Nanded Rain Update : पावसाळा सुरु होऊन जवळपास दीड महिना होत आला आहे. परंतु, नांदेड जिल्ह्यात (Nanded) अद्याप मोठा पाऊस झालेला नाही. गतवर्षी 12 जुलै 2022 रोजी पावसाने जोरदार हजेरी लावली होती. अतिवृष्टीने जिल्ह्यातील गोदावरी, आसाना, लेंडी आदी नद्या तुडूंब भरल्या होत्या. यावेळी विष्णुपुरीचेही दोन दरवाजे उघडण्यात आले होते. तर यावेळी 395.20 मिली मीटर म्हणजेच 158 टक्के पाऊस झाला होता. परंतु आजघडीला 140.70 मिलीमीटर म्हणजेच 56.28 टक्के इतकाच पाऊस झाला आहे. तर जिल्ह्यात 60.20 टक्के पेरण्या झाल्या असल्याची आकडेवारी समोर आली आहे. त्यामुळे अजून मोठया पावसाची प्रतीक्षा आहे.
मागील आठ दिवसांपासून कमी अधिक प्रमाणात पावसाची रिमझिम सुरु असून, शेतीला अपेक्षित असलेला जोरदार अद्याप पडला नाही. त्यामुळे सुरुवातीला झालेल्या तुरळक पावसावर पेरण्या केलेल्या शेतकऱ्यांची चिंता वाढली असून, दुबार पेरणीचं संकट उभं राहण्याची चिन्ह आहे. आधीच रब्बी हंगामाचे पिकं अवकाळी पावसामुळे बरबाद झाली आहेत. त्याचे पंचनामे झाले असले तरीही मदत अजूनही मिळाली नाही. त्यात आता पावसाने दडी मारल्याने बळीराजा हतबल झाला आहे.
तालुकानिहाय पेरणी
नांदेड 56.99 टक्के, अर्धापूर 26.65 टक्के, मुदखेड 64.34 टक्के, लोहा 85.88 टक्के, कंधार 53.74, देगलूर 47.81, मुखेड 74.41, नायगाव 74.06, बिलोली 73.03, धर्माबाद 83.43, किनवट 91.45, माहूर 12.45, हदगाव 61.17, हिमानतनगर 86.23, भोकर 78.92, उमरी 83.97 टक्के याप्रमाणे पेरणी झालेली आहे.
जिल्ह्यातील प्रकल्पात केवळ 28 टक्के पाणीसाठा
नांदेड जिल्ह्यात जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलै महिन्यात देखील अपेक्षित पाऊस पडत नसल्याने चिंता वाढत आहे. जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात काही ठिकाणी पाऊस झाला, मात्र त्यानंतर पावसाने पाठ फिरवली आहे. विशेष म्हणजे याचा परिणाम प्रकल्पातील पाणीसाठ्यावर देखील होतो आहे. पाऊस हुलकावणी देत असल्याने नांदेड जिल्ह्यातील पाणीसाठ्याची (Water Storage) परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून, सध्या केवळ 28.63 टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. जिल्ह्यातील सर्व प्रकल्पांमध्ये मिळून 208 दलघमी उपयुक्त जलसाठा आहे. म्हणजेच प्रकल्पाच्या साठवण क्षमतेच्या केवळ 28 टक्के पाणी शिल्लक आहे. तर परिस्थिती अशीच असल्यास जिल्ह्यात पाणीटंचाईचं संकट निर्माण होऊ शकतो.
इतर महत्वाच्या बातम्या:
Nanded News: शाळेला जातो आम्ही....अस्वलाची शाळेत एन्ट्री अन्...