Washim News: वाशिममधील (Washim) मानोरा तालुक्यातील पूल पहिल्याच पावसात (Rain) वाहून गेल्याचं पाहायला मिळत आहे. वाशिम जिल्ह्यातील मानारो तालुक्यात दापुरा खुर्द आणि दापुरा बुद्रुक या गावांमधील रस्त्यांवरील पूल वाहून गेला आहे. पहिल्याच पावसात जिल्ह्यातील अनेक तलावांमध्ये पाणीसाठा निर्माण झाला आहे. त्यामुळे यामधून होणाऱ्या पाण्याच्या प्रवाहामुळे पूल वाहून गेल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच या पूलावरुन ये-जा करण्यास देखील त्रास होत असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे हा पूल लवकरात लवकर दुरुस्त करण्यात यावा अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. 


मागील वर्षी देखील हा पूल वाहून गेला होता. त्यामुळे ग्रामपंचायतीकडून या पूलाची डागडूजी करण्यात आली होती. पण गेल्या वर्षीच डागडूजी केलेला हा पूल जोरदार झालेल्या पहिल्याच पावसात वाहून गेल्याचं चित्र आहे. परिणामी नागरिकांना मोठी कसरत करत या तुटक्या पुलावरुन प्रवास करावा लागत आहे. 


याच गावामध्ये इयत्ता पहिली ते सातवी पर्यंत शाळा आहे. त्यामुळे शेजारील गावातील विद्यार्थी देखील दापुरा खुर्द गावातील विद्यार्थी दापुरा बुद्रुक येथे शिक्षण घेण्यासाठी येतात. पण ऐन पावसाळ्यात पूल वाहून गेल्याने विद्यार्थी आणि वृद्ध नागरिकांना तुटक्या पुलावरुन प्रवास करावा लागत आहे. गावात प्रवेश करण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे.  शिवसेना ठाकरे गटाचे   सर्कल प्रमुख  यांनी जिल्हा प्रशासनाकडे पूल लवकरात लवकर दुरुस्त करण्याची मागणी केली आहे. 


दरम्यान भाजपचे आमदार  राजेंद्र पटनी यांनी देखील या पूलाची पाहणी केली आहे. तरीही या तुटक्या पुलाची अवस्था जशी होती तशीच आहे. तसेच जर पूल लवकरात लवकर दुरुस्त नाही झाला तर गावाच्या वतीने आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा देखील गावकऱ्यांकडून देण्यात आला आहे. 


 राज्यातील चार आकांक्षित जिल्ह्यांच्या यादीमध्ये वाशिम जिल्ह्याचं देखील नाव येतं. त्यामुळे वाशिम जिल्ह्यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारकडून अनेक प्रकल्प राबविण्यात येत आहेत. मात्र वाशिमच्या मागासलेल्या तालुक्यांपैकी मानोरा तालुका एक आहे. या तालुक्यामध्ये अनेक सुविधांचा अभाव असल्याचं पाहायला मिळतं. त्यातच नैसर्गिक संकटामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई करणे अनेकदा कठिण होते. याचा नाहक त्रास हा नागरिकांना सहन करावा लागतो. त्यामुळे याबाबत आता प्रशासनाकडून कोणती पावलं उचचली जातील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


हे ही वाचा : 


Washim News: घरकुल योजनेचा लाभ दुसऱ्याच्या खात्यात, वाशीममधील प्रशासकीय यंत्रेणाचा अजब कारभार उघडकीस