहून शिरकाव केला. दाराला आतून कडी लावली आणि तिच्यावर अत्याचार केला.
जेव्हा या मुलीची आई शेतातून घरी आली तेव्हा तिने तिच्या मुलीला पाहिले. पीडित मुलगी खूप घाबरलेली होती. आईला पाहताच क्षणी मुलीच्या अश्रूंचा बांध फुटला. तिला रडताना पाहून आई देखील चिंतेत पडली. तिने तात्काळ शेजारी राहणाऱ्या त्यांच्या नातेवाईकांना बोलावून घेतले. त्यानंतर मुलीने घडलेला सर्व प्रकार सांगितला. तिच्या आईने लगेचच पोलीस स्थानकात धाव घेतली आणि याप्रकरणी तक्रार केली. महिला पोलीस उपनिरीक्षक सारिका यांनी त्या आईची तक्रार नोंदवून घेतली.
दरम्यान आरोपीला तात्काळ मालेगावच्या डोंगरकिन्ही पोलिसांनी अटक केली. गजानन निंबाजी गवई असं या नराधमाचं नाव आहे. चौकशीदरम्यान त्याने दुसऱ्यांदा बलात्कार केल्याचं उघड झालं आहे. तसेच वैद्यकीय चाचणीच्या अहवालामुळे याच व्यक्तीने या मुलीवर अत्याचार केल्याचं स्पष्ट झालं आहे. या आरोपीवर बाल लैंगिक अत्याचार कायदाच्या विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
भारतीय दंड विधानअंतर्गत कलम 452, 354 (अ), 376, 506 अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. राखीपौर्णिमेच्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. मालेगाव पोलिसांनी 31 ऑगस्ट रोजी या आरोपीला अटक केली. या प्रकरणात आता पोलीस पुढे कोणती कारवाई करणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा :
मुंबईतील अंधेरी महिलेचा दोन मित्रांसह धिंगाणा, नशेत तीन पब कर्मचारी आणि सात पोलिसांना मारहाण