Washim Road Issue: नांदेड-अकोला चौपदरीकरण महामार्गावर वाशिमच्या (Washim) रेल्वे गेटजवळ जवळपास अर्धा ते पाऊण किलोमीटर रस्त्यावर प्रवास करणं कसरतीचं ठरत आहे. नांदेड-अकोला महामार्गावर (Nanded-Akola highway) गेल्या पाच वर्षांपासून उड्डाणपूल निर्मितीचं काम संथगतीने सुरु आहे. रस्ता निर्मितीसाठी जास्त उशीर होत असल्याने नागरिकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागत आहे. उन्हाळ्यात धुळीचं, तर पावसाळ्यात चिखलाचं साम्राज्य या महामार्गावर गेल्या पाच वर्षांपासून निर्माण होत आहे. वाहनधारकांसह नागरिकांना याचा त्रास होत असल्याचं पाहावयास मिळत आहे.
वाशिमजवळ महामार्गावरील पाऊण किलोमीटरच्या रस्त्यात अनेक मोठमोठे खड्डे पडले आहेत आणि पावसामुळे त्यात चिखल साचला आहे. मोठ्या खड्ड्यांमध्ये छोट्या गाड्यांची चाकं फसत आहेत. खड्ड्यात चिखल-पाणी साचल्याने खड्ड्याचा अंदाज येत नसल्याने अनेक छोट्या चारचाकी वाहनांच्या इंजिनला फटका बसत असल्याने इंजिनचं नुकसान होत आहे. तर, अनेक वाहनांचे टायर फुटण्याच्या घटना घडत आहेत.
खड्डेमय रस्त्यांमुळे मणक्याचे-हाडांचे आजार
अनेक वेळा खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात अंदाज चुकत असल्याने किरकोळ अपघात होणं नेहमीचं झालं आहे. ढिम्म प्रशासन, लोकप्रतिनिधींच्या नाकर्तेपणामुळे ठेकेदार मुजोर होऊन बसला आहे आणि त्यामुळे खड्डेमय रस्त्यावर तात्पुरती डागडुजी देखील करण्यात येत नाही. रोज ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना खड्डेमय रस्त्यांमुळे मणक्याचे-हाडांचे आजार जडत आहेत.
सुरुवातीला काही कंत्राटदारांनी लोकप्रतिनिधी कामादरम्यान पैसे मागतात आणि दबाव टाकतात, असा आरोपही केला होता. मात्र आरोप झालेले लोकप्रतिनिधी सत्तेत आहेत. अशा वेळी कामाचा वेग दुप्पट व्हावा, अशी अपेक्षा आहे. मात्र तसं होताना दिसत नाही. विकास कामांमध्ये इतका उशीर कसा होतो? असा प्रश्न वाहनधारक आणि नागरिक करत आहेत.
कंत्राटदार मुजोर असल्याने छोट्यामोठ्या संघटनांना जुमानत नाही, त्यामुळे उड्डाण पुलाजवळील गावांनी आंदोलनाची रुपरेषा ठरवली आहे, मात्र मुजोर कंत्राटदाराला याचा काही फरक पडणार का? हे पाहावं लागेल.
चिखलाचा प्रवास दूर होण्याची नागरिकांची अपेक्षा
युतीच्या काळात सुरू झालेल्या उड्डाण पूल निर्मितीदरम्यान आधी दुष्काळाच्या सावटमुळे काम थांबवलं, त्यानंतर कोरोनाच्या निर्बंधांमुळे दोन वर्ष काम ठप्प झालं होतं. त्यानंतर निर्माणाधीन उड्डाणपुलाच्या कामाला गती मिळणं अपेक्षित होतं, मात्र नियोजन शून्य प्रशासन, लोकप्रतिनिधींचा संपलेला वचक आणि कंत्राटदारासोबत कप्रतिनिधीची वाढलेली जवळीक यामुळे पूल तयार होत नाही. लवकरात लवकर रस्त्याचे काम पूर्ण व्हावे आणि चिखलाचा प्रवास दूर व्हावा, अशी अपेक्षा आता नागरिक करत आहेत.
हेही वाचा:
Nanded Rains : नांदेड जिल्ह्यात 56 टक्के पाऊस, 60.20 टक्के पेरण्या पूर्ण; मोठ्या पावसाची प्रतीक्षा